भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात श्रीगणेश चतुर्थी यादिवशी पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. आज हा उत्सव जगभरात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा होताना दिसतो. या गणेशोत्सवाचे औचित्यसाधत नागपूरचे आराध्यदैवत असलेल्या वरदविनायक अर्थात टेकडी गणपतीच्या गाभाऱ्यात आज आपण दर्शनार्थ जाणार आहोंत.
‘ॐ नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या,जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’’ जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री. गणेशस्तवनाने केला आहे. ‘‘देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी...’ओम हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा प्रकाशक म्हणजे श्रीगणेश आहे. श्रीगणराजांना अग्रपूजेचा मान असल्याने ज्ञानेश्वर महाराज गणपतीस नमस्कार करतात. आजही घरातील मंगलकार्य करतांना श्री गणेशास अग्रपूजेचा मान आपल्याकडे देतात. नागपूरातील टेकडीचा गणपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे टेकडी गणपती देवस्थान चिरपुरातन असून सध्या नव्या रुपात बघायला मिळत आहे.
विदर्भातील संस्कृती अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. त्यातही नागपूर प्रांतात ताम्राश्य संस्कृती होती. नयाकुंड, माहूरझरी, पवनार, टाकळघाट, कौंडण्यपूर येथील उत्खननातून प्राचीन संस्कृतीवर चांगलाच प्रकाश पडतो. नागपूर प्रांतात नागसंस्कृती होती. हरीवंशातही तसाच उल्लेख आलेला आहे. नागवंशीय राजे यांचा संबंध सातवाहन अन् वाकाटकांशी घनिष्ठ होता. भारशिव नाग हा सर्वश्रेष्ठ नाग होता. शिशंकु रुद्रसेन वाकाटक होता. तो भारशिव नागाचा नातू अर्थात मुलीचा मुलगा होता. त्यावेळी मातृसत्ताक पद्धती होती. त्यामुळे त्या नात्याने रूद्रसेन राज्यावर बसला होता. अन् भारशिवाचे राज्य हे वाकाटकाचे राज्य झाले. पवनी येथील शिलालेखात भारशिव नागाचा उल्लेख आहे. विदर्भात पद्मावती नवनागवंशात प्रसिद्ध असे तेरा नाग राजे होऊन गेले.पद्मावतीच्या नागाचा शेवटचा नाग राज म्हणजे गणपती होता. याची गणपतिन, गजेन्द्र गणपती आणि गणवेंद्र अशी नावे होती. गणपती नाग हा पश्चिम मालवाचा स्वामी होता. हा गणेशभक्त होता असा उल्लेख आहे. त्याने गणेश टेकडीवर 'गणेशपीठ' स्थापन केले असावे असे काही अभ्यासकांचे मत आहे.
प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करतांना एक गोष्ट सहजतेने लक्षात येते की नागपूरचा प्राचीन इतिहास फार मोठा आहे. नागपूरला बारा टोळ्या होत्या. लोखंडी पूलापलीकडील सीताबर्डी, धंतोली आणि तेलंगखेडी येथे त्या टोळ्या वास्तव्यास होत्या. यादवाचं अर्थात गवळ्यांचं राज्य सीताबर्डी येथे होतं. सीताबर्डी ही टोळी सर्वात सधन होती. गवळ्यांचं अन् गोंडांचं तसेच गोसाव्याचं राज्य अत्यंत सधन होतं, यांत शंका नाही. टेकडीवर गायी-म्हशी चरायच्या परंतु त्या काळात अगदी वरच्या भागाला शिव मंदिर होत. आजही ते तेथे आहे. टेकडीच्या पायथ्याला गणेश मंदिरे होती. एक मुख्य गणपती अन् त्यांच्या बाजुला दुसरा जो गणपती आहे त्याला 'फौजेचा गणपती' म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. टेकडीवरील गणेश मंदिर अत्यंत प्राचीन आहे यात शंका नाही. वाकाटकाच्या नंतर यादवांच्या काळांत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. बाराव्या शतकात हेमाद्री पंडितांनी ते देऊळ बांधले होते. त्याकाळांतील खचलेले, तुटलेले अनेक खांब आणि मूर्ती स्वतः मी बघितल्यात,' असे श्री अ. ल. लिमये यांनीही लिहून ठेवले आहे.
