Friday, August 5, 2022

विज्ञान परिमळू ..

काही घटना या स्वप्नवत वाटाव्या अशाच घडतात आपण जरी निमित्तमात्र असलो तरी ती घटना कायमस्वरूपी आनंद देणारी असते. असाच अनुभव यावेळी पुण्यात पोहोचल्यावर लगेच आला. गेली सहा दशके ज्यांनी आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे असे ज्येष्ठ संशोधक पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सरांची भेट ही कायमस्वरूपी लक्षात राहील अशीच होती. 'शोध नव्या भारताचा' पुस्तक वाचल्यावर सरांना एकदा भेटावे असे मनात होते. त्या पुस्तकाचा परिचय लिहिल्यावर सरांना तो मेल केला. मेल वर छानसा अभिप्राय आल्याने सरांशी अधिक जवळीक निर्माण झाली आणि त्यातूनच ही प्रत्यक्ष भेट होऊ शकली. या आधी दोनदा पुण्यात काही कामानिमित्त होतो पण सर एकदा लंडन आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात होते. सतत प्रवासात असल्याने यावेळी जसं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी गौरवग्रंथ - सोनचाफा विशेषांकाची तारीख समजली त्यानंतर लगेच सरांच्या भेटीची वेळ घेतली आणि सरांनी पण शुक्रवार २९ जुलै २०२२ ला आपण ४ वाजता भेटू असा रिप्लाय दिला. दिलेल्या दिवशी सकाळी पोहोचायचे अशी व्यवस्था होती पण पावसामुळे ट्रेन पाच तास उशिराने पुण्यात पोहोचली. सकाळी ९ ला पोहोचणारी ट्रेन दुपारी २.३० ला पुणे स्टेशनला पोहोचली. मनात विचार येत होता की सरांना कळवावे की थोडं लेट होईल पण धावपळ करत ३ वाजून ५६ मिनिटांनी सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. आधीचे सगळे सोपस्कार पार पडले आणि ४ वाजून ५ मिनिटांनी सरांच्या केबीनमध्ये प्रवेश केला. आधी तर स्वप्नवत वाटावे असेच सगळे वातावरणात होते. प्रवेश करता क्षणीच सर स्वतः खुर्चीतून उठले आणि सामोरे आले म्हणाले " या या, बसा.." 

नमस्कार केला आणि बसलो. ट्रेनमध्ये वेळ मिळाल्याने ठरवून गेलो होतो की कुठल्या विषयावर बोलायचे पण सरांनी आधी कौटुंबिक चौकशी वगैरे केली आणि मग विविध विषयांवर जवळजवळ सव्वा तास सर बोलत होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पुस्तकं दिसत होती. सरांच्या केबीनमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने पुस्तकांची रचना केलेली आहे. जिकडे बघावे तिकडे फक्त पुस्तकं आणि पुस्तकं होती. एका भिंतीवर १९९१ साली मिळालेला पद्मश्री, एका भिंतीवर २००० साली मिळालेला पद्म भूषण आणि त्यांच्या मागच्या भिंतीवर २०१४ साली मिळालेला पद्म विभूषण आहे. विविध पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या डाव्या बाजूला होती. पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण असे अनेक पुरस्कार तिथे छान रचून ठेवलेले आहे. हे सगळं बघतांना आश्चर्य वाटत होते आणि मनातून आदरयुक्त आपुलकीची भावना निर्माण होत होती. इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपुलकी, ममत्व आणि सर्वांविषयी प्रेम ही भावना स्पर्शून गेली. विविध विषयांवर बोलतांना सरांच्या अनुभवातून अनेक गोष्टी जाणून घेतांना आश्चर्य वाटत होते. 

बोलण्याच्या ओघात त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की सोशल मीडियावर शक्यतो सकारात्मक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करा. गेली ८ वर्ष झाले ते स्वतः ट्विटर वापरत आहेत पण त्यात फक्त चांगल्या सकारात्मक आणि माहितीपूर्ण ट्विट ते करतात असंही आवर्जून सांगितले. ते म्हणाले आतापर्यंत विज्ञान संशोधन, विज्ञान नेतृत्व आणि वैचारिक नेतृत्व या साधनांशी कामामुळे सतत एकरूप झालो आहे आणि आज भारताच्या तरुणांकडून मी खूप आशावादी आहे. भारतीय तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे त्यामुळे भारताचे भविष्य उज्वल आहे. तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत वाटचाल करावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. खरंतर संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य जगाला आश्चर्य वाटावं असच आहे. 'Reinventing India By Raghunath Mashelkar' अर्थात मराठी अनुवादित असलेलं 'शोध नव्या भारताचा'  या पुस्तकाबद्दलच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असतांना त्यांनी राष्ट्रपती भवनात आलेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्याला हेच पुस्तक भेट म्हणून देत होते. जवळपास ट्रकभर पुस्तकं त्यावेळी राष्ट्रपती भवनात गेली होती. 

त्यांच्या अनुभवांविषयी ऐकतांना स्फूर्ती मिळत होती. शेवटी ते म्हणाले, " कोणतही काम केलं तरी त्यात नैपुण्य मिळवा. आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल याचा विचार करा. कायमच शुभेच्छा आहेत." असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. वेळेची मर्यादा लक्षात घेता आम्ही बोलणं थांबवलं आणि पुन्हा भेटू या आशेने निघालो खरा पण निघतांना त्यांनी त्यांचे पुस्तक 'LEAP FROGGING TO POLE VALUNTING' हे भेट म्हणून दिले. त्यांनी फोटो काढण्यासाठी त्यांच्या सहाय्यकाला आवाज दिला. फोटो घेतला आणि नमस्कार करून निघालो. निघतांना पाण्याची बाटली सोबत दिली. असू द्या म्हणाले. हे क्षण आठवताना आजही मनात वेगळीच भावना निर्माण झाली आहे. हे शब्दबद्ध करण्याचं कारण इतकंच की ज्यावेळी हे वाचल्या जाईल तेव्हा पुन्हा तिथेच आहे ही भावना सतत स्मरणात राहील. ज्यावेळी २०१५ साली रिपब्लिक डे परेड साठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते त्यावेळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात, President Obama asked 'What science do you do? ' Mashelkar Sir responded by saying ‘I do science that works for all not just for some’. President Obama nodded in approval. खरंतर अशा माणसांची भेट होणें हाही ईश्वरी संकेत आणि पूर्वजन्मीचे संचित आहे असंच कायम वाटतं. आजच्या सोशल मीडियाच्या जगात गुरफटलेल्या तरुणांपर्यंत हा विज्ञान परिमळू  पोहचावा म्हणून हा लेखन प्रपंच आहे. 

सर्वेश फडणवीस 

नागपूर 


No comments:

Post a Comment