Tuesday, October 26, 2021

गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी !!


श्रीमद आदि शंकराचार्य यांचे भवानीअष्टक आणि त्यातील प्रत्येक श्लोकातील शेवटचे चरण म्हणजे गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. याचा अर्थ आई तूच माझा आधार आहेस,आश्रय आहेस,रक्षण करणारी आहेस. खरंतर मंदिर आणि मूर्ती हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि नव्याने उभारली जाणारी मंदिरे जनसामान्यांच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत. मंदिरे अनेकांच्या आकांक्षाना वाव देत असतात, ती भक्तांना दर्शनासाठी असतात, कलाकारांच्या कलेला ती उंची प्रदान करणारी असतात. मंदिरे उंचच उंच शिखरांची व कलासमृद्ध असतील तर ते बघतांनाही आश्चर्य वाटते. ती डोळा भरून पाहावीत,अभ्यासावीत. कारण ती भक्तांना दिलासा देतात, पांथस्थांना सावली देतात, संन्याशांना विसावा देतात,वानप्रस्थींना आसरा देतात, कलाकारांना चेतना देतात, भक्तांना ऊर्जा देतात, वाट चुकलेल्यांना मार्गावर आणतात, कोणाला रसिकाची दृष्टी देतात तर कोणाला पौरुष शिकवितात,नास्तिकांना डोळस करतात, तर आस्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात. अशी ही मंदिर डोळाभरून बघावीत. अशाच काही मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आजपासून जाणार आहोत. 

मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे गर्भगृहात आत जायचे असते. गर्भगृह ही संज्ञा मानवी शरीररचनेला सूचित करते. येथून प्रत्यक्ष जीवाचा उद्भव होतो. सृष्टीला चालना देणारे परमात्म्याच्या रूपातील परमोच्च तत्त्व तेथे वास करून असते. मन स्थिर राहण्यासाठी,श्रद्धेला अवकाश प्राप्त होण्यासाठी,अहंकार गळून पडण्यासाठी, आपण मंदिरात जातो आणि तिथे गेल्यावर त्या देवतेपुढे नतमस्तक होत असतो.तेथील अक्षय्य ऊर्जा घेत गाभाऱ्यातून आपण बाहेर पडतो.

आदिशक्तीचे जागर पर्व अर्थात घट नवरात्राची सुरुवात झाली आहे. या जागर पर्वात आज आपण महाराष्ट्रातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी आईच्या दर्शनार्थ जाणार आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थान आहे. तुळजापूरची आई भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. 

आई तुळजाभवानीच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर आणि परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात. परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूर येथे अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. खरंतर साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हणतात. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवतेला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत बघायला मिळत नाही.

श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना आहे. यांच्याव्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नाही. श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीबाबतचा एक अस्सल पुरावा तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिलालेखात सापडतो. या शिलालेखात तुळजाभवानीची मूर्ती स्वत: स्थापित केल्याचा उल्लेख या शिलालेखात असून सदरचा शिलालेख हा शके १३२० म्हणजे इ. स. १३९८ चा असून परसराम गोसावी याने ही मूर्ती दिल्याचा उल्लेख यात आहे. शिलालेखाला अस्सल पुराव्याचे स्थान देण्यात येते हे महत्त्वाचे आहे. शक्तिपीठाची निर्मिती हा विषय महत्त्वाचा असल्याने अनेक पुराणात तुळजाभवानीच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. 

साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. तुळजाभवानी ही महिषासूरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं.

तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे प्रत्येक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवेचा अधिकार आहे.

भक्तांनी लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य हा भाजीभाकरीचा ग्रहण करते. तो उपरकर घराण्याकडून येतो. तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने आई तुळजाभवानीला वारा घालतात. या सोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. 

मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून तुळजाभवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिरात संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजा अर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे. 

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार आणि त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. कुळधर्म म्हणून अनेक कुटुंबात देवीच्या नावाने गोंधळ घालण्यात येतो. 

तुळजापूर देवस्थान सोलापूर पासून ४५ किमी, उस्मानाबाद पासून २२ किमी, लातूर पासून ७७ किमी व नळदुर्ग पासून ३२ किमी आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथे रेल्वे स्टेशन आहे. तसेच लातूर, सोलापूर, उस्मानाबाद व नळदुर्ग येथून तुळजापूरला एस टी बसची सुविधा आहे. तुळजाभवानी मंदिर बस स्थानकापासून पश्चिम बाजूस ५०० मीटर च्या अंतरावर आहे.

श्रीतुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे इथे गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवांचा गोपालकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाणपरंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या मंदिरातील  प्रथापरंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. मातृत्व ही परमोच्च भावना आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक अवस्थेत आपण तिच्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे म्हणूनच म्हणावेसे वाटते.. 

उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो 

उदोकारे गर्जती कार महिमा वर्णू तिचा हो.. 

सर्वेश फडणवीस




No comments:

Post a Comment