बख्त बुलंदशहाने देवगड वरून आपली राजधानी नागपूरला आणली अन् बारा टोळ्या एकत्रित करून त्याने आपली राजधानी इथे वसविली. बख्त बुलंदशहा देखील पराक्रमी पुरूष होता. त्याने राज्यविस्तार वाढविला. इ.स. १३१८ साली मुबारक खिलजी याने यादवांचे राज्य खालसा केले. त्यावेळी नागपूर परगण्यात गवळ्यांची लहान-लहान राज्ये होती. गोंडवाना परिसरात गोंडांची राज्ये होती. नागपूरचा त्यात अंतर्भाव होता. बख्त बुलंदशहानंतर चांद सुलतान गादीवर बसला. त्यांने नागपूरच्या वैभवात भर घातली. शुक्रवारी तलावाचे नूतनीकरण केले. पूर्वी हा तलाव जुम्मा तलाव म्हणून ओळखल्या जात होता. टेकडी गणपतीच्या पायथ्यापर्यंत शुक्रवारी तलावाचे पाणी पसरलेले होते. परंतु टेकडीवरच्या खचलेल्या देवळाकडे त्याचे लक्ष गेले नाही. चांद सुलतानाचा दासीपूत्र वलीशहाने सत्ता बळकावली अन् चांद सुलतानाची पत्नी रणकुंवर अन् तिच्या मुलांना कैदेत टाकले. पुढे रणकुंवर हिने यवतमाळ येथे असलेल्या पहिल्या रघुजीराजांना मदत मागितली. रघुजीराजांनी वलीशहाला पराभूत केले. त्यावेळी रणकुंवरने राज्याचे तीन भाग केले, दोन भाग आपल्या दोन मुलांना देऊन तिसरा भाग रघुजी राजाला दिला. रणकुंवरची दोन मुले म्हणजे बहाणशहा व अकबरशहा हे गादीवर बसले. बहाणशहाने निजामाचा आश्रय घेतला. शेवटी रघुजी राजांचीच सत्ता प्रस्थापित झाली. रघुजी राजाने बंगालपर्यन्त राज्यविस्तार केला. दुसऱ्या रघुजीराजाने नागपूरचे वैभव वाढविले. भोसल्यांची फौज सीताबर्डीवर राहत होती. त्यांनी राज्यविस्तार केला. राज्य अन् भोसल्यांचे नागपूर आणि त्यांच्या राज्याला वैभवाचे दिवस प्राप्त झाले होते. परंतु त्यावेळी या टेकडीवर भोसल्यांची फौज राहत होती.
मुसलमान काळात या देवळाकडे दुर्लक्ष झाले असणे साहजिक आहे. यादवांची सत्ता संपल्यावर या देवळाकडे दुर्लक्ष झाले. कालौघात देऊळ खचले, मूर्ति दबल्या गेली. देवळाच्या दगडाचा उपयोग चांद सुलतान याने शुक्रवारी तलावाच्या बांधकामासाठी केला. हा तलाव सुंदर करून या तलावाचे पाणी शेतीसाठी वापरण्यात येत होते. मूर्ती मातीच्याखाली चांगलीच दबल्या गेली होती. १८६६ मध्ये रेल्वे स्टेशन ते सुभाष पुतळा या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले. खोदकाम करतांना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती सापडली होती. त्यामुळे ती पूजेतील मूर्ती होती यात काही शंका नाही. परंतु त्यावेळी हा रेजिमेंटल भाग असल्यामुळे अधिक खोदकाम करता आले नाही. त्यावेळी श्री भीमराव कुळकर्णी, शंकरराव जोशी हे पुजारी होते. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.
मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. हा गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा आणि सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. नागपूरला आलात की आवर्जून दर्शनार्थ जावे असेच हे टेकडी गणपती देवस्थान आहे.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment