वीणा पाटील यांच्याशी १५ मे अर्थात जागतिक कुटुंब दिवसाच्या दिवशी संध्याकाळी संवाद साधता आला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता आले. आज अनेक कुटुंबांना त्यातील माणसांना आणि वीणा वर्ल्डच्या संपूर्ण कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवण्याची ताकद वीणा पाटील यांच्या रक्तात असल्याचे जाणवते. खरंतर मनात दडपण होते की त्यांच्याशी कुठून आणि कसा संवाद साधावा पण त्यांच्या संवादातून त्यांचा प्रवास उलगडत गेला आणि जवळपास सव्वा तासाने एका योग्य ठिकाणी तो थांबला. वयाच्या ५० व्या वर्षी एखादा नवा उद्योग सुरू करतांना मनाची जी अवस्था असेल याची कल्पनाच करू शकत नाही. सामान्य माणूस या टप्प्यावर उत्तरायणाची स्वप्न रंगवत असतो पण वीणा पाटील यांनी यशस्वी उद्योजिका म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. आज वीणा वर्ल्ड ही पर्यटन व्यवसायातील अग्रणी संस्था त्यांनी उभी केली. तीस हुन अधिक वर्षांच्या फक्त अनुभवाच्या शिदोरीवर हा प्रवास सुरू झाला आणि आता प्रवास विश्वनिर्मितीकडे आहे. वीणा वर्ल्डची वाटचाल यशोशिखरावर आहे. मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा, नावीन्य,कार्यतत्परता,सातत्य आणि जिद्द हे जीवनाचे सूत्र त्यांच्यात पूर्णपणे भिनले आहे.
असं म्हणतात की, परीसाच्या स्पर्शाने लोखंडाच सोनं होतं
पण वीणा वर्ल्ड च्या माध्यमातून वीणा पाटील यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने ते प्रत्यक्ष अनुभवले आहें. त्यांच्याशी बोलतांना सकारात्मकता आणि आत्मविश्वास ह्या शब्दांचे मोल लक्षात आले. आजही कोरोना काळात त्यांनी त्यांच्या स्टाफमधील प्रत्येकाच्या मनात विश्वास आणि हे ही दिवस जातील आणि उद्याचा दिवस हा आपला असेल इतका आत्मविश्वास निर्माण केला आहे. कारण त्यांना पूर्ण खात्री आहे की येणारा काळ पर्यटन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असणार आहे. हा काळ आव्हानात्मक असला तरी पर्यटकांशी सतत संपर्कात राहणे हे त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे वाटते. त्यामुळे टूर्स जरी काही काळ बंद असतील तरी काम हे आजही नियमितपणे सुरू आहे.
कौटुंबिक श्रीमंती वीणा पाटील यांना फार लाभली आहे. वडील केसरी पाटील यांच्या शिस्तीत त्यांना व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले त्या सांगतात की,"जर तुम्हाला उद्या उद्योजक व्हायचे असेल तर ते धडे लहान वयात द्यायला हवे." वीणा पाटील यांचा जन्म एका लहानशा गावात झाला जिथे त्यावेळी एस. टी. सुध्दा येऊ शकत नव्हती. गावाचे पाटील असून सुद्धा वडिलांच्या तालमीत त्या तयार झाल्या आहेत. शेतातील पपईचे काप करून ते विकायचे आणि त्या पैशातून मासे आणून खायचे ही वडिलांची शिकवण होती. सुरुवातीला त्यांच्या प्रवासात त्यांची आई सावलीसारखी सोबत असायची कारण मुलीने एकटे बाहेर जाऊ नये ही आपल्या संस्कृतीची शिकवण होती. पण पुढे लग्न झाल्यावर त्यांचे यजमान सुधीर पाटील यांनी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली कारण वीणा पाटील यांचे वर्षातले निम्मे महिने विमान प्रवासात असायचे. त्यांची मुले नील आणि राज लहान असतांना त्यांना कधीही आई घरात नाही याची उणीव भासली नाही कारण त्यांना घरातून संस्कार मिळाले होते की आई कामानिमित्त, पैसे कमवण्यासाठी बाहेर आहे आणि आज वीणा पाटील म्हणजे पर्यटन हे समीकरण दृढ झाले आहे.
वीणा वर्ल्ड ची सुरुवात २०१३ साली झाली आणि असं म्हणतात की एक महिला दुसऱ्या महिलेला समोर जाऊ देत नाही अथवा मदत करत नाही पण वीणा पाटील म्हणतात की सगळ्या महिलांनी त्यांना मदत केली कारण वीणा वर्ल्ड ची पहिली टूर ही लेडीज स्पेशल होती आणि त्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. खरंतर 'वीणा वर्ल्ड' हे नाव राज ठाकरे यांनी सुचवले आहे. आज मराठी माणसांची आवड,त्यांचा कल आणि प्राधान्य लक्षात घेता वीणा पाटील यांनी पहिल्यांदा मराठी माणसांसाठी, मराठी टूर मॅनेजर सह युरोप,अमेरिका टूर्स सुरू केल्या म्हणून आज अनेक मराठी टूर ऑपरेटर्स युरोप- अमेरिका टूर्स करताना दिसतात आणि त्यामुळे पर्यटक वीणा वर्ल्ड सोबत जाणे पसंत करतात.
