स्वामीजींचे जीवन चरित्र वाचतांना त्यांच्या कुठल्या पैलूला स्पर्श केला तरी अद्भुत आणि एकमेवाद्वितीय असेच स्वामीजी होते हे सदैव जाणवतं. स्वामीजी एकदा स्वत: संबंधी बोलताना म्हणाले होते की ते "घनीभूत भारत" आहेत. त्यांचे भारत प्रेम इतके प्रगाढ होते की ते देशप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक ठरले. भारत आणि विवेकानंद असे अद्वैत निर्माण झाले.
भगिनी निवेदितांच्या शब्दांच्या प्रतिध्वनीतून हीच धारणा दिसून येते. त्या म्हणतात "भारतासाठी स्वामीजींच्या भावना तीव्र प्रेमाच्या होत्या. त्यांच्या रुधिरात भारताची स्पंदने जाणवत असत. त्यांच्या नसानसांतून भारताचे ठोके ऐकायला येत असत. भारत त्यांचे मनोराज्य होते किंवा दिवास्वप्न असावे. त्यांना भारताचीच स्वप्ने पडत असत. इतकेच नव्हे तर ते स्वतः भारतच होत असत. स्वामीजी म्हणजे जणू काही रक्तमांस देहधारी भारताचे मूर्तिमंत स्वरूप होत! तेच भारत होते, ते इंडिया होते. ते भारताच्या आध्यात्मिकतेचे, पावित्र्याचे, ज्ञानाचे, सामर्थ्याचे, दूरदृष्टीचे आणि विधिलिखिताचे प्रतीक होते. "
स्वामीजींच्या जीवनाचा अभ्यास करताना, ते सर्वच क्षेत्रांत असामान्य होते ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागते. भारतावर इतके निःसीम प्रेम करणारा, देशाविषयी अत्यंत स्वाभिमानी असणारा आणि देशाच्या भल्यासाठी इतका झटणारा असा दुसरा कुणीही नव्हता आणि नाही. त्याचबरोबर अकार्यक्षम आणि घाबरणाऱ्यांवर तुटून पडणारा आणि फटके मारणारा देखील दुसरा कुणीही नव्हता. ह्या दोन्ही टोकांच्या भूमिका ते धारण करू शकले कारण त्यांना भारतीयांची मानसिकता कळली होती. एक प्रेमळ माता जसे बाळाचे मन जाणत असते आणि बाळापेक्षा जास्त त्याची गरज तिला कळत असते, अगदी त्याचप्रमाणे स्वामीजींनी भारताला जाणले होते. स्वामीजींच्या विचारांतून भारताचे परिपूर्ण रूप दिसते. भूतकाळ समजतो, वर्तमानाचे महत्त्व उमगते आणि भविष्यकाळ खुणावतो. म्हणूनच रवींद्रनाथ टागोर रोमांरोलां ह्यांना म्हणाले होते, “तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा."
सर्वेश
No comments:
Post a Comment