Saturday, October 30, 2021

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते !!

विश्वव्यापीनी,सकलसौभाग्यकल्याणी आई रेणुकेच्या गाभाऱ्यात आपण मागच्या आठवड्यात गेलो. आई रेणुकेचे दर्शन घेत आपण माहूर गडावरून सरळ नांदेड-लातूर मार्गाने अंबाजोगाई स्थानावर येतो. भगवती योगेश्वरीचे हे स्थान अतिशय प्राचीन तर आहेच; त्याचबरोबर अनेक राजवंश व त्यांच्या राजवटीची तेथील इतिहासाची ओळख करून देणारे आहे. आजपर्यंत जे शिलालेख आणि उत्कीर्ण लेख उपलब्ध झाले त्यामधून चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी आणि देवगिरीचे यादव या राजघराण्याच्या उपलब्ध इतिहासात आजही या मंदिराची साक्ष देत हे चिरपुरातन मंदिर दिमाखात उभे आहे. 

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती (जयवंती) नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबाजोगाई. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी हे अर्धे पीठ आहे. मराठीचे आद्य कवी, 'विवेकसिंधु' कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे जागृत स्थान आहे. 

अंबाजोगाई हे देवीस्थान आहे. या स्थानाशी देवीभक्त व देवी उपासक मोठ्या प्रमाणावर संबंधित आहेत. अनेकांची योगेश्वरी कुलदेवता आहे. भूचरनाथ हे नाव देवी उपासकांचे परंपरादर्शक आहे. ‘नाथ’ पदान्त देवी उपासकांच्या ज्या ज्या परंपरा आहेत, त्यापैकी भूचरनाथ एक आहे. अंबादेवी परंपरेतील गुरुशिष्य शके १०६६ मध्ये अंबाजोगाईला होऊन गेले. तसेच ‘योगेश्वरी माहात्म्य’ नावाच्या स्थल पुराणातही बुटीनाथादि सिद्धांच्या ज्या कथा आहेत, त्या पाहता ‘नाथ’ पदान्त अंबादेवी उपासकांचे व तपस्वी सत्पुरुषाचे हे स्थान होते हे स्पष्ट होते. अंबाजोगाई नावाने हे स्थान आज प्रसिद्ध असले तरी स्थल माहात्म्यकार मात्र जो उल्लेख करतात तो महत्त्वाचा आहे. स्थलमाहात्म्यकार ‘योगेश्वरी माहात्म्य’ शीर्षकाने आपल्या ग्रंथाचा उल्लेख करतात तसेच प्रचलित नावदेखील ‘अंबाजोगाई’ असे आहे. जोगाई म्हणजे योगिनी.

 अंबाजोगाईच्या मध्यातून वाहणाऱ्या जयंती (जयवंती) नदीच्या पश्चिम तीरावर पुराणकाळापासून योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर असून मुख्य मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिर परिसरात दक्षिणाभिमुख महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोरची दीपमाळ दिसते. पूर्वाभिमुख द्वारातून मंदिरात प्रवेश करताच मुख्य मंदिराचा उंचच उंच कळस व चार लहान कळस, मुख्य मंदिराच्या शिखरांवर विविध मूर्ती,आकृत्या दिसतात. मुख्य मंदिरात पूर्व-पश्चिम व उत्तरेस द्वारे असून पश्चिमेचे द्वार भांडारगृहाकडून असल्याने ते बंदच असते. भक्त पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून मुख्य मंदिरात प्रवेश करतात. मुख्य मंदिराचा गाभारा आणि त्याची दगडी हेमाडपंती रचना अत्यंत भक्कम व सुबक

आहे. मुख्य गाभाऱ्यातील उत्तराभिमुख असलेल्या योगेश्वरीचा ओंकाराकृती भव्य शेंदरी तांदळा अत्यंत प्रसन्न तरीही किंचित भयंकर जाणवतो. दैत्याचे निर्दालन व सृजनांचे रक्षण करण्यासाठी अवतरलेली योगिनी उग्र असूनही सुहास्यवदना अशी भासते. मुख्य गाभाऱ्यातील उजव्या बाजूस कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन होते. सभामंडपातून गणपती, केशवराज, देवीची भोगमूर्ती, महादेव इ.चे दर्शन घेऊन उत्तरद्वारातून बाहेर पडताच समोर भलेमोठे होमकुंड आहे. होमकुंडावरच मुख्य मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे.

