Saturday, August 1, 2020

लोकमान्यांचा गणेशोत्सव !


भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जनजागृतीसाठी उपयोगात आणायची होती. समाजाला एकसंध करण्यासाठी गणेशोत्सव सुरू झाला खरा पण केसरी-मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक झाला.'केसरी' संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. 

लोकमान्य पुण्यात पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान ह्या दहा दिवसांत होत असे. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे कायमच होत असत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती गायकवाड वाड्यात अर्थात कालांतराने केसरीवाडा येथे होऊ लागला.

१९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते आणि तो हेतू त्यांनी शेवटपर्यंत जपला होता. 

इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटायला लागले स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि आपल्या घरातील गणपती त्यांनी चौकात आणून बसवला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का ? त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. 

हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात पण टिळकांनी त्याला चतुर्थी ते चतुर्दशी ह्या दहा दिवस चालणार्‍या सामाजिक उत्सवाचे स्वरूप लोकमान्यांनी दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा ह्याच हेतूने लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. 

टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर लिहिलेल्या अग्रलेखात त्या काळच्या वातावरणाचा उल्लेख केला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीतील उत्साही तरुणांनी १८९२ साली मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाजप्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. केशव नाईकांच्या चाळींचा आदर्श ठेवून मुंबईतील त्या काळातील अनेक चाळींनी, वाडय़ांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. देवघरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव स्वरुपात घराबाहेर आणला हे एक क्रांतिकारी पाऊल होते असे म्हणायला हरकत नाहीच. कारण लोकमान्य क्रांतिकार्य करण्यासाठी कायमच तत्पर होते. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली.

लोकमान्यांनी गणेशोत्सव फक्त आरती आणि प्रसाद ह्यावरच न ठेवता विविध विषयांवरील व्याख्यानमाला आयोजित करून तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळवून देणे,पौराणिक देखावे बनवून जनतेला संदेश देणे,जिवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे,विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे
आणि मुख्य म्हणजे समाज विधायक कामे करणे अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्‍न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, 

दरम्यान १८ सप्टेंबर १८९४ रोजी 'केसरी'च्या अग्रलेखात ते लिहितात, 'यंदाचा भाद्रपद महिना व विशेषतः गेली अनंत चतुर्दशी वगैरे दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे लाभले. यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसा मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, पाणी, उदमी इत्यादी औद्योगिक कामे करणाऱ्यातील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्याची जी काही मेहनत घेतली, ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व या दारूच्या पायी बायकापोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट-विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांना निदान काही काळापर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजनपूजनात गेला, ही गोष्ट काही लहान, सामान्य नाही. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. मेळेवाल्यांचा पोशाख, ताल धरणाऱ्या काठ्या, त्यांचा आवाज, एकाच ठेक्याने चालणारी पावले, त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणे, सर्वत्र स्वधर्माच्या स्तुतीने भारलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूंचा तो वीरश्रीयुक्त उत्साह आणि त्यांची ती भव्य निशाणे आहे. गणेशोत्सवा संदर्भात टिळकांनी आपली अशी भूमिका मांडली.

उत्सवाच्या फलश्रुतीसंदर्भात टिळक लिहितात, 'संकटसमयी एकमेकांस उपदेशाची, पैशाची, सल्लामसलतीची मदत करणे, एकमेकांस सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी प्रेमसूचक गोष्टींनी आपले युग्म विशेष संलग्न होत जाणारे आहे. तेव्हा ज्या योगाने आपला संबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.' गणेशउत्सवातील व्याख्यानांनी ज्ञान मिळते. मेळ्यातील पदांनी सामाजिक, धार्मिक गोष्टी कानांवर पडून अंतःकरणात भिनतात. १० दिवस उत्सव होऊन विसर्जनानंतर घरी गेल्यावर तुम्हाला कसेतरी वाटेल. ज्या गोष्टीची सवय होते, ती गोष्ट नाहीशी झाल्याने मनाला चटका लागणे स्वाभाविक आहे. यावर माझे सांगणे आहे, की हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही मिळवली, ती गोष्ट म्हणजे स्वराज्य! ते गेल्याबद्दल तुमच्या मनाला किती चटका लागला पाहिजे याचा विचार करा.

- लोकमान्य टिळक (१९०७ मध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या सांगतेनंतर केलेल्या भाषणातील अंश)

गणेश चतुर्थी ला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जन जागृती, लोक संघटन, लोक संग्रह या कारणासाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. आज आपल्याला देशभरात आणि परदेशातही गणेशोत्सव पोहोचलेला दिसतो, त्याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना आहे. हीच वैचारिक अधिष्ठानाची शृंखला ह्या ही काळात नेण्याचा प्रयत्न करायला हवा. 

✍️ सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment