Wednesday, September 28, 2022

⚜️ आधारवेल : पराक्रमी राणी दुर्गावती ।।

मध्यप्रदेश हे राज्य स्त्री राज्यकर्त्यांनी आपल्या पराक्रमाने, नेतृत्वाने, युद्ध कौशल्याने गाजवले नव्हे तर आजही त्यांच्या पराक्रमाचा ठेवा नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. त्यांच्यामुळे मुघल शासकांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. याच मुघल शासकांना हादरवणारी एक शूरवीर वीरांगना राणी दुर्गावती आहे. इतिहास हा ऐतिहासिक असतो. हा ऐतिहासिक ठेवा पिढी दर पिढी हस्तांतरित करतांना तो मुळात आपल्याला माहिती असायला हवा असे कायमच वाटते. अपार पराक्रमी, शौर्यवान, आणि सुव्यवस्था ठेवणारी राणी दुर्गावती या आधारवेलीचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

राणी दुर्गावती यांचा जन्म राजपूत चंदेल राजा किरत राय यांच्या कुटुंबात झाला. राणी दुर्गावती यांचे वडील हे सुध्दा शूरवीर योद्धे होते ज्यांनी महमूद गजनी ह्या क्रूर लुटकर्त्याचा पराभव केला होता त्यामुळे स्वाभाविकच राज्यशासन आणि युध्द कौशल्याचे बाळकडू राणी दुर्गावती यांना लहानपणापासून घरातूनच मिळाले होते. तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी यात दुर्गावती निपुण होत्या. ५ ऑक्टोबर १५२४ साली दुर्गाष्टमी या तिथीला जन्म झाल्यामुळे "दुर्गावती" असे त्यांचे नामकरण करण्यात आले.

पुढे राणी दुर्गावती यांचा विवाह गोंड राजवंशातील राजा दलपत शाह यांच्याबरोबर झाला. राजा दलपत शाह यांच्याकडे गोंडवाना राज्याची जबाबदारी त्यांचे वडील राणा संग्राम सिंह यांनी दिली होती, परंतु विवाहाच्या नेमक्या आठ वर्षानंतर राजा दलपत शाह यांचा मृत्यू झाल्याने राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्गावती यांनी माळव्याच्या बाज- बहादुराचा हल्ला आपल्या शौर्याने आणि संघटनकौशल्याने परतवून गोंडवानाचे रक्षण केलें. इतकेच नव्हे तर मोंगलांच्या जोरदार हल्ल्यालाही त्यांनी यशस्वी रीतीनें तोंड दिलें. सधनतेत या राज्याचा नंबर बराच वर लागत होता. चोहो बाजूंनीं आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या धोरणानुसार अकबराने इ. स. १५६४ मध्ये पहिल्या असफखानास गोंडवनावर स्वारी करण्यास पाठविलें. या वेळीं वीर नारायण या आपल्या अल्पवयी मुलाच्या नांवानें राणी दुर्गावती मोठ्या हुशारीनें राज्य- कारभार पहात होती. अबुल फजलनें आपल्या दैनंदिनीत असे नमूद करून ठेवले आहे की राणीचे अगदी बारीकसारीक गोष्टीकडेही लक्ष असे. संकटांची पूर्वकल्पना करून त्यांना तोंड देण्याची तयारी करून ठेवण्याची त्यांची हातोटी असामान्य होती.

अकबराच्या दरबारात राणी दुर्गावतीच्या शौर्य आणि साहसा सोबतच तिच्या रूप सौंदर्याची वार्ता पसरली. त्यावेळी गोंडवाना राज्यावर राणी दुर्गावती ही एक महिला राज्यकर्ती आहे याची सुजात खान याला माहिती होती व त्याने दुर्गावतीला सामान्य स्त्री समजून गोंडवाना वर आक्रमण करण्याची योजना आखली पण पुढे त्यात त्याचा दारूण पराभव झाला. या ऐतिहासिक विजयामुळे राणी दुर्गावतीने नावलौकिक मिळवला आणि आपल्या पराक्रमाने मुघलांची दाणादाण उडवली होती.

बाजबहादुर आणि इतर शत्रूंना वारंवार तोंड दिल्यामुळे राणीला युद्धविषयक अनुभवही खूप मिळाला होता. त्यांच्या सैन्यांत वीस हजार उत्कृष्ट घोडेस्वार होते. राणी दुर्गावती यांना मांडलिक राजाकडून अमाप द्रव्यं मिळालें होतें. बंदूक आणि बाण मारण्यांतील त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. शिकारीचा त्यांना विलक्षण नाद होता. आसमंतात् वाघ आला आहे असें समजलें तर त्याला ठार केल्याखेरीज त्या पाणीसुद्धां घेत नसे. पहिला असफखान चालून येत आहे असे समजतांच त्यांनी प्रतिकाराची जय्यत तयारी केली. शत्रूच्या सामर्थ्याची कल्पना जेव्हां त्यांच्या अधिकाऱ्यांनीं त्यांना दिली तेव्हां त्या म्हणाल्या, " तो न्यायी बादशहा (अकबर) जर स्वतः आला असता तर मी त्याचा सन्मान करणे इष्ट ठरलें असतें. पण या यः कश्चित् सरदारापुढें नमणें मी कधींच मान्य करणार नाहीं. यांपेक्षां धारातीर्थी मरण आलेले शतपटीनें बरें. " एवढे बोलून त्यांनी अंगावर चिलखत चढविलें आणि हत्तीवर स्वार झाल्या. सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या त्या शूर राणीकडे पाहून प्रजाजनांचे डोळे आदरानें भरून आलें होते. खानाच्या सैन्याचा त्यांनी लागोपाठ दोनदां बीमोड केला. तसाच रात्रभर पाठलाग चालू ठेवून त्याचा पूर्ण पराभव करावा असा त्यांचा विचार होता. पण त्यांचे अधिकारी या गोष्टीस कबूल होईनात.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं पुन्हां युद्ध सुरू होतांच राणीबरोबर फक्त तीन सैनिक उरले. त्यांनी शत्रूशीं मुकाबला केला. शेवटी त्या खूप जखमी झाल्या. त्यांच्या सेवकांनीं त्यांना सुरक्षित स्थळीं नेण्याचें ठरविलें, पण रणांगणात मृत्यु अगर विजय याखेरीज तिसरा विचार त्यांना पसंत पडेना. त्या आपल्या सेवकांना म्हणाल्या,
" युद्धांत पराजय तर झालाच आहे. आणखी पळून जाण्याच्या अपकीर्तीची त्यांत भर कशाला ? शत्रूच्या हातीं माझें नखही
लागतां कामा नये. हा भाला घ्या व माझ्या हृदयांत खुपसून मला वीरमरण द्या. " अशा रीतीनें सुमारें १६ वर्षे राज्य करून राणी दुर्गावती यांनी देशासाठी शेवटी आपले प्राण वेंचले.

अनेक वर्षे या भागांत प्रशासक म्हणून काम केलेल्या स्लीमन याने 'रॅम्बल्स् ऍण्ड रीकलेक्शन्स् ऑफ् ॲन् इंडियन् ऑफीशिअल' या नांवाचें एक पुस्तक लिहिलें आहे. राणी दुर्गावती विषयीं त्यांत तो म्हणतो, " दोन टेकड्यांमधील चिंचोळ्या पट्टींत ज्या ठिकाणीं राणी दुर्गावतीनें देह ठेवला तेथें त्यांची छोटीशी समाधी बांधलेली आहे. या समाधी शेजारी दोहों बाजूंस दोन मोठ्या आकाराचे गोल दगड आहेत. प्रचलित लोककथेनुसार राणीच्या नौबतींनींच या दगडांचें रूप धारण केलें आहे. मध्यरात्रीच्या सुमारास येथून चौघड्यांचा आवाज येतो. आपल्या गतप्राण झालेल्या शेकडों योद्धयांना राणी जणूं या आवाजानें पुन्हां युद्धास उभे राहण्याचे आव्हान करीत असते. " राणीच्या समाधीच्या बाजूनें जाणारे शेकडो भाविक लोक आसपासचे स्फटिकाप्रमाणे चकचकीत छोटे दगड उचलून मोठ्या आदराने ते समाधीवर वाहतात.

राणी दुर्गावतीच्या स्मृति जबलपूर जवळील नर्रई गावातील लोकांनीं शेकडो वर्षे अतिशय आदराने जतन केल्या आहेत. स्वाभिमानी, शूर आणि साहसी राणी दुर्गावतीला वीरमरण याच ठिकाणी आले. आज तिथे राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे आणि तिच्या स्मृती निरंतर अनेकांना प्रेरणा देणाऱ्या आहे. गोंडवाना राजवंशाची आधारवेल असणाऱ्या राणी दुर्गावती यांना नमन.

✍️ सर्वेश फडणवीस

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळचौथी

No comments:

Post a Comment