खरंतर अष्टविनायक म्हटले की मोरगाव-लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. पुराणातील एका श्लोकामुळे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने उलगडली गेली. यातूनच अष्टविनायक यात्रेला महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ आहे. फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश आहे. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातही श्रीगणेशाची स्थाने असून, त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. प्रवासासाठी पुरेशा संधी नसतानाच्या काळात, प्रत्येक भागात गणपतीची देवस्थाने निर्माण झाली आणि स्थलकालसापेक्ष त्यांचा विकास होत गेला. त्यातच विदर्भातील या अष्टविनायकांचा विकास होत आहे.
दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून गणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळातो. वाकाटका नंतर प्रवर्शन राजाचे केळझर हे गांव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले राजे कोल्हापूर वरुन नागपूर ला स्थलांतरीत होण्यापूर्वी त्यांचा केळझर येथे काही काळ मुक्काम झाल्याची नोंद आहे. विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि काही देखण्या मूर्ती आजही पाहायला मिळतात. त्याची भव्यता आणि प्राचीनता लक्षात घेता आश्चर्य वाटतं आणि सहज हात जोडले जातात. गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्यासारखे आहेत. संपूर्ण माहिती घेत दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा सुफळ संपूर्ण होऊ शकते.
रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची दंतकथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर सुमारे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक नागरिक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे नाव प्रचलित आहे.
केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. आजही ही मूर्ती बघायला मिळते. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला काही भाविक सिद्धिविनायक असे म्हणतात.
एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते. वसिष्ठपुराण तसेच महाभारत यांमध्ये या मंदिराचे महत्त्व उल्लेखित आहे. दोन्ही धर्मग्रंथांमध्ये केेळझर गांवाचे नांव ‘एकचक्र नगर’ असल्याचा उल्लेख आढळतो. केळझर येथे काहीकाळ वसिष्ठऋषींचे वास्तव्य होते. वसिष्ठांनी भक्ती आणि पूजा यांकरिता या गणेशमूर्तीची स्थापना केल्याचा उल्लेखही आहे. त्याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो. वसिष्ठ पुराणाप्रमाणे या गणपतीचे नांव ‘वरद विनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ हे नांव आहे. हा काळ प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या पूर्वीचा असून त्यांच्या जन्मानंतर वसिष्ठऋषींनी येथील वास्तव्य सोडले असेही काहीजण सांगतात.
केळझर स्थित वरद विनायक अर्थात सिद्धिविनायक श्री गणेशमूर्ती १.४० मीटर उंच असून तिचा व्यास ४.४० मीटर आहे. ही मूर्ती अत्यंत मनमोहक आणि जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या श्री गणेशाची स्थापना पांडवांनीच केली असे गणेशकोषात नोंद आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून गणेशाला शेंदूर लेपन केल्या जाते. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून येणारे आहे. मंदिर परिसरात गणेशकुंड आहे. गणेशकुंडाची बांधणी दगडी चिर्यातील आहे. हा परिसर चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेला असून पावसाळ्यात हिरव्या कंच वनराईने तो अधिकच फुलून दिसतो. गावाच्या खोदकामात गंडकी पाषाणाच्या विष्णू मूर्तीसह अशोकचंद्र असलेला दगडही मिळाला आहे. येथील तलावात अनेक प्राचीन मूर्ती मिळाल्या आहेत. याशिवाय प्राचीन शिवपिंड सुद्धा आहे. १९९४ साली मंदिराचा जिर्णोद्धार करत असतांना पाण्याची गरज भासली तेव्हा मंदिर परिसरात उत्खनन करण्यात आलं. उत्खनन सुरु असतांना काही पुरातन मूर्ती आढळून आल्या. महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा उत्खननात मिळाली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे.
केळझर येथील वरद विनायक मंदिर विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे. मनाला शांती, सुख देणारा विघ्नहर्ता गणपती, अर्थात आपला सगळ्यांचा लाडका बाप्पा. जन्मोजन्मी त्याचा सहवास असाच लाभावा आणि त्याच्या सेवेत सदैव आपल्याला रममाण होता यावे एवढेंच त्याच्याकडे मागणे आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आनंदी वातावरण करत, मनाची मरगळ दूर करत प्रसन्नतेची पहाट अखिल विश्वावर होऊ दे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment