सध्या या लेखमालेत आपण प्राचीन मंदिराचा आढावा घेतो आहे. अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरातील गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जाऊन आलो आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील नंदीवर्धन अर्थात नगरधनच्या श्रीकोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आज जाणार आहोत. हे मंदिर फार पुरातन आहे. साधारणपणे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातील हे मंदिर असावे कारण विदर्भ आणि मध्यभारताचे सम्राट वाकाटक राजवंशाचा इतिहास या श्रीकोटेश्वर मंदिरात आजही बघायला मिळतो आहे. महापराक्रमी, बलवान, प्रजाहित दक्ष आणि सर्वधर्मसमभावी वाकाटक राजवंश म्हणजे विदर्भाची खरी ओळख आहे. वाकाटकांच्या राजवंशाच्या अनेक खुणा आजही या भागात आपल्याला बघायला मिळतात.
वाकाटकांची प्राचीन राजधानी नंदीवर्धन अर्थात आताचे नगरधन असून हे रामटेकपासून अवघ्या ४ किमी. अंतरावर आहे. रामटेकपासून दक्षिण दिशेस हे छोटेसे गाव डांबरी रस्त्याने जोडले गेले असून तेथे रामटेक, नागपूर, भंडाऱ्याहून बसने जाता येते. याच गावात श्रीकोटेश्वर नावाचे अति प्राचीन ऐतिहासिक शिवालय बघण्यासारखे आहे. हेच प्राचीन अर्वाचीन श्रीकोटेश्वर मंदिर आहे. नंदीवर्धन अर्थात नगरधन राजधानीतून वाकाटकांनी अवघ्या महाराष्ट्र, विदर्भ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर स्वतःचे राज्य केले. सम्राट समुद्रगुप्ताची नात व चंद्रगुप्त द्वितीय यांची कन्या प्रभावती नंदीवर्धन राजाच्या राजपुत्राची रुद्रसेनाची अग्रमहिषी (पट्टराणी) होती. उत्तरेत अर्थात उत्तरभारतात गुप्त राजे, तर दक्षिणेत वाकाटक सम्राट होते.
कोटेश्वर गाव तसे छोटेसेच कमी लोकवस्तीचे आहे. मंदिराच्या दिशेने जातांना आजूबाजूला दुकाने, घरे, गोठे, गोदाम आणि पाटलांचे वाडे, असून त्यात पश्चिमेच्या शिवारात श्रीकोटेश्वराचे मंदीर दिमाखात उभे आहे. श्री शिव कोटेश्वराचे मंदिर हेमांडपंथी मंदिर असून स्तंभ चतुर्भुजांकित आहेत. अंतराळ मात्र थोडे छोटे पण गर्भगृहात सुंदर शाळंकित शिवलिंग असून मध्यभागी त्या लिंगात खोल पोकळी आहे. या मंदिराची तीच विशेषता आहे. खरंतर ती पोकळी का आहे? त्याची पण एक कथा आहे. या गावातील एक गवळण इतर पंचक्रोशीतल्या गावात दूध वाटायची. पण दुग्ध वाटपाआधी ती प्रथम या महादेवाच्या पिंडीस अभिषेक करायची. तिला घरी परतायला विलंब होई. त्यामुळे तिच्या अज्ञानी पतीराजाने मनात शंका धरली आणि तो आपल्या पतिव्रता पत्नीचा पाठलाग करू लागला. देवळाजवळ येऊन, आता पत्नीला मारणार एवढ्यात पत्नीने या महादेवाला साकडे घातले. देवाधिदेव महादेव वाचव अशी गर्जना तिने केली आणि लगेच शिवलिंग भग्न पावले. त्या पवित्र पतिव्रतेस या महादेवांनी आपल्या पोटात घेतले. अर्थात ते भग्न शिवलिंग तसेच राहिले. पतीराज पुढे गावात आले. 'गवळण मात्र शिवलोकात पोहचली. तिच्या पतिव्रत्यास नगरधनच्या रहिवाशाचा विनम्र प्रणाम आहे. ही दंतकथा येथील लोकांना आजही मुखोद्गत आहे.
या शिवलिंगावर अष्टकोनी छत असून शिव पिंडीवर सतत दुग्धाभिषेक सुरू असतो. स्तंभ, छत, गणेशद्वार, प्रदक्षिणामार्ग, अवकाश, वितान, गवाक्ष सारेच प्रमाणबद्ध आहे. सभामंडपावर सपाट छत तर गर्भगृहात ऊर्ध्वगामी शिखर म्हणजे मंदिराची रचना आहे. इ.स.च्या चौथ्या शतकापासून बदलत बदलत वाकाटक राजवंश, राष्ट्रकूट राजवंश, परमार, यादव व पुढे गोंड, भोसले असे त्याचे आजचे स्वरूप संमिश्र आहे. मंदिराच्या आजूबाजूस प्रशस्त जागा आहे, भक्तनिवास असून महान तपस्व्यांच्या नाथ संप्रदायी मंडळींच्या नाम समाध्या आपल्याला मंदिराच्या उत्तरेस दिसतात.
पिंपळाखाली अनेक दगडी प्रतिमा आजही काळपट दाखवितात. शिव, गौरी, गणेश, हनुमंत, यक्ष, योगी यांच्या भग्न मूर्त्या असून केवळ नृसिंहाची (एकटा नृसिंह) छोटीशी शेंदूरलिंपीत प्रतिमा मात्र पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेकच्या, श्रीकेवलनृसिंह श्रीरुद्रनृसिंह प्रतिमा सारखीच ही पण छोटीशी आणि देखणी मूर्ती आहे. म्हणजेच केवळ नृसिंह मूर्तीचे पूजन जवळपास १००० वर्षे सुरू असले पाहिजे. या मंदिराच्या बाजूला सुंदर जलाशय असून त्यात कमळपुष्प डोलत असतात, पाणी स्फटिक शुभ्र, पण वृक्षांच्या सावल्या पडल्याने काळे भासते. बाजूला भक्कम तटबंदी, स्वयंपाकाची सोय, भांडीकुंडी, जलव्यवस्था सर्व उत्तम आहे. समोरचा दर्शनीय भाग अर्वाचीन अर्थात थोड्याफार प्रमाणात मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे पण प्रत्यक्ष मंदिर अतिप्राचीन आहे. अशा या श्रीकोटेश्वर अर्थात कोटे असलेला शिव म्हणजे तटबंदी युक्त शिवाचे दर्शन प्रत्यक्षात एकदा जाऊन बघण्यासारखे आहे.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment