सर्वप्रथम जीवनाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आता आपण ह्या टप्प्यावर असतांना राष्ट्रहित जपण्यासाठी आदर्श युवक म्हणून समाजासमोर येणार आहात. विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे समर्थपणे भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी तत्पर आहेत. आज भारताची विश्वगुरुपदाकडे यशस्वीरीत्या वाटचाल सुरू आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणंही आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची आज गरज आहे. आज स्वामी विवेकानंद तरुणांचे आदर्श असायला हवे. ते म्हणतात,जग जिंकण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. भारताचा सर्व जगावर विजय हेच आपल्यासमोर महान ध्येय आहे. प्रत्येकाने त्यासाठी तयार असले पाहिजे. ह्याहून काहीच कमी नको आणि त्याकरिता आपण सिद्धता केली पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भारतीयांनो, उठा व आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने जग जिंकून घ्या. जडवाद व तज्जन्य दुःखे यांचे निराकरण जडवादाने कधीही होणार नाही. आध्यात्मिकतेने पाश्चिमात्य देशांवर जय मिळविला पाहिजे. त्यांनाही हळूहळू हे उमजत आहे की राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर आध्यात्मिकता अंगी बाणविली पाहिजे. ते याविषयी उत्सुक असून याची ते प्रतीक्षा करीत आहेत.
या ज्ञानाचा पुरवठा कोठून होणार आहे तर भारताच्या प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कोठे आहेत? हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कोठे आहेत? सत्याच्या प्रसारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत आणि ते आपल्यातीलच आहेत हाच विश्वास ठेवायला आपल्याला आता सिद्ध व्हायचे आहे.
वेदान्तातील थोर तत्त्वे व संदेश परदेशात जाऊन विशद करण्यासाठी असेच शूर कार्यकर्ते हवे आहेत. जगाला हे सारे हवे आहे, अन्यथा जगाचा नाश ओढवेल. अवघे पाश्चिमात्य जगत आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. उद्याच त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. जगाचा प्रत्येक कोपरान् कोपरा पाश्चिमात्यांनी धुंडाळलेला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही. ही शांती आज भारत जगाला देण्यासाठी कटिबद्ध आहे. आज भारत तरुणांचा देश आहे. ह्या तरुणांच्या साथीने भारत जगावर अधिराज्य गाजवू शकतो. विश्वगुरु भारताचे स्वप्न तरुणांच्या प्रयत्नाने होणार आहे. परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. आज आपण राष्ट्रहित जपत सदैव तयारीत असायला हवे. आज आनंदात सगळेच विद्यार्थी या टप्प्यावर भांबावून गेलेले दिसतात पण प्रत्येकाने शांतपणे ही स्थिती हाताळायला हवी. आयुष्यातील ह्या टप्प्यावर जबाबदार नागरिकाचे काही कर्तव्याची जाणीवही ठेवण्याची गरज आहे.
सामाजिक जीवनात अनेक ठिकाणी आपण आपल्या काही सामाजिक जबाबदा-या पार पाडतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला आपण ब-याच वेळा चिमुकल्यांना विविध ठिकाणी राबताना पाहतो. काम करण्याचे वय नसताना अनेक धोकादायक आणि कठीण कामे त्यांना करताना पाहतो. आपल्यापैकी किती जण या विरोधात आवाज उठवतात? एकीकडे लहान मुले म्हणजे ‘देशाचे आधारस्तंभ’ म्हणायचे आणि दुसरीकडे याच ‘आधारस्तंभांना’ राबताना पाहून गप्प बसायचे, हे कितपत योग्य वाटते? आपण ‘जबाबदार नागरिक’ असाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या एनजीओंना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती नक्कीच दिली पाहिजे.
देशावर माझं प्रेम आहे...पण ते उफाळून येतं फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. इतर दिवशी मी देशासाठी काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याकडे नाही. स्वतःच्या जगण्यामध्ये देशासाठी जगणं आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळेच अत्याचार, भ्रष्टाचार अशा विकृतींनी डोकं वर काढलं आहे. देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येकानंच देशाच्या विकासाचं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करण्यासाठी तत्परता ही दाखवण्याची गरज आहे. इतिहासात घडल्याप्रमाणे भारताला जर एक शक्तिशाली राष्ट्र बनवायचं असेल तर बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी आणि आजच्या तरुणाने ते ठरवले तर तो सहज ते आचरणात आणू शकतो.
आज काही अपवाद वगळता शिस्तीचा आणि आपला तसा दूरान्वयानेही संबंध येत नाही. तसे नसते, तर आपण ट्रॅफिक सिग्नल पाळले असते, रस्त्यावर थुंकलो नसतो, रांगेचे महत्त्व आपल्याला वेगळे सांगायला लागले नसते, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने बोललो नसतो.. वगैरे वगैरे. सध्या आपल्यावर ‘कोरोना’ नामक महामारीचे संकट कोसळले आहे, की आपल्याला शिस्त पाळणे आवश्यक झाले आहे. पण आपण शिस्त पाळतो का? हा खरा प्रश्न आहे. चला बदल घडवून आणणे हे आपल्या हातात आहे. स्वामी विवेकानंदांच्या चैतन्यपूर्ण आणि आवेशपूर्ण शब्दांत हीच ताकद जाणवते ते म्हणतात,
" भारत पुन्हा उठेल - संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने. ध्वंस-विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे,
शांति-प्रेमाची विजयपताका फडकवीत.... एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे ते हे की आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधातलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा."
No comments:
Post a Comment