Tuesday, December 14, 2021

संगीतम् परमानंददायकम्..


या भूतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे असं म्हणतात आणि ते खरं ही आहे असं वाटतं. त्‍यामुळेच, की काय राजे महाराजे त्यांच्या वाड्यात सांगीतिक मेजवानी मोठ्या हर्षोल्हासात साजरे करत असावेत कारण नुकताच असा अनुभव ग्वाल्हेर येथील बैजाताल मोतीमहाल येथे अनुभवता आला.

ग्वाल्हेरच्या शिंदे राज घराण्यातील सांगीतिक मैफिली जिथं व्हायच्या त्या स्थानावर जाता आले. हे स्थान बघितले आणि मन काहीकाळ भूतकाळात रमले. ते सगळं वैभव बघतांना मनात सारखा विचार येत होता की,त्या काळात या स्थानावर किती मैफिली गाजल्या असतील,प्रत्येक मैफील अविस्मरणीय असेल. ते वातावरण,तो उत्साह शब्दांच्या पलीकडचा असेल. तिथेच तानसेन ही काही काळ गायला होते असे म्हणतात. ग्वाल्हेर महालाजवळ आजही हे स्थान दिमाखात उभे आहे. जिथे राजे-महाराजे,राण्या आणि त्यांचे मंत्रिमंडळ या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेत होते. 'बैजाताल' मोतीमहाल हे स्थान आज ज्या पद्धतीने जतन करून ठेवले आहे ते बघून आपण काहींकाळ त्या काळात आहोंत असाच भास होतो. मला वाटतं बैजाताल हे रात्रीच बघण्यासारखे आहे. रात्री तिथं गेल्यावर दिव्यांच्या प्रकाशात तेथील सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. क्षणभर मनात विचार आला की त्या काळात इथं ज्या मैफिली गाजल्या असतील त्या नक्कीच स्वर्गीय आनंद देणाऱ्या असतील.

तिथे गेल्यावर असं ही सांगण्यात आलं की ते वैभव पुन्हा अनुभवण्यासाठी काही वर्षांपूर्वी तानसेन महोत्सव याच स्थानावर घेण्यात आला होता पण जागा कमी पडत असल्याने आता तो महोत्सव तानसेन स्मृती स्थळावर होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक या महोत्सवात आपलीं कला सादर करतात. खरंच हे वैभव बघून वाटतं आपण ज्या चिरपुरातन संस्कृतीचे पाईक आहोत ती नक्कीच वर्षानुवर्षे मिळालेलं संचित आहे. खरंतर संस्कारांना संक्रमित करण्यात संगीताचे योगदान महत्वपूर्ण आहे. स्वतःच्या गायकीत तल्लीन झालेला गायक श्रोत्यांच्या हृदयात आपल्या स्वतःचे भावविश्व संक्रमित करत असतो आणि त्यामुळेच संस्कारांचा प्रवाह अबाधित राहिला आहे. आपल्या पूर्वजांनी संगीत हे संस्कार विकसित करणारे सक्षम साधन मानले आहे आणि त्यामुळेच की काय ही अशी स्थानें आजही दिमाखात उभी असून त्या ऐतिहासिक काळाची साक्ष देत सुस्थितीत आहेत. हेच वैभव टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित येत पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. जो अनुभव हे बघतांना आला तेच शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#incredibleindia #mpmarvels #gwaliordiaries

No comments:

Post a Comment