कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. कारगिल व द्रास परिसरातील अति उंच दुर्गम जागी हे ठिकाण आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ते परत मिळवण्यात यश मिळाले.
हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. आणि आज त्याची परिणीती म्हणून २६ जुलै कारगिल विजय दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. आज ह्या युद्धाला २१ वर्ष पूर्ण झाली आहे. या युद्धात भारतीय सैनिक जो देशकार्य आणि देशभक्तीचा ऊर्जा स्रोत मानला जातो तो कार्यतत्पर होता. कुठल्या ही लढाईसाठी स्वतःच्या प्राण अर्पण करण्यासाठी तत्पर असणारा आमचा सैनिक हा प्रत्येक भारतीयाचा रोल मॉडेल आहे आणि राहील यात तिळमात्र शंका नाहीच. कसा आहे आमचा भारतीय सैनिक ? सैनिकसेवा व समाजप्रबोधनाच्या कार्यात वाहून घेतलेल्या एक व्रतस्थ कार्यकर्त्या,भारतीय सैनिक व सामान्य नागरिकांमध्ये भावनात्मक बंध जुळावेत ह्यासाठी लक्ष्य फौंडेशन ची स्थापना करणाऱ्या, विद्यार्थ्यांना सैनिक कळावा ह्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सौ.अनुराधा प्रभुदेसाई आपल्या "सैनिक" पुस्तकात लिहितात,
भारतीय सैनिक म्हणजे शौर्य,निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे . देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर,निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे. भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा,असामान्य कर्तृत्व,उच्च मनोबल,अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.
सैन्यदलाबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य अभिमान वआदर असायलाच हवा. जमिनीपासून कित्येक मैल दूर जाऊन समुद्राच्या पृष्ठभागावर तसेच पाणबुडीतून दोनशे मीटरपेक्षाही जास्त खोल जाऊन टेहळणी करणारे नौदल, आकाशात उंच उंच जाऊन हवाईटेहळणी करणारे वायुदल आणि रक्त गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित शिखरांवर अथवा वाळवंटात अंगाची लाही लाही करून रक्त जाळणाऱ्या उन्हाच्या वणव्यात कणखरपणे उभे ठाकलेले पायदळ ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. हया तीनही दलांच्या समन्वयाने जिंकलेले कारगिल युद्ध हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दतज्ज्ञांच्या प्रशंसेस पात्र ठरले. त्यातील पायदळाने जिंकलेल्या ऑपरेशन विजयची ही झलक...अर्थात कारगिल.
१९९९ चे कारगिल युध्द, ८० डिग्री चढाई असलेले सतरा हजार फूटांचे बर्फाच्छादित डोंगरकडे, उणे बत्तीस अंश तापमान,पाठीवर वीस किलो वजनाची युध्दसामुग्री, रात्रीच्या निबिड अंध:कारात करावी लागणारी इंच इंच चढाई. कधी चढाई दोरखंडावरून तर कधी निसरड्या बर्फावरून! एकीकडे डोंगरमाथ्यावर ठाण मांडून बसलेल्या शत्रुकडून अहर्निश होणारा बॉम्बवर्षाव तर दुसरीकडून बोफोर्सगन्समधून शत्रुवर डागल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांचा भडिमार! 'छोडो मत उनको' म्हणत बंदुकांच्या ट्रिगरवरील बोटही न काढता शेवटच्या श्वासापर्यंत लढून कोसळणारे सहकारी! अत्युच्च बलिदान देणारे हे भारतीय लष्करातील तेजोनिधी अर्थात आपले लढवय्ये शिपाई . कारगिल युध्दात चार जणांचा भारत सरकारने परमवीरचक्र हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला. 'शत्रू समोर उभा ठाकला असताना जमिनीवर, समुद्रात अथवा आकाशामध्ये केलेले अलौकिक शौर्याचे, धैर्याचे कृत्य अथवा प्राणांचे बलिदान, यासाठी हे परमवीरचक्र मरणोत्तरही दिले जाते. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, अदम्य साहस व प्रखर राष्ट्रनिष्ठेची ज्वलंत उदाहरणेच म्हणजे कारगिल युद्ध आहे. असेच एक उदाहरण आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे.
'या तो तिरंगा लहराकर आऊँगा, या तिरंगे में लिपटकर, मगर जरूर आऊँगा' असे म्हणणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांचे वय होते निव्वळ पंचवीस. पॉईंट ४८७५ वर करारी हल्ला चढवणारा, अशक्य हा शब्दच ठाऊक नसलेला, उमदा, धाडसी, परिपक्व नेतृत्व व लढवय्या जवान ह्या गुणांची उत्कृष्ट सांगड घातलेला १३ जम्मू काश्मिर रायफल्सचे हे अधिकारी. कारगिल युध्दातील भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा पॉईंट ५१४० त्याची उंची जास्त होती. शत्रुने त्यावर भक्कम ठाणे उभारले होते. शत्रुला नामोहरम करण्यासाठी पश्चिमेकडून १३ जॅकरिफचे जवान हल्ला करीत होते. कॅप्टन बात्रांचे टोपणनाव होते 'शेरशहा'. शत्रुची त्यांच्यावर नजर होती. ते जसेजसे शत्रुच्या जवळ जाऊ लागले तशी शत्रुची दाणादाण उडू लागली. घाबरलेल्या शत्रुने फुकाचा आव आणत विनाकारण ह्या सिंहाला डिवचले आणि स्वतःच्या मृत्युला आमंत्रण दिले. 'शेरशहा उपर आ रहे हो, अब वापस नही जाओगे' कॅप्टन उत्तरले 'एक घुटेमे उपर आता हूँ! देखते है कौन उपर रहेगा और कौन नीचे.' आपले शब्द खरे करत सरळसोट कड्यावरून शत्रुला अशक्यप्राय वाटणाऱ्या बाजूने ते वर चढले आणि शत्रुला भिडले. त्यांच्या प्रखर हल्ल्यापुढे शत्रुचा निभाव लागणे कालत्रयी शक्य नव्हते. खाली कोसळणाऱ्याआपल्या सहकाऱ्यांना बघून शत्रुचे सैनिक पाठीला पाय लावून भागो भागो' म्हणत पळून गेले. कॅप्टन विक्रम बाबांनी मोठया प्रमाणात दारूगोळा हस्तगत केला.
तुम्ही मोठी कामगिरी बजावलीत. आता तुम्ही थोडा आराम करा' असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर ते म्हणाले ‘सर ये दिल मांगे मोअर' मला अजून बंकर उद्ध्वस्त करायचे आहेत. कॅप्टन विक्रम पॉईंट ४८७५ वर कूच करू लागले. शत्रुची मोठी कुमक तिथे होती. सोबतचा कॅप्टन नवीन जखमी झाल्यावर या उमद्या अधिकाऱ्याने नेतृत्वाची धुरा उत्स्फूर्ततेने स्वतःच्या खांद्यावर घेतली. इतक्यात एक सैनिक जखमी झाला. त्याला सुरक्षित ठिकाणी खेचून आणण्यासाठी निघालेल्या आपल्या सुभेदाराला 'तू पीछे हट! तू बालबच्चेवाला है' असे म्हणत स्वत: आगडोंबात उडी मारली. शत्रु याच क्षणाची वाट पहात होता. त्यांनी स्वयंचलित बंदूकामधून तुफान गोळीबार सुरू केला. धनुष्यातून सुटलेला बाण असावा तसे ते गोळ्या चुकवत पळत राहिले. पॉईंट ४८७५ वर अरूंद वाटेने पोहोचत ते शत्रुच्या अंगावर धावत गेले. पण निकराने जीवाच्या कराराने लढणाऱ्या या शूरवीराच्या छातीत गोळी लागली. त्या जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तो आपले कर्तव्य पूर्ण बजावूनच! पॉईंट ४८७५ वर भारताचा झेंडा फडकला. पॉईंट ४८७५ चे 'कॅप्टन विक्रम बात्रा टॉप' असे नामकरण करून ह्या शेरशहाच्या कतृत्वाला सलाम केला गेला. मृत्युनेही क्षणभर थांबून या बेडर वृत्तीला मुजरा केला असेल, कारण मृत्युच्या हातात हात घालून ते जगले. भरभरून जगले, आणि जीवन कसे आणि किती जगावे यापेक्षा देशासाठी जीवन कसे झुगारावे याचा संदेश देऊन गेले.
खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त,निष्ठा,समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे . दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो,शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी,आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो. सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.
सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्व सीमांवर वादळवाऱ्यात,बर्फात,पावसात,सैनि
आजचा तरुण हा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिवस बाजूला ठेवले तर बाकी दिवसांना आपलं देशप्रेम हे खरंच जागृत असतं का. हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येक जाणकार,सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी तरुणाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने न जाता त्या वाऱ्याचा रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत जरुरी आहे. आज वेळ आली आहे आपल्याला अंतर्मुख होण्याची ज्यांनी ज्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या झालेल्या युद्धात शत्रूचा निःपात करण्यासाठी स्वतःच्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखांना तिलांजली दिली ; त्यांच्या त्यागाला आपण खरंच लायक आहोत का ?
सैन्यदलाबद्दल नितांत आदर,अभिमान,श्रद्धा,विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा,ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही,आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे. सैनिकांचा सन्मान करणे,त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे. २६ जुलै च्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यात प्राणार्पण झालेल्या आणि आजवर देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वंदन करूया. शौर्य दक्षम युध्दाय । बलिदान परम् धर्म: ।। या न्यायाने आमचा सैनिक कार्य करतो आहे.
या खऱ्या महानायकांकडून प्रेरणा घेऊन चला २०२० चा भारत हा सुदृढ, संयमी आणि देशप्रेमी अशा असामान्य तरूणांचा देश बनवत नवा भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया..
नागालँडमधील कोहिमा येथील भव्य युद्धस्मारकामध्ये एका योध्याच्या स्मारकावर कोरलेले शब्द प्रत्येकाने आज आपल्या हृदयातही कोरून ठेवायला हवेत.
माघारी जेव्हा जाल परतून ,ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा, तुमच्या उद्या साठी आम्ही आमचा आज दिला.
जयहिंद !!
No comments:
Post a Comment