लेखणी आणि वाणीतून गेली ६६ वर्षे शिवचरित्राचा मंत्र सतत जपणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाच्या शताब्दी वर्षात या भूलोकांतून दूर निघून गेले. "शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आयुष्यभर सतत जपत राहिले. या मंत्राच्या साह्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी घराघरात पोहोचवला. मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड लावले. त्यांच्या आणि गो.नी.दांडेकर या द्वय मित्रांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांना मुळात होतीच पण अनेक अभ्यासक आणि संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. इतिहास हा विषय रुक्ष समजला जातो. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत:च्या खास शैलीत कथन करून चैतन्यरूपात समाजासमोर तो साकारला आणि इथेच त्यांचे वेगळेपण दिसून आले होते.
छत्रपतींचा इतिहासात जाणून घेण्यासाठी उत्साही तरुण गडकोटांवर जाऊ लागले. बाबासाहेबांकडून तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागले. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे,अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले होते. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि लालित्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला आहे. बाबासाहेबांची वाणी तेजस्वी होती. घरातून लहानपणापासून शिवाजी महाराज आणि गड-किल्ले यांचा संस्कार त्यांना मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होता आणि राजा शिवछत्रपती हा एकच ध्यास त्यांना होता. सहाव्या वर्षांपासून वडिलांबरोबर त्यांनी किल्ले,वाडे,महाल,मंदिरे पाहण्यास सुरुवात केली होती. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी विमानाने मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. शिवचरित्राची कागदपत्रे मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले ते प्रकाशित करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा पैसे जमवायला बाबासाहेबांनी मैलोनमैल प्रवास केला. पुढे लोकवर्गणीतून ग्रंथ प्रकाशित झाला. याच शिवचरित्राची इतिहास वाचकांनी अक्षरशः पारायणे केली.
बाबासाहेब पुरंदरे यांचे एकूण साहित्य उत्कट शिवभक्ती, उत्तुंग प्रतिभा यातून निर्माण झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व साहित्यकृतींशी एकरूप झालेले आढळते. 'style is the man himself' हे वचन त्यांच्या एकूण एकाहून एक सरस अशा साहित्यकृतींना लागू पडते. याचा अर्थ असा की, त्यांची भाषाशैली उपरी आणि उसनी वाटत नाही. आपले लेखन परिणामकारक व प्रभावी व्हावे म्हणून त्यांना वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब करावा लागत नव्हता. शिवकाळाशी इतके समरस होते की जणू जिवंत भूतकाळात वावरत आहेत असे आपल्याला जाणवत होते. 'राजा शिवछत्रपती' आणि 'शिवभारत' बाबासाहेब पुरंदरे यांच्या एकमेवाद्वितीय भाषाशैलीचे उज्वल उदाहरण आहे. इतिहास आणि साहित्य या दोन्हीचे असे एक विलक्षण मिश्रण त्यात झाले आहे, की तो रुक्ष इतिहास नव्हे, रम्याद्भुत ऐतिहासिक कादंबरी नव्हे तर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक असे रसायन प्रकट झाले आहे.
बाबासाहेबांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूर येथे झाले. तेव्हापासून "शिवचरित्रकथन' हा त्यांचा ध्यास नि श्वास बनला. १२००० हुन अधिक व्याख्याने झाली,जाणता राजा सारखे महानाट्य साकारणारे पुढे भारतभर आणि परदेशातही त्याचे प्रयोग झाले. व्यासंग हीच त्यांची विश्रांती होती. वेळेबाबत ते सदैव तत्पर होते. बाबासाहेबांचा गौरव करताना प्रा. शिवाजीराव भोसले म्हणाले होते, "बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. शाबास, शाहिरा शाबास! इतिहासानंसुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू ! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावं यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!'... हे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र वाट आतुरतेने वाट पाहतो आहे. खरंतर हे शब्द ही खरे ठरले आहेतच.. शतायुषी वर्षात काळच त्यांना आपल्यापासून दूर घेऊन गेला आहे. अशा ऋषीतुल्य माणसांचा परिसस्पर्श आपल्याला झाला यासाठी आपण भाग्यवान आहोत.
आज आठवणीत असलेले बाबासाहेब, त्यांनी सांगितलेला राजाचा इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला सांगण्याचे उत्तरदायित्व आता आपल्या शिरावर आहे. राजा शिवछत्रपतींचा इतिहास बाबासाहेबांच्या वाणीतून आपण जसा ऐकला तसा येणाऱ्या प्रत्येक पिढीत तो हस्तांतरित करणे हेच आपले आद्यकर्तव्य आहे आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल . त्यांच्या सारखी सतत कार्यमग्न आणि कार्य करण्याची प्रेरणा सदैव बाबासाहेबांच्या कार्यातून आपल्याला मिळत राहील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चरणी स्थान मिळो हीच त्याच्याचरणी प्रार्थना आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🏻
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment