Saturday, February 4, 2023

◆ राष्ट्रांकुर - कंपनी हवालदार मेजर पिरुसिंग - १९४८


भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे चौथे मानकरी मेजर पिरुसिंग आहेत. त्यांचा जन्म राजस्थान येथील लष्करी परंपरा लाभलेल्या राजपूत शेतकरी कुटुंबात २० मे १९१८ रोजी रामपुरा बेरी या खेड्यात झाला. बेरीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले परंतु शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करु लागले. सुरुवातीपासून त्यांनी सैन्यात भरती होण्याचा ध्यास घेतला होता. वय कमी असल्यामुळे त्यांना दोनदा प्रवेश नाकारण्यात आला. अखेर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची राजपुताना रायफल्स क्रमांक सहाच्या बटालियनमध्ये निवड झाली. 

एक वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणानंतर त्यांची पंजाबमध्ये नेमणूक झाली. सैन्यदलात शिक्षणावर विशेष परिश्रम घेऊन त्यांनी ‘इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन’ आणि इतर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. पुढे त्यांना लान्सनायक म्हणून पदोन्नती मिळाली. मे १९४५ मध्ये त्यांना कंपनी हवालदार मेजर म्हणून पदोन्नती मिळाली परंतु ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यापदावर ते रुजू झाले. दुसऱ्या महायुद्घानंतर एप्रिल १९४६ च्या सुमारास त्यांना ‘कॉमनवेल्थ ऑक्युपेशन फोर्सेस’ च्या सेवेत घेण्यात आले आणि त्याकरिता ते जपानला गेले. तेथे ते सप्टेंबर १९४७ पर्यंत कार्यरत होते.

याच सुमारास देशाची फाळणी होऊन जम्मू-काश्मीरमध्ये विद्वेषाचा उद्रेक झाला आणि पाकिस्तानने छुपे युद्घ पुकारले. पिरु सिंग आणि त्यांच्या बटालियनच्या सैनिकांना विमानाने काश्मीरखोऱ्यात आणले गेले. त्यांच्यावर घुसखोरांना हुसकावून लावण्याची कामगिरी सोपविली गेली. १९४८ च्या उन्हाळ्यात झालेल्या लढाई मध्ये पिरु सिंगांनी पिरकंठी आणि लेडीगली ही ठिकाणे काबीज करताना महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. म्हणून त्यांची दारापरी या सुमारे ३३६ मी. उंच भागात पुढील लष्करी कारवाया करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

डी-कंपनीचे हवालदार मेजर पिरुसिंग यांच्यावर टिथवालच्या दक्षिणेस असलेल्या टेकडीवर हल्ला करून, ते ठिकाण ताब्यात घेण्याची जबाबदारी आली. शत्रुपक्षाने त्या ठिकाणावर आपला ताबा प्रस्थापित केला होता आणि सर्व वाटा रोखून धरल्या जाव्यात यासाठी मेडियम मशीनगन (एम.एम.जी.) बसवल्या होत्या. जेव्हा आपण हल्ला केला, तेव्हा शत्रुपक्षाने एम.एम.जी. चा मारा केला आणि खंदकावरून खाली हातगोळे फेकले. पिरुसिंग त्यावेळी कंपनीच्या पहिल्या तुकडीत होते. त्यांच्या तुकडीतील अर्धेअधिक लोक शहीद झालेले अथवा जखमी झालेले असतानाही ते डगमगले नाहीत. गोळ्यांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होऊन त्यांचे कपडे फाटले होते. पण तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते शत्रूवर चालून गेले. चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ वाहत होते, डोळ्याला जखम झाली होती, तरी त्या अवस्थेत खंदकामधून बाहेर पडत त्यांनी शत्रूच्या पुढच्या ठिकाणावर हातगोळे भिरकावले. पुन्हा युद्धाची आरोळी ठोकत, हवालदार मेजर पिरुसिंग दुसऱ्या खंदकातून बाहेर पडले आणि तिसऱ्या खंदकाकडे झेपावताना, त्यांनी १८ जुलै १९४८ रोजी आपल्या शौर्यपूर्ण एकाकी लढतीने आपल्या साथीदारांपुढे असीम धैर्याचा वस्तुपाठ घालून दिला आणि त्यातच त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना १९४८ साली मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 

- सर्वेश फडणवीस 

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day4





No comments:

Post a Comment