भारतीय स्वातंत्र्याने ने आज ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हे अमृतमहोत्सवी वर्ष समाजातील एकता,समता,बंधुता, ही भावना जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निरंतर वाटचाल करतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नित्त्य, नैमित्तिक शाखांच्या माध्यमातून राष्ट्रजागरण व जागृतीचे काम अखंड चालू ठेवले आहे, त्याचसोबत असंख्य स्वयंसेवक तन, मन, धन समर्पित करुन हे राष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रवास उज्वल आणि आशय प्रगल्भ आहे, चाल दमदार आणि यशाचा आलेख सतत वर्धिष्णू आहे. मागील लेखात आपण प्रार्थनेविषयी जाणून घेतले आज आपण संघाच्या प्रातः स्मरणीय एकात्मता स्तोत्राचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया.
संघाचे प्रातः स्मरणीय एकात्मता स्तोत्र हे सर्वांप्रती आत्मीयता दर्शवणारे आहे..! या स्तोत्राने कानाभोवताली गुंजारव करत कधी मनाला रुंजी घातली कळलेच नाही. स्तोत्र फलदायी व्हायला ते आधी मनात रुजायला हवे. स्तुती करायला रचलेले काव्य म्हणजे स्तोत्र. त्या इष्ट देवतेच्या परिपूर्ण गुणांचे वर्णन म्हणजे स्तोत्र. अशाच एकात्मता स्तोत्राबद्दल ऐकतांना अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली. एकात्मता म्हणजे सगळ्यांचे ध्येय एक असणे. प्रत्येक कार्याच्या आधी राष्ट्र व धर्म एकत्र येत आणि राष्ट्र उन्नती व राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना जपत हे राष्ट्र परम वैभवाप्रत नेण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवक ह्या एकात्मता स्तोत्राचे नियमित पठण करतो आहे . एकात्मता म्हणजे सगळ्यांचा आत्मा एकच आहे. खरंतर एकात्मतेची जाणीव व्हायला हवी व समान गुणांची बांधिलकी जुळत एकत्र येत या राष्ट्राचे स्मरण करावे यासाठी प्रातः स्मरणीय स्तोत्र म्हणजे एकात्मता स्तोत्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १९८५ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने या स्तोत्राला अनुमती दिली आहे. आज याला ३६ वर्ष म्हणजे साधारपणे ३ तप होवून सुद्धा स्वयंसेवक त्याचे नित्य पठण करतात आणि रोज प्रभात शाखेत याचे सामूहिक पठण होते.
पूजनीय डॉक्टरांचा विचार खूप दूरदृष्टीचा आणि व्यापक होता . संघांच्या कामांतील विविधता आणि त्यांची व्याप्ती हे एकंदर राष्ट्राण आहे. संघ आज वैश्विक स्तरावर नावाजला जातोय पण हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजात तितकीशी नावाजली नसलेली,ध्येयनिष्ठ अशी ८-१० माणसे केवळ डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर एकत्र आली आणि आज ९७ वर्षाच्या वाटचालीनंतर ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' या बिरुदाखाली चालणारे सामाजिक- सांस्कृतिक काम अव्याहतपणे देशभरात सुरू आहे. आपल्या कर्तव्याचे स्मरण करीत, तिच्याप्रती असलेल्या प्रेमाचा उद्घोष करीत,तिच्या उज्ज्वल भवितव्याविषयी हे स्तोत्र म्हणत असतात. जनमानसावरील भारताच्या एकात्मतेचा संस्कार दृढमूल करतील अशा प्रातिनिधिक नावांचा यात उल्लेख केला आहे.
जमीन कसदार असेल तर पीक मोत्यांचे येते. त्यातून ज्या भरतभूमीला नररत्नांची खाण म्हणून गौरवले जाते, त्या भूमीचा कस तो काय वर्णन करावा. त्या भूमीचे, तिच्यात अंगभूत असलेल्या पंचमहाभूतांचे, तिच्या पर्वतनद्यादी आभूषणांचे आणि एकूणच साऱ्या पार्श्वभूमीचे स्तवन सुरवातीच्या काही श्लोकांतून केलेले आहे.
ओम् नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ॥ १ ॥
विश्वमांगल्याची चिरंतन ज्योत आणि सर्व पंचमहाभूतांची अभेद्य संघटना आणि संघटन म्हणजे संघ. त्या आनंदमयी मातेस पहिले वंदन!
प्रकृतिः पंचभूतानी ग्रहलोका स्वरास्तथा ।
दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वंतू मंगलम् ॥ २ ॥
सर्व ग्रहनक्षत्रे, ही सृष्टी, हा परिसर आकाशपाताळादी सर्व लोक व त्यांना बंधनात ठेवणाऱ्या दशदिशा आणि काळ हे आम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करोत.
रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटीनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् ॥ ३ ॥
समुद्रवसना भारतमातेला देवतात्मा हिमालय मुकुटाप्रमाणे शोभून दिसतो. ऋषी, महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी आदी महापुरूषांच्या अशा या महन्मातेला आमचे प्रणाम असोत.
महेंद्रो मलय सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारवलिस्तथा ॥ ४ ॥
उत्कलप्रदेशाचे भूषण असलेला आणि महर्षी परशुरामाचे कायमचे निवासस्थान असणारा महेंद्र पर्वत, दक्षिण भारताचे भूषण ठरणारा निलगिरी (मलयगिरी) पर्वत, स्वातंत्र्याची मंगल लेणी ठरलेले कोटकिल्ले अंगाखांद्यावर बाळगणारा सह्याद्री पर्वत, देवदेवतांची तीर्थक्षेत्रे असल्यामुळे गौरव पावलेला हिमालय पर्वत, वनराज सिंहांचे वसतीस्थान असणारा रैवतक (गिरनार) पर्वत, वयोवृद्ध गिरीराज विंध्याचल तथा महाराणा प्रतापांची आठवण देणारा अरवली पर्वत हे सर्व संस्मरणीय आहेत.
गंगा सरस्वती सिंधुब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५ ॥
गंगा,सरस्वती, आर्यसंस्कृतीची आद्य सिंधू , ईशान्य भारताची रक्षिणी ब्रह्मपुत्रा, गंगेची पुष्टीवर्धिनी गण्डकी, दण्डकारण्यातील अक्षयसरिता कावेरी,कृष्णाची यमुना, स्फटिकप्रस्तरांतून झेपावणारी रेवा (नर्मदा), कृष्णप्रस्तरांत शोभून दिसणारी कृष्णा, दक्षिणगंगा गोदावरी तसेच विंध्यकुमारी महानदी ह्या नद्या आपले जीवन सरस करतात. समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचेही स्मरण आपणांस प्रेरक आहे.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६ ॥
रामजन्मभूमी अयोध्या, कृष्णजन्मभूमी मथुरा, पहाडी प्रदेशातून सखल प्रदेशात गंगावतरण होते ते हरिद्वार (मायापुरी), देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान काशी, परंपरागत विद्यानगरी कांची, सम्राट विक्रमादित्याची राजधानी उज्जैन (अवंतिका), जगन्नाथाची रथयात्रा आजही चालवणारी जगन्नाथपुरी (नीलांचल), पाणिनी अन् कौटिल्यल्यकालीन विश्वविद्यालय तक्षशीला, तसेच भगवान बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती गया यांचे स्मरण आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते.
प्रयागः पाटलिपुत्रं विजयानगरं महत्
इन्द्रप्रस्थं सोमनाथः तथाअमृतसरः प्रियम् || ७ ||
गंगा यमुनेच्या पवित्र संगमाचे स्थान प्रयाग, सम्राट चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र, कृष्णदेवरायाची राजधानी विजयानगर, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, गौरवशाली इतिहासाचे सोमनाथ आणि अमृतसरोवरवेष्ठित हरमिंदरसाहेबांचे पवित्र मंदिर असलेले अमृतसर यांचे स्मरण आपल्याला आपल्या प्रेरणांचे दर्शन घडवते.
