Saturday, August 15, 2020

योगी श्रीअरविंद !!


श्री. अरविंदांचे जीवन चरित्र म्हणजे या पृथ्वीतलावरील एका महर्षीचा एक अलौकिक असा जीवन प्रवास आहे. १८७२ ते १९५० असा एकूणातला ७८ वर्षांचा महायोगी श्री अरविंदांचा या भारत वर्षातील अस्तित्वाचा कालखंड म्हणजे सर्वोच्च ईश्वरी शक्तीची एक निर्णायक कृती होती. जीवनाच्या सर्वस्पर्शी अनुभवांना सामोरे जात परमेश्वरी चैतन्याच्या अत्युच्च अशा बिंदूपर्यंत महायोगी श्री अरविंद स्वसाधनेच्या माध्यमातून पोहोचले होते.

क्रांतिकारक ते योगी या अतिशय विलक्षण अशा जीवन प्रवासात योगी श्री. अरविंद पावलापावलावर नुसतेच एक महामानव म्हणून पुढे आले नाहीत तर अखिल जगतासाठी एक विलक्षण असे अवतारी व्यक्तिमत्त्व म्हणून दृग्गोचर होऊन बसले आहे.भारताच्या तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीला अध्यात्माचे अधिष्ठान देऊन भगवंत साधनेबरोबरच राष्ट्रतेजाची उपासना करण्याचा संदेश त्यांनी भारतवासीयांच्या पुढ्यात मांडला.त्याच बरोबर माणसामधील दिव्यत्वाला जागृत करून मानव प्रकृतीचे समग्र दिव्यतेमध्ये रूपांतर करणे व सर्वसामान्य माणसात सुप्तावस्थेत असलेल्या असीम अशा परमेश्वरी चेतनेला साधनेद्वारे पृथ्वीतलावर आणून सगळीकडे दिव्यत्व प्रस्थापित करणे हा उद्देश श्री.अरविंदांनी बाळगला होता.

डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते. श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते. १४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला.

श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे. ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत. त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात. या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे .

श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला . श्री.योगी अरविंदांनी भारताविषयी केलेले भाकित आज खरे होताना दिसत आहेत. ते भारताविषयी लिहितात,

“ India of the ages is not dead..has to do something for herself and for the world ”

प्राचीन युगांचा हा भारत मृत झालेला नाही. स्वतः करिता व विश्वाकरिता तो काहीतरी ( भले ) करणार आहे.

The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)

भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे वाटतात.

आज पहिल्यांदा ७३ वर्षात लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ह्यांनी आपल्या उद्बोधनाच्या सुरुवातीला योगी अरविंद ह्यांचा उल्लेख केला आणि त्याचवेळी कुठेतरी वाटलं की योगी अरविंद यांनी केलेलं भाकीत खरं होण्याची हीच तर वेळ नसेल..आज राष्ट्रीय नेतृत्वाची जी वर्धिष्णू वाटचाल सुरू आहे त्याने विश्वास आहेच की भारताचा सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकेल आणि तो दिवस आता जास्त दूर नक्कीच नाही.

✍️ सर्वेश फडणवीस

#१५ऑगस्ट #स्वातंत्र्य_दिन #योगी_अरविंद_जन्मदिवस

No comments:

Post a Comment