Wednesday, January 12, 2022

विवेकानंद केंद्र,कन्याकुमारी

कन्याकुमारी येथील विवेकशिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक म्हणजे स्वामीजींनी पाहिलेल्या उज्वल भारताच्या स्वप्नाचे प्रतीकच आहे. म्हणूनच,विवेकानंद केंद्र या संघटनेची स्थापना हा मा. एकनाथजी रानडे यांच्या ध्यासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हटला पाहिजे. ७ जानेवारी १९७२ रोजी स्थापना झालेल्या विवेकानंद  केंद्राचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. खरंतर या केंद्राची स्थापना आणि शिलास्मारकाची कथा म्हणावी तशी सोपी नाही. अवघड वळणावरून या संघटनेचे कार्य नित्यनुतून आणि सतत वर्धिष्णू आहे. या संघटनेबद्दल मनात कायमच आत्मीयता आहे. 

विवेकानंद केंद्राचे ( जनरल सेक्रेटरी) मा.भानुदासजी धाक्रस असो वा इतर जीवनव्रती असोत ज्यांच्या संपर्कात आलो त्यांनी स्वामीजींच्या प्रती, मा.एकनाथजींच्या प्रती जो आदरभाव निर्माण केला त्याला शब्दांत मांडणे तसे कठीण आहे. एकदा आपल्या शहरातील,गावातील विवेकानंद केंद्रात भेट द्यावी आणि जो अनुभव येईल तो नक्कीच सकारात्मकता प्रदान करणारा असेल यात शंकाच नाही. 

कोट्यवधी देशभक्त नागरिकांच्या मनःपूर्वक सहभागातून
विवेकानंद स्मारकाचे शिल्प उभे राहिले आणि पाठोपाठच सामाजिक उत्थान, समानता आणि पुरुषार्थसंपन्नता यांनी युक्त अशा राष्ट्रपुनरुत्थानाच्या कामात उत्साहाने रसरसलेल्या युवक युवतींचे संयोजन करणाऱ्या 'विवेकानंद केंद्र' या संघटनेची स्थापना झाली. अध्यात्म, सेवा आणि संघटन ही विवेकानंद केंद्राच्या कार्याची त्रिसूत्रीच आहे. समस्त मानवतेच्या शाश्वत कल्याणाची हमी देणाऱ्या वेदान्त तत्त्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्राची उभारणी आणि सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रात विवेकनिष्ठेने कार्यरत असलेल्या युवाशक्तीचे संयोजन या दोन प्रमुख उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विवेकानंद केंद्र सतत प्रयत्नशील आहे. या दृष्टीने तरुण, समर्पित आणि सेवाभावी जीवनव्रती कार्यकर्त्यांची फळी संघटित करण्यावर विवेकानंद केंद्राचा विशेष भर आहे. रूढार्थाने संन्यासी नसलेल्या, पण संन्यस्त वृत्तीने समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक युवतींचे सजीव संघटन हे केंद्राच्या कार्याचे समर्पक वर्णन ठरेल. अनेक परिचित, मित्र-मैत्रिणी आज "जीवनव्रती" म्हणून कार्य करत आहेत. त्यांचे अरुणाचल आणि इतर प्रांतामधील अनुभवकथन म्हणजे पर्वणीच असते. 

देशभरात या प्रकारचे काम विविध हेतुपूर्ण उपक्रमांच्या आधारे निरंतर चालू आहे. सुदूर पूर्वांचलाच्या क्षेत्रात ग्रामीण-वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि विद्यालयांचे विस्तृत जाळे निर्माण करण्यात आले आहे. योगाभ्यासाच्या प्रसारातून निरामय, संतुलित आरोग्याची आराधना, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची व्यवस्था, ग्रामीण भागातील तरुणांना समुचित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, परंपरा आणि संस्कृतीविषयीचे कालसंगत संशोधन,उद्योजकताविकास, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, साहित्यनिर्मिती-प्रकाशन आदी विविधांगी उपक्रम जागोजागी आयोजित करण्यात येतात आणि त्यातून देशभक्तीची ज्योत सतत तेवत राहावी यासाठी विवेकानंद केंद्र सदैव तत्पर आहे. आज केंद्राची वाटचाल सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे सुरू आहे. ५० वर्षे सतत कार्य करणाऱ्या विवेकानंद केंद्राच्या पुढील वाटचालीस सदिच्छा आहेत. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत हे लेखन करतोय. 

✍️ सर्वेश फडणवीस

#विवेकानंद_केंद्र

No comments:

Post a Comment