चतुर्वेदाः पुराणानी सर्वोपनिषदस्तथा ।
रामायणं भारतंच गीता सद्दर्शनानी च ॥ ८ ॥
जैनागमास्त्रिपिटका गुरूग्रंथः सतां गिरः ।
एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदी सर्वदा ॥ ९ ॥
चारही वेद, अठरा पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि सद्दर्शने; तसेच जैनागम, त्रिपिटक, गुरूग्रंथसाहेब आणि सज्जनांची वचने ही आमची श्रद्धास्थाने आहेत.
अरुंधत्यनसूया च सावित्री जानकी सती ।
द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावतीस्तथा ॥ १० ॥
पतिव्रतांचा आदर्श ठरल्यामुळे सप्तर्षींसोबत आकाशात चमचमणारी अरुंधती, दत्तात्रेयांनी जिच्यापोटी जन्म घेतला ती महासती अनुसया, प्रत्यक्ष यमाकडूनही पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, पत्नीत्वाचा आदर्श ठरलेली भूमीकन्या जानकी, पतीचा अनादर सहन न झाल्याने पित्याकडील यज्ञात भस्म होणे पत्करणारी दक्ष प्रजापतीची कन्या सती (पार्वती), अलौकिक पतीव्रता द्रौपदी, पतीवरील अन्याय त्याच्या मृत्यूनंतरही राजसभेत वाद करून दूर करणारी सती कण्णगी, जनकसभेत पती याज्ञवल्क्य याजसोबत शास्त्रार्थात भाग घेणारी ब्रह्मवादिनी गार्गी तसेच कृष्णभक्त संत मीराबाई या स्त्रिया आपल्या संस्कृतीतील स्त्रीत्वाच्या आदर्श आहेत.
लक्ष्मीरहल्याचन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा ।
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता ॥ ११ ॥
महाराणी लक्ष्मीबाई, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच काकतीय सम्राज्ञी रुद्रमांबा यांच्या कथा आजही आम्हाला स्फुरण देतात. यांच्याचप्रमाणे समाजहितैषी भगिनी निवेदिता व रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी शारदादेवी याही आम्हाला पूजनीय आहेत.
श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः ।
मार्कंडेयो हरिश्चंद्रः प्रल्हादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥
मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्री राम, ज्याच्या नावाने आपला देश "भारत" म्हणून ओळखला जातो तो भरत, योगेश्वर कृष्ण, प्रतिज्ञेचा गौरव ज्यांनी आपल्या आचरणाने वाढवला ते पितामह भीष्म, सर्वश्रेष्ठ धर्मपरायण युधिष्ठिर, महान धनुर्धर अर्जुन, बालपणातच अपमृत्यूशी यशस्वी झुंज देणारे महर्षी मार्कंडेय, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, परमभक्त प्रल्हाद, धर्मोल्लंघनावर मनोवैज्ञानिक उपचार करणारे महर्षी नारद तसेच घोर तपश्चर्या करून अढळपद प्राप्त करून घेणारा बाल ध्रुव हे आमचे वर्तणुकीचे आदर्श आहेत.
हनुमांजनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः ।
दधीचिर्विश्वकर्माणौ पृथुर्वाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥
स्वामीनिष्ठेचे चिरंतन प्रतीक रामभक्त हनुमान, आत्मज्ञानी मिथिलानरेश जनक महाराज, "व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वं" असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते महर्षी व्यास, प्रत्यक्ष श्रीरामाला "योगवासिष्ठ्या"चा उपदेश करणारे गुरूवर्य वसिष्ठ, राजा परीक्षिताला मृत्यूपूर्व सात दिवसांत भागवत कथा कथन करणारे व्यासांचे पुत्र दैत्यगुरू शुक्राचार्य, बळाच्या जोरावर देवलोकावर अधिराज्य करणारा प्रल्हादाचा नातू बळीराजा, उन्मत्त वृत्रासुराच्या निर्दालनासाठी वज्र तयार करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या अस्थी दिल्या ते दधीची ऋषी, "सुदर्शन चक्र, त्रिशूळ व वज्र" इत्यादी अमोघ शस्त्रांचा निर्माता आद्य स्थपती विश्वकर्मा. ज्याच्या कृषीविकासाच्या धोरणांमुळे ही धरणी एवढी संपन्न झाली की तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले तो पृथू राजा, रामायणकार महर्षी वाल्मिकी तसेच चिरंजीव धनुर्धर परशुराम अशा अनेकानेक महापुरूषांच्या चरीत्रांचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे.
भगीरथश्चैकलव्यो मनुर्धन्वन्तरिस्तथा
शिबिश्च रन्तिदेवश्च पुराणोद् गीतकीर्तय ॥१४॥
आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्याने पृथ्वीतलावर गंगावतरण केले व "प्रयत्नांना" भगीरथ हे विशेषण प्राप्त करून दिले तो राजा भगीरथ, गुरूदक्षिणेच्या स्वरूपात ज्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठाही सहज कापून दिला तो परमशिष्य एकलव्य, आदीपुरूष मनू, चौदा रत्नांतील एक रत्न आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य धन्वंतरी, शरणागत कबुतरास जीवन देण्यासाठी ससाण्यास स्वतःचे शरीर अर्पण करणारा शिबीराजा तसेच दुष्काळात जनतेला सर्वस्व वाटून टाकणारा राजा रंतिदेव यांची कीर्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे. हे सर्व आमचे स्फुर्तीस्त्रोत आहेत.
बुद्धा जिनेन्द्रा गोरक्षः पाणिनिश्च पतंजलिः
शंकरो मध्व निंबार्कौ श्री रामानुजवल्लभौ ॥१५॥
अज्ञानामुळे भासमान असणाऱ्या जरामरणादी दुःखांवर विचारपूर्वक विजय मिळवण्याची व अहिंसामर्गाने संयमित जगण्याची बुद्धी ज्याराजपुत्र सिद्धार्थाने तपचरणाने मिळवली तो भगवान बुद्ध, जैन विचारधारेचा जनक महावीर, महान् हठयोगी गोरक्षनाथ, "अष्टाध्यायी"सारख्या व्याकरणशास्त्राचा रचयिता पाणिनी, प्रसिद्ध योगसूत्रकार पतंजली, अद्वैतमताचे आद्य पुरस्कर्ते शंकराचार्य, द्वैतवादाचे प्रवक्ते वैष्णव मध्वाचार्य, द्वैत व अद्वैत वादांची सांगड घालणारे निंबार्काचार्य, विशिष्ताद्वैतमताचे प्रतिपादक रामानुजाचार्य तसेच शुद्धाद्वैतमताचे जनक वल्लभचार्य या साऱ्यांनी आम्हाला सद्धर्माची शिकवण दिली.
झूलेलालोथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा
नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥१६॥
इसवी सनाच्या १० व्या शतकात जबरीच्या सार्वत्रिक धर्मांतराचे प्रयत्न विफल करणारे झुलेलाल, महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू, तिरुक्कुरलाचे रचयिता तिरुवल्लुवर, शैव आणि वैष्णव संत, कंबरामायणकार रामभक्त कंब तसेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर यांनी आमच्या धर्मभावना सन्मार्गी लावल्या.
देवलो रविदासश्च कबीरो गुरुनानकः
नरसिस्तुलसीदासो दशमेषो दृढव्रतः ॥१७॥
धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात प्रवेशाचा मार्ग सुकर करणारे देवलस्मृतीचे रचनाकार देवल, थोर संत रोहिदास, महान् स्पष्टवक्ता संत कबीर, शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक, "वैष्णव जन तो तेणे कहिये" या सुप्रसिद्ध भजनाचे रचयिता नरसी मेहता, "रामचरितमानसकार" संत तुलसीदास तसेच शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आमची सद् अभिरुची तेवत ठेवली.
श्रीमत् शंकरदेवश्च बंधू सायण माधवौ
ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरन्दरः ॥१८॥
आसामात भागवत धर्माचा प्रसार करणारे शंकरदेव यांनी भागवत धर्माचे सार सांगणारा "गुणमाला" ग्रंथ लिहीला. मध्वाचार्य तथा सायणाचार्य यांनी विजयानगरचे साम्राज्य वैभवास नेले. भागवत धर्म महाराष्ट्रात वाढला याचे श्रेय ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांचे आहे. त्याबाबत असे म्हणतात की "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस". शिखांचे चौथे गुरू रामदास तर सर्वश्रुतच आहेत. मात्र "तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई" हा आगळा संदेश आपल्या रामदासस्वामींनी दिलेला आहे. पुरंदरदासांचे वर्णन तर "कर्नाटकाचे तुकाराम" असेच करतात. या सर्वांची शिकवण आम्हाला संयमित सहजीवनाला सामर्थ्याची जोड देण्यास सांगते.
बिरसा सहजानन्दो रामानन्दस्तथा महान्
वितरन्तु सदैवैते दैवीं सद्ड्गुणसंपदम् ॥१९॥
बिरसा मुंडा यांनी दक्षिण बिहार, ओरिसा तसेच मध्यप्रदेशातील विजनवासी जनतेला संघटित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. स्वामी सहजानंदांनी उद्धव संप्रदायाची स्थापना केली. रामानंदांनी लोकाभिमुख धर्माचा प्रचार केला. कबीर, रोहीदास, सेना न्हावी, पद्मावती आदी त्यांचेच शिष्य होत. या सर्व महात्म्यांनी त्यांच्या दैवी गुणसंपदेचा वारसा आम्हाला दिलेला आहे.
भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा
सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥२०॥
नाट्यशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनी, "अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंश" इत्यादी महाकाव्यांचा रचयिता महाकवी कालीदास, बहुविद्याविशारद राजा भोज, होयसाळ शैलीचा प्रख्यात शिल्पशास्त्री जकणाचार्य ज्याने "हळेबिडू, बेलूर, सोमनाथ" इत्यादी मंदिरांचे शिल्प घडवले, "सूरसागर" रचयिता सूरदास, "धनराज पंचरत्न" कर्ता त्यागराज तसेच "सवैय्यां"चा कर्ता रसखान यांनी आमचा इतिहास कलासमृद्ध केलेला आहे.
रविवर्मा भातखंडे भाग्यचन्द्रः स भूपतिः
कलावंतश्च विख्याताः स्मरणीया निरंतरम्॥२१॥
महान चित्रकार राजा रविवर्मा, आधुनिक संगीतशास्त्राचे प्रवर्तक भातखण्डे गुरूजी तसेच ललितकलेचा आश्रयदाता मणिपूरचा राजा भाग्यचंद्र आदी विख्यात कलावंत सदैव स्मरणीय आहेत.
अगस्त्यः कंबु कौन्डिण्यौ राजेन्द्रश्चोल वंशजः
अशोकः पुश्य मित्रश्च खारवेलः सुनीतिमान् ॥२२॥
दण्डकारण्यात वैदिक संस्कृतीची ध्वजा फडकवल्यावर सप्तसिंधूंपलीकडे जावा,सुमात्रा द्विपांवर सम्यक संचार करणारे महर्षी अगस्ती, प्रागैतिहासिक काळात कंबोडिया सारख्या प्रदेशावर अधिकार करून तेथील सर्वतोमुखी विकास केल्यामुळे त्या देशास स्वतःचे नाव देणारा राजा कंबू, आग्नेय आशियात फुनान साम्राज्य स्थापणारा भारतीय कौण्डिण्य, मलाया द्विपापर्यंत साम्राज्यविस्तार करणारा चौल राजेंद्र, पराक्रमाने कलिंगविजय मिळवणारा अन् त्यातील नरसंहाराने व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट चण्डाशोक, अधोगतीस पोहोचलेल्या अखेरच्या मौर्य नृपतीस बाजूस सारून यवनांना पळवणारा सेनापती पुष्यमित्र शुंग व यवनराज दिमित्राचे आक्रमण परतवण्याकरता मगधराजाशी शत्रुता विसरून संधी करणारा चेदिराज खारवेल यांच्या स्मरणाने आमची संघशक्ती जागृत होते.