वीणा वर्ल्ड वेगळं झाले कारण कुटुंब मोठे झाले की प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळणे फार गरजेचे असते आणि ते जर आपण देऊ शकलो तर जास्त काही चांगलं निर्माण होऊ शकतं आणि त्यातून हा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला वीणा पाटील यांच्या राहत्या घरी वीणा वर्ल्डच्या कामाची सुरुवात झाली. साधारणपणे ३०-३५ लोक रोज सकाळी ९- सायं ७ काम करत असत. त्यानंतर वीणा पाटील त्यांच्याकडे असलेल्या खानसामाच्या मदतीने स्वतः काही खायला करत असत. ते दिवस म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. ते सारे आठवले की वीणा पाटील आजही त्या आठवणींच्या गावी काही काळ स्थिरावतात आणि त्यावर भरभरून बोलतात. पुढे कामाचे स्वरूप वाढले आणि वसई विकास बँकेने ना नफा ना तोटा या तत्त्वाने ६ कोटी कर्ज मंजूर केले आणि पर्यटकांच्या विश्वासातून १ वर्षात रीतसर ते फेडू शकले. आज वीणा वर्ल्डच्या प्रवासाबद्दल प्रत्येक मराठी माणूस जाणून आहे. तेथील प्रत्येक शिलेदाराने ध्येय ठेवून जिद्दीने, मेहनतीने वीणा वर्ल्ड एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. माणूस हा फक्त पैशासाठी काम करीत नाही तर तो आपल्या कामामध्ये आपले समाधान शोधत असतो आणि हेच कारण आहे की वीणा वर्ल्ड मधील प्रत्येक कर्मचारी एकमेकांत बांधल्या गेले आहे. वीणा पाटील अभिमानाने म्हणतात की,"veena world is really blessed by the people ".
या क्षेत्रांत नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्यांना त्या सांगतात की, "ध्येय निश्चित करा,त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग ठरवा आणि मग जिद्दीने मार्गक्रमण करायला शिका. अडचणींची पायरी व्हा, अडथळ्यांचा आधार घेऊन उडी मारा आणि संकटांचे संधीत रुपांतर करा ही त्यांची शिकवण आहे." आज त्या स्वतःच्या लेखनातून प्रसंगी स्तंभलेखनातून तीच पारदर्शकता,स्ट्रॅटेजी त्या कायम सांगत असतात. २५ हुन अधिक वर्षे लेखन प्रवासाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आपल्या घरचा संवाद जाणीवपूर्वक, विचारपूर्वक असावा ह्याबद्दल त्या आग्रही आहेत त्यातून आत्मविश्वास निर्माण होईल आणि सहज बदल घडू शकेल हा त्यांना विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत डिसिजन घेण्याची क्षमता वाढवता आली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचे एक वाक्य मनात घरून गेले त्या म्हणतात, " माझ्या स्पर्धकांनी माझी अधिकाधिक कॉपी करावी म्हणजे मला अधिक नवं सुचत जातं." बहुदा यशस्वी उद्योजकाचे हेच वेगळेपण आहे.
कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरणार असेल तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार जगभर ज्यापद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका होती पण जानेवारीत थोडं सुरळीत असतांना एका महिन्यात दहा हजार बुकींग वीणा वर्ल्ड मध्ये झाल्या. शेवटी मर्यादित क्षमता लक्षात घेता अनेकांना थांबवावे लागले. पण आता सगळं सुरळीत झालं की अनेकांची जगभ्रमंती पुन्हा सुरू होणार हे निश्चित आहे. कारण मानवी मन एका ठिकाणी फार काळ स्थिर राहत नाही त्याला बदल हा हवाच असतो त्यामुळे पर्यटन हे अधिक व्यापक होणार आहे हा विश्वास त्यांना आहे.
आज लॉकडाऊनमुळे घरात असतांना अनेक कामांना वेळ देता येतोय याबद्दल त्या आनंदी आहे. आजही त्यांची पहिली प्राथमिकता ही सकाळी १०- सायं ७ वीणा वर्ल्ड च्या कामाला आहे. त्यानंतर गार्डनिंग,योग,ध्यान,वाचन,पॉडकास्ट ऐकणे,नेटफलिक्स वेब सिरीज बघणे आणि खरंतर गेली कित्येक वर्षे त्यांना असं घरात राहणे जमलेच नाही पण या आलेल्या परिस्थितीमुळे त्या घरात आनंदी आहेत. रोज रात्री १० ला दिवस संपून पहाटे ५ ला त्यांचा दिवस सुरू होतो.अमूलाग्र बदल घडवत जिद्दीने त्यांनी वीणा वर्ल्डचा आलेख सतत वर्धिष्णू ठेवला आहे. सतत काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न पर्यटकांना वीणा वर्ल्ड कडे आकर्षित करणारा आहे. आज त्यांचे सहकारी,मित्र, वेगवेगळे उद्योग,व्यवसाय करून आर्थिक अडचणींवर मात करत आहेत कारण त्या म्हणतात की रिकामे बसु नये त्याने मनात वेगवेगळे विचार येतात आज आलेल्या अडचणींवर मात करण्याची आवश्यकता आहे. शेवटी बोलण्याच्या ओघात त्यांनी छान सांगितलं ' बचेंगे भी,लढेंगे भी और जीतेंगे भी '. हीच सकारात्मकता आणि हाच विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा हाच या लेखमालेचा उद्देश आहे. वीणा पाटील यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि वीणा वर्ल्ड च्या प्रवासाने अशीच जगभ्रमंती पर्यटकांना उत्तरोत्तर होत रहावी हीच सदिच्छा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख२
#VeenaWorld Veena World
सर्वेश, तुला धन्यवाद द्यावेसे वाटतात. खूप सुंदर लेखमाला सुरु केली आहेस. मी तुझा नियमित वाचक आहे.
ReplyDeleteउत्तम अभिव्यक्ती.
खूप छान शब्दांकन केले आहे. वीणा पाटील यांचा कॉलम खरंच वाचनीय आहे. खूप छान लिहितात.
ReplyDelete