पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,जन्म ३१ मे १७२५ (ज्येष्ठ वद्य सप्तमी शके १६४७) मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ (श्रावण वद्य चतुर्दशी शके १७१७) सत्तर वर्षांचे सुफळ संपूर्ण आयुष्य! दुःखाचे आघात सोसत,धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन होते. स्वकीयांकडून सन्मान घेत घेत, त्यांच्याशी सामनाही देत देत पुढे गेलेले राजकीय जीवन अहिल्याबाई ह्यांचे होते. उत्तरोत्तर बहरत गेलेले जनकल्याणकारी जीवन त्यांचे होते. असा हा आयुष्याचा त्रिपदरी गोफ अहिल्याबाई होळकर ह्यांच्या चरित्राचा आहे. विवेक घळसासी काकांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला सांगितलं आणि संग्रही असावं असंच हे पुस्तक आहे. संदर्भसहित लेखन असलेले हे राजहंस प्रकाशन प्रकाशित असे चरित्र आहे. मुळात अहिल्याबाई होळकर ह्यांच्यावर लेखनच कमी आहे त्यामुळे हे चरित्रात्मक पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे.
अहिल्याबाई ह्यांच्या व्यक्तिगत जीवनात असे दिसते की, तत्कालीन पितृप्रधान समाजव्यवस्थेनुसार अहिल्याबाईंचा त्यांच्या हयातीतच त्यांच्या डोळ्यांसमोर निर्वंश झाला. अनुवंश शास्त्रानुसार मात्र अहिल्याबाईंच्या अंतकाळी त्यांचा वंश मुलीच्या बाजूने नातींपर्यंत पुढे चाललेला होता हे निश्चित आहे. अहिल्याबाईंची मुलगी मुक्ताबाई सती गेली. पण मुक्ताबाईला दोन मुली होत्या- रमा आणि राधा. महादजी शिंदे यांची बहीण आनंदीबाई निंबाळकर जेव्हा अहिल्याबाईंच्या भेटीला आली होती, तेव्हा अहिल्याबाईंची नात मुक्ताबाईची मुलगी रमाबाई हजर होती, असा उल्लेख आहे. पुढे मात्र तिचा उल्लेख कोठेही येत नाही. मुक्ताबाई सती गेल्यानंतर तिची दुसरी मुलगी राधाबाई बुळे अहिल्याबाईंना भेटायला येऊ इच्छीत होती, अशी नोंद एका पत्रात आहे. पण ती भेटायला आली किंवा नाही हे मात्र कळू शकत नाही. या मुलींना पुढे काय मुलेबाळे होती याचीही नोंद होळकर शाहीच्या पत्रांत मिळत नाही. पण मुलींच्या बाजूने अहिल्याबाईंचा वंश आजही कोठेतरी अस्तित्वात असू शकेल.
अठराव्या शतकाच्या कालपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय जीवनाकडे पाहताना जाणवते की, अहिल्याबाईंच्या मागच्यापुढच्या काळात मराठेशाहीत अनेक चौकस, कर्तृत्ववान स्त्रिया राजकारणात आल्या होत्या. पति-पुत्राला गादीवर बसविण्यासाठी त्या अटीतटीने सत्तासंघर्षात उतरल्या होत्या. त्या डावपेच खेळल्या होत्या. त्यांनी किल्ले लढवले होते. कधी यशस्वी झाल्या होत्या. कधी पराभूत झाल्या होत्या. कधी बळी ठरल्या होत्या. पण सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. अहिल्याबाईंचे राज्यकारभारात येणे निराळे होते. त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राज्यकारभारात आणले होते. इतरजणींपेक्षा अहिल्याबाई या बाबतीत सुदैवी होत्या. त्यांच्या गुणांची कदर करणारे सासरे त्यांना लाभले होते. त्यामुळे त्यांचा राज्यकारभारात फार सहजपणे प्रवेश झाला आणि कारभाराचे शिक्षणही मिळाले. पण इतरजणींप्रमाणे अहिल्याबाई पुत्रपौत्रांना सत्ता मिळवून देण्यासाठी राजकारण
खेळल्या नाहीत. अहिल्याबाईंचे फार मोठे श्रेय हे होते की, मल्हाररावांची मदतनीस असतानाच्या पूर्ण काळात अहिल्याबाईंनी राज्यकारभारात स्वार्थी ढवळाढवळ केली नाही. सासऱ्यांचे माधवराव पेशव्यांना साथ देत, घरभेद्या राघोबादादांशीही संधान बांधणे यासारख्या डावपेचांपासून त्या शक्य तेवढ्या दूर राहिल्या. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पुत्र त्यांच्या जागी आला, त्यावेळी मल्हाररावांचा उजवा हात म्हणून अहिल्याबाईंचा लौकिक मराठा राज्यात सर्वत्र पसरलेला होता. परंतु या लौकिकामुळेही त्या उन्मत्त राजकारणाकडे झुकल्या नाहीत.
गौतमाबाई अर्थात अहिल्याबाई ह्यांच्या सासूबाई तशाच. त्यांनी अहिल्येचं अंतरंग घडवलं .खूप निगुतीनं,काळजीपूर्वक,धर्माचा आधार घेतला होता. दोघीही अत्यंत धार्मिक.पूजापाठ,कीर्तने , प्रवचने यात मनापासून रमणार्या होत्या .पण त्यातीलही चोख तत्वज्ञान,संस्कार तेवढा वेचत आलेल्या होत्या. अहिल्या त्यांच्या हाताखाली सारं शिकली. त्यांचा जणू उपदेश होता .. अहिल्ये,बाईपण,आईपण आणि राणीपण नीट समजून घे. नीट सांभाळ,मर्यादेत रहा,पण अमर्याद स्वप्नं पहा आणि त्यांनी अहिल्याबाई ह्यांना पदर घेण्याबाबत जो विचार दिला तो शब्दांच्या पलीकडचा आहे आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला,गौतमाबाई म्हणतात,
अहिल्ये ,पदर घे .
चारित्र्य जिवापाड सांभाळ .
अहिल्ये,पदरात घे .
रयतेची आई हो .
अहिल्ये ,पदर खोच .
उभी रहा.खचू नको .
अहिल्ये पदरमोड कर .
कामे कर. पण खर्च मात्र सरकारी नाही,खाजगीतून कर.
अहिल्ये,पदर पसरु नको .
देवाशिवाय कुणाहीपुढं .
त्यानंतर खरंच अहिल्याबाई पुण्यश्लोक झाली आणि आयुष्यभर कृतार्थ प्राणपणानं हे सारे संस्कार त्यांनी पाळले होते. ती काही दिल्लीच्या तख्ताची राणी नव्हती, पण सारा हिंदुस्थान तिनं पदराखाली घेतलेला होता. सारा खर्च खाजगीतून करुनही सुमारे सोळा करोड रुपयांची कामं,देवालयं- घाट -धर्मशाळा पाणपोया -अन्नछत्रं अशा माध्यमातून उभी केली. आज महेश्वर ला गेल्यावर अहिल्याबाई ह्यांचे अस्तित्व जाणवते आजही तिथला वाडा अहिल्येची साक्ष देत दिमाखात उभा आहे. नर्मदेच्या घाटावर अहिल्याबाई भेटतातच. काशी विश्वनाथाच देऊळ आजही पुण्यश्लोकांची साक्ष देत युगानुयुगे उभे आहेच. अहिल्याबाईंनी बांधलेले घाट इतके वर्ष होऊन सुद्धा टिकून आहेत. अहिल्याबाईंच्या बांधकामांसारखंच त्याचं व्यक्तित्व,चारित्र्यही अभेद्य होते. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती, पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भारतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. कर्तुत्ववान स्त्रीला केलेला मानाचा मुजरा करणारे हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.
ज्ञात - अज्ञात
अहिल्याबाई होळकर
विनया खडपेकर
राजहंस प्रकाशन - पुणे
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment