Saturday, September 24, 2022

निसर्गाची मुक्त नजाकत - मुक्तागिरी जैनमंदिर समूह !

मुक्तागिरी हे क्षेत्र विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमा रेषेवर असून विदर्भास ते जवळचे आहे. मुक्तागिरी हे जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मुक्तागिरीला ‘जैन धर्मीयांची काशी’ असेही म्हणतात. हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती पासून जवळपास ६५ कि.मी. दूर आहे. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या अतिशय महत्वाच्या क्षेत्रांपैकी हे एक आहे. याच मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आज जाणार आहोंत. 

जैन साधूंना वर्षा ऋतूत हिंसेच्या भीतीने फिरणे शक्य नसे. त्यामुळे ते एका ठिकाणी मुक्काम करत असत. सुरुवातीच्या काळात जैन साधू मनुष्य वस्तीपासून दूर असलेल्या गिरिकंदरात राहून तप करीत होते. नंतरच्या काळात डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये ते राहू लागले. ही लेणी म्हणजे जैन मंदिरेच होती. इ. स. पू. दुसऱ्या शतकात ओरिसा राज्यात उदयगिरीवर कोरलेले राणी गुंफा नावाचे जैन लेणे प्रसिद्ध आहे. सर्व भारतात अशी सुमारे २०० जैन लेणी किंवा गुहामंदिरे आहेत. अनेक ठिकाणी जैन साधूंच्या समाधीवर स्तूप किंवा चैत्य बांधलेले असून अशा स्मारकांच्या कडेने दगडी कठडे, नक्षीची प्रवेशद्वारे, दगडी छत्र्या, कोरीव काम केलेले दगडी खांब आणि अनेक पुतळे आढळतात. हीच त्यांची प्राचीन वास्तु-शिल्पकला आज अनेक ठिकाणी बघायला मिळते त्याचा अनुभव आपण मुक्तागिरी येथे सुद्धा घेऊ शकतो.

जैनांमध्ये नंदराजांच्या काळी म्हणजे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी मूर्तिपूजा सुरू झाली असावी. या मूर्ती मुख्यतः तीर्थंकरांच्या असतात पण त्यांच्या प्रभावळीमध्ये यक्ष, यक्षिणी, गणपती, अंबिका, लक्ष्मी, सरस्वती, शिव, विष्णू यांच्या मूर्तीही परिवार देवता म्हणून असतात. सर्व तीर्थंकरांच्या मूर्ती सारख्याच असतात पण त्यांच्या सिंहासनांवर त्यांची जी चिन्हे कोरलेली असतात तसेच त्यांच्या सन्निध असलेल्या क्षेत्रपाल, यक्ष, यक्षिणी आणि त्यांची वाहने यांवरून ती मूर्ती कोणत्या तीर्थंकराची आहे, हे ठरविता येते आणि त्यांच्या काही मूर्ती फारच भव्य आहेत.

जैन मंदिरांची रचना साधारणतः हिंदू मंदिरांप्रमाणेच असते. मंदिराच्या भोवती असलेल्या तटबंदीतून अनेक कोनाड्यांतून जैनमूर्ती बघायला मिळतात. प्रवेशद्वार किंवा द्वारमंडप आणि तेथील तोरण नक्षीकामाने पूर्णपणे व्यापलेले असते. मंदिरासमोर अखंड पाषाणाचे व नक्षीचे ब्रह्मस्तंभ व मानस्तंभ उभे असतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याचा सुशोभित मार्ग असतो. प्रथम आपण देवकुलिकेमध्ये प्रवेश करतो. समोरच अनेक नक्षीदार स्तंभांवर आधारलेला सभामंडप किंवा मुखमंडप असतो. त्यातील छत व भिंती कोरीव किंवा रंगवलेल्या वेलबुट्टीने आणि चित्रांनी भरलेल्या असतात. त्यात जैन पुराणांतील कथा आणि तीर्थंकरांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले असतात. त्यानंतर गूढमंडप लागतो. त्याला अंतराळ असेही म्हणतात. तेथून आपण गर्भगृहात अर्थात गाभाऱ्यात जातो. तेथील मूर्तींची षोडशोपचार पूजा होत असते. दिगंबरांच्या मूर्तींना मुकुट आणि कुंडले नसतात. तसेच त्यांच्या पूजेत हिंसा टाळण्यासाठी फुलेही वापरत नाहीत. श्वेतांबर मात्र फुले वापरतात आणि मूर्तीच्या नऊ अवयवांची पूजा करतात. दिगंबर फक्त चरणपूजा करतात. काही जैन मंदिरांची शिखरे आमलक (कलाशाकार) पद्धतीची असतात, तर काहींना एक उंच शिखर आणि बाजूंनी उपशिखरे असतात. उत्तरकालीन जैन मंदिरांवर क्वचित इस्लामी शैलीचा घुमट बांधलेला असतो.

मुक्तागिरी आज महाराष्ट्र - मध्यप्रदेश प्रांताच्या महत्त्वपूर्ण अशा पर्यटन स्थळांमधील एक असून निसर्ग आणि धार्मिक क्षेत्र याचे मिलन इथं बघायला मिळते. मुक्तागिरीच्या जवळच सुंदर धबधबा आहे. साधारणपणे जुलै-नोव्हेंबर धबधबा पूर्ण यौवनात असतो. साधारण उंची ८० फूट असून तुषार स्नानासाठी हे स्थळ आज जगभर ज्ञात आहे. या धबधब्याच्या पायथ्याशी साधारण इ.स. १० व्या व ११ व्या शतकातील प्रस्तरात कोरून काढलेला एक भव्य गुंफा समूह बघायला मिळतो. येथील मंदिर समूह चढतांना स्वर्गारोहणाचा आभास होतो. देवालये खूप स्वच्छ आणि नीटनेटकी आहेत. रात्रीच्या रम्य चांदण्यात मुक्तागिरीचा मंदिर समूह अतिशय सुंदर दिसतो. पौर्णिमेच्या रात्री शीतल वातावरण, निसर्गाची मुक्त उधळण, शांत निसर्ग रम्य वातावरणात प्रत्येकाला उत्साह व आल्हाददायक असेच वाटते. 

देश-विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात जैन बांधव वर्षभर दर्शनासाठी येतात. मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र जरी असले तरी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी विविध धर्मांतील पर्यटक गर्दी करतात. येथे प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळता प्रवेश सुरू राहतो. येथील सर्व मंदिर वेगवेगळ्या शतकांतील असून, काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे ४०० फूट उंच पर्वतावर आहेत. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुक्तागिरीचा उल्लेख होतो.

केशर आणि चंदनमिश्रीत पाण्याची वृष्टी होण्यामागे देखील एक दंतकथा ऐकण्यात येते. असे म्हटले जाते की इथे एक मुनी ध्यान करत असताना त्यांच्यापुढे एक मेंढी (शेळी) मृत पावली. तेव्हा त्या मुनींनी त्या मेंढीच्या कानात नमोकार मंत्र म्हटला, त्यामुळे ती मेंढी जिवंत झाली आणि एक देवता बनली. तेव्हापासून या स्थानाला मेंढागिरी सुध्दा म्हटले जाते. त्या दिवसाला येथील लोक निर्वाण दिवस असे सुद्धा म्हणतात. ज्या दिवशी ही घडना घडली तेव्हा देवी-देवतांनी येथे केशर आणि चंदन मिश्रित पाऊस पाडला होता. तेव्हापासून आजतागत येथे काही विशिष्ठ दिवशी आणि चौदसला केशर आणि चंदनाचा वर्षाव होतो. दिवाळीनंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. असे म्हणतात की जर कुणी भक्त पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करून या ठिकाणी गेले तर परत येताना त्यांच्या वस्त्रांचा रंग पिवळा झालेला दिसतो.

जैनांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पट्टदकल, हळेबीड, देवगढ, खजुराहो, सोनागिरी, मुक्तागिरी, कुंडलपूर, चितोड, अबूचा पहाड, शत्रुंजय पर्वत, गिरनार, पालिताणा, चंपा, पावापुरी इ. ठिकाणी आहेत. वारा, ऊन, पाऊस, ध्वनी, पक्ष्याचे कुंजन, रातकिड्यांचा आवाज, धबधब्याचा निर्गुण,निराकार ध्वनी व तो अनुभवण्यासाठी मुक्त निसर्गाचा आनंद व आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी इथे अवश्य भेट द्यावी. कॅमेरा आणि बॅग पॅक करत मुक्तागिरीतील निसर्गाची मुक्त नजाकत उधळण्यासाठी हे अद्वितीय जैन मंदिर अर्थात सिद्धक्षेत्र समूह बघण्यासाठी मुक्तागिरीला एकदा तरी नक्की यावे. 

सर्वेश फडणवीस 


No comments:

Post a Comment