भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीरचक्राचे दुसरे मानकरी नायक जदुनाथसिंह आहेत. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात कजुरी जि. शाहजहानपूर, उत्तर प्रदेश या खेड्यात झाला. आठ भावंड यांच्यात जदुनाथ हे तिसरे अपत्य होते. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. बालपणी त्यांना कुस्तीचा आणि शरीरसौष्ठवाचा छंद होता, त्यामुळेच त्यांना हनुमानभक्त बाल ब्रह्मचारी हे बिरुद चिकटले आणि त्या बिरुदानुसार ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले.
पुढे २१ नोव्हेंबर १९४१ रोजी फत्तेगढ येथे राजपूत रेजिमेंटमध्ये त्यांची निवड झाली. सुरुवातीचे एक वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची राजपूत रेजिमेंटच्या क्रमांक एक बटालियनमध्ये नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी दाखविलेल्या शौर्य आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना नायक पदावर पदोन्नती मिळाली आणि ते सेक्शन कमांडर झाले.
१९४७ साली देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर या भारताच्या अखत्यारीतील भागात घुसखोरांच्या नावाखाली छुपे युद्ध पुकारले. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी ताइनधर येथील पहारा चौकी याचे नेतृत्व नंबर दोनचे नायक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते. ती आघाडीची चौकी होती तरीसुद्धा संरक्षणार्थ फक्त नऊ जवान होते. चौकीचा ताबा मिळविण्यासाठी शत्रुसैन्याने जोरदार हल्ले केले; पण जदुनाथांनी उच्चतम धैर्याने आणि धीरोदात्त नेतृत्वाने तुटपुंज्या सैन्यबळावर लष्करी डावपेचांचा उपयोग करून शत्रुसैन्याला परतवून लावले. या धुमश्चक्रीत त्यांचे चार जवान जखमी झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या हल्ल्यात संयमी जदुनाथांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने मोठ्या आणि आक्रमक अशा शत्रुसैन्याला नामोहरम केले; मात्र या हल्ल्यात सर्व जवान जखमी झाले होते. नायक जदुनाथांचाही उजवा हात दुखावला होता, तरीसुद्धा त्यांनी जखमी स्टेन गनरकडून स्टेनगन स्वतःकडे घेतली. शत्रू पाठीशी येऊन पोहोचला असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची तमा न बाळगता अत्यंत शांतपणे आणि धीराने सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की, होणाऱ्या पराजयाचे रूपांतर विजयात झाले.
नायक जदुनाथ या हल्ल्यात जखमी झाले होते; त्यांनी एकहाती प्रतिकार करण्याचा निर्धार केला आणि ते चौकीबाहेर आले आणि स्टेनगनने शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात शत्रुसैन्य पुरते गोंधळले व सैरावैरा पळू लागले; मात्र यावेळी जदुनाथांच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या ते त्याठिकाणी पडले. या नॉन कमिशन्ड अधिकाऱ्याने शत्रूशी एकाकी लढत देऊन त्यावेळी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल ६ फेब्रुवारी १९४८ रोजी शहिद झालेल्या नायक जदुनाथ सिंग यांना भारतीय सेनेच्या सर्वोच्च परमवीरचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