चाणक्य चन्द्रगुप्तौ च विक्रमः शालिवाहनः
समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावलः ॥२३॥
कौटिलीय अर्थशास्त्राचा रचयिता आर्य चाणक्य, हिंदुकुशपर्वतापर्यंत प्रशासन करणारा सम्राट चंद्रगुप्त, अवंतीच्या स्वतंत्रतेसाठी शकांचा पराभव करणारा शककर्ता सम्राट विक्रमादित्य, पैठणला नवी राजधानी वसवणारा शककर्ता शातवाहन राजा शालिवाहन, आर्यावर्तात सुवर्णयुग आणणारा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त, हूणांच्या वर्चस्वापासून मुक्त असे एकछत्री साम्राज्य स्थापून कन्नौजला त्याची राजधानी करणारा राजा हर्षवर्धन, ब्रह्मदेशावर सत्ता गाजवणारा कलिंगराज शैलेंद्र तसेच अरबस्थानापर्यंत पाठलाग करून अरबांना परास्त करणारा चितौडाधिपती बाप्पा रावळ यांचे स्मरण आम्हाला "परं वैभवं नेतुं एतद् स्वराष्ट्रम्" ह्या आमच्या निर्धाराची आठवण करून देते.
लाचिद्भास्कर वर्मा च यशोधर्मा च हूणजित्
श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥२४॥
मामापेक्षा देश मोठा म्हणून मुगल सेनेला फितुर झालेल्या मामाचा शिरच्छेद करणारा वीर अहोम सेनापती लाचित बडफुकन, कुशल प्रशासक राजा भास्करवर्मा, महाक्रुर हूण राजा मिहिरकुल याचा पराभव करणारा मंदसौरनरेश यशोधर्मा, विजयनगरचा प्रसिद्ध शास्ता कृष्णदेवराय व आक्रमण हाच संरक्षणाचा राजमार्ग मानून "तुर्क, मुस्लिमादी" आक्रमकांचा त्यांचे घरापर्यंत जाऊन पाठलाग करून त्यांना परास्त करणारा ललितादित्य मुक्तापीड आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देतात.
मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपतिः
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमाः ॥२५॥
महान संघटक मुसुनुरी नायक (प्रोलय व कप्पय), मेवाड नरेश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज तसेच काशी विश्वनाथ व हरमिंदर मंदिरावर सुवर्णकलश चढवणारा महाराजा रणजीतसिंह यांचे विक्रम विश्वविख्यात आहेत. त्यांचे स्मरण आमच्या विजिगिषू वृत्तीत भर घालते.
वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा
चरको भास्कराचार्यो वराहमिहिरः सुधीः ॥२६॥
सांख्यसूत्रांचे रचयिता कपिल मुनी, वैशेषिक सूत्र प्रणेता महर्षी कणाद, प्रख्यात शल्यविशारद सुश्रुत, कायाचिकित्सेवर "चरकसंहिता" लिहीणारे चरकऋषी, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य तसेच बृहत्संहितेचे रचयिता वराहमिहिर आमच्यातील वैज्ञानिक प्रेरणांना दृढमूल करतात.
नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो वसुर्बुधः
ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥२७॥
रसायनशास्त्राच्या व आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भावास राज्य सोपवणारा नागार्जुन, प्राचीन विमानविद्येचे प्रणेते भरद्वाज ऋषी, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आर्यभट्ट, वनस्पतींना जीव असतो असा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस, प्रकाशावरील "रामनप्रभाव" शोधून काढणारे चंद्रशेखर वेंकटरमण व श्रेष्ठ गणितज्ञ रामानुजम् आमच्या संपन्न वैज्ञानिक परंपरेची आम्हाला आठवण देतात.
रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशाः ॥२८॥
स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद, गीतांजलीकार रविंद्रनाथ ठाकूर, ब्राह्मोसमाजसंस्थापक राजा राममोहन राय, स्वामी रामतीर्थ, योगी अरविंद तसेच स्वामी विवेकानंद यांचा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे.
दादाभाई गोपबंधुः टिलको गांधीरादृताः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्यभारती ॥२९॥
थोर समाजसुधारक दादाभाई नौरोजी, दीनदुःखितांचे कैवारी गोपबंधू दास, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" असा उद्घोष करणारे लोकमान्य टिळक, अहिंसेचे पूजक महात्मा गांधी, रमण महर्षी, पंडित मदन मोहन मालवीय तसेच सुब्रह्मण्यम् भारती अशा थोर पुरूषांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.
सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥
सुभाषचंद्र बोस, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक प्रणवानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, घटनाकार आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रखर पुरस्कर्ते महात्मा फुले तसेच हिंदू संघटक नारायण गुरू अशांचे स्मरण आम्हाला प्रेरणा देते.
संघशक्तिप्रणेतारौ केशवो माधवस्तथा
स्मरणीयाः सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥३१॥
संघनिर्माता डॉ. हेडगेवार व संघविस्तारक गोळवलकर गुरूजी यांचे स्मरण सदैव चैतन्यदायी भासते.
अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरण संसक्तहृदयाः
अनिर्दिष्टाः वीराः अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः
समाजोद्धर्तारः सुहितकर विज्ञान निपुणाः
नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ॥ ३२॥
या भारतवर्षात असे अनेक ईश्वरी आविष्कारास जवळ असणारे महापुरुष होऊन गेले ज्यांची नावे वर उल्लेखित नाहीत. असेही अनेक अज्ञात वीर होऊन गेले ज्यांनी रणांगणावर शत्रूचा विध्वंस केला. त्याचप्रमाणे अनेक समाजोद्धारक व उपयुक्त विज्ञानाविष्कारात निष्णात असे दिग्गज होऊन गेलेत. पण त्याची नावे ज्ञात नाहीत. अशा सर्व महात्म्यांना आमचे वंदन आहे.एकात्मतास्तोत्राची अखेर त्यांच्या स्मरणाशिवाय होऊच शकणार नाही.
इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत्
स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखंडं भारतं स्मरेत् ॥३३॥
हे एकात्मतास्तोत्र जो श्रद्धेने म्हणेल तो राष्ट्रभक्त अखंड भारताचेच स्मरण करेल. यात संशय नाही.
॥ भारत माता की जय ॥
चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवनहेतूच्या जवळ घेऊन जात असते. मग निर्माण होते कुतुहल. की खरंच,जीवनाचा हेतू काय असावा ? अनादी कालापासून मनुष्याला हे कोडे कुतुहलाचे ठरलेले आहे.आणि यातूनच मनुष्य जीवनाची वाटचाल करत असतो.
मानवी मन मुळातच संवेदनशील असते.ज्या सृष्टीतील चराचरांनी त्यांना घडवले त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेलं या विश्वासातूनच प्रातःस्मरणीय एकात्मता स्तोत्र अर्थात भारतभक्तीस्तोत्राची रचना झाली असावी. मनुष्यस्वभाव समाजशील असल्यामुळे,विचार हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे आणि हे स्तोत्र तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे की आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल तर आपण हे स्तोत्र मुखोद्गत केलेच पाहीजे. एवढेच नव्हे तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहीजे.
सर्वेश फडणवीस
एकात्मता स्तोत्रावरील खूप सखोल सोपे सरळ असे चिंतन... सर्वेशजी...
ReplyDeleteखूप छान,मी गेली अनेक वर्ष मी हे बहुतेक रोज म्हणतो. पण त्याचा अर्थ आज समजला धन्यवाद
ReplyDelete