मंदिराच्या पराकोटास पूर्व-पश्चिम व उत्तर बाजूने दरवाजे आहेत. सभामंडपात नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर दंतासुराची प्रतिमा (शिर)दिसते. भक्तांच्या सोयीसाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. नैऋत्य दिशेतील ओवरीत रेणुकामातेची मूर्ती दिसते. मोराची ओवरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओवरीत ‘श्रीकृष्णदयार्णवांनी हरीवरदा' हा ग्रंथ लिहिताना वास्तव्य केले होते. मंदिराच्या उत्तरेकडील द्वारातून बाहेर पडल्यानंतर समोर दीपमाळ व त्यापलीकडे सर्वेश्वर तीर्थ दिसते. या तीर्थावर पश्चिमेस रुद्र भैरव व महारुद्र मंदिरे आहेत. तटबंदीच्या पश्चिम दारातून बाहेर पडताच जवळच मायामोचन तीर्थ दिसते. या तीर्थाजवळ काळभैरव, अग्निभैरव, महारुद्र, गणेश आणि नारदेश्वर यांची लहान मंदिरे आहेत. या तीर्थाजवळूनच सर्वज्ञ दासोपंत व आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे.

भगवतीच्या आठही दिशांना एकेक योगिनी विराजमान असते. अशा आठ आहेत. प्रथमा ते पौर्णिमेसह १५ व अधिक एक अशा १६ योगिनी अमृतकलेसह शोभायमान असतात. पण योगिनी ६४ योगिनीची दिव्यरूपता त्यांच्या ज्योतिमयतेतून सुगंधासह पाझरत असते व ही रूपता भगवतीच्या केशकलापावर अशा तर्‍हेने आकृतिमान असतात. हळूहळू त्याची रूपबंधता शिखररूपात झळाळत असते. हिंदू मंदिराला शिखर असते व शिखरासह हिंदू देवदेवतांचे मंदिर पाहिले की शिखराला वंदन करण्यास आपण हात जोडतो. शिखराची निर्मिती भगवतीच्या मस्तकावरील सुगंधित परिमळासह ज्योतिरूपात असलेल्या योगिनीतून झालेली आहे. सुगंध व ज्योत असे हे दृश्य आहे. याचीच खूण म्हणजे हिंदू परंपरेतील स्त्री आपल्या मस्तकावरील केसांना पुष्पाने शोभा देते. आपल्या डोक्यावरील केसांना गजरा व पुष्पांनी शोभायमान करण्याची हिंदू स्त्रीची पद्धत आहे व विश्वातील समस्त स्त्री वर्गात पुष्पांनी शोभा आणणारी हिंदू परंपरेत आढळते. मस्तकावरील केसांचे सौंदर्य भगवतीच्या शिखररूप सुगंधित ज्योतिमय योगिनीचे आहे. अशा योगिनींच्या आकृतिबंध (श्री यंत्रमय) समूहात भगवती योगेश्वरी जगदंबा विराजमान आहे. ती षोडशी त्रिपुरा आहे. रत्नांनी लखलखणारी, तेजाने तळपणारी, प्रकाशाने प्रज्वलित ज्योतिरूप योगिनींच्यासह पुष्पांनी सुशोभित, अंगप्रत्यंगातून सुगंध परिमळाची ही अमृता, ही श्रीपाद श्री वल्लभेश्वरी, ही शिवा, ही शिवाची पार्वती देवदेवेश्वरी समस्त योग्यांची कुमारी योगेश्वरी आपल्या ६४ योगिनींसह अंबादेवी, अंबाजोगाई दर्शनास आलेल्या वधूवरांसह समस्त भक्तांना सुख देण्यास तत्पर आहे. अंबाजोगाईला गेल्यावर योगेश्वरी चे दर्शन घेताना आरतीतील शब्द गुणगुणताना आपणही म्हणू लागतो, 

अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते।

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते।।

व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते।

निळकंठ ओवाळू कैवल्य माते।।

जय देवी जय देवी जय योगेश्वरी।

महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।

जय देवी जय देवी…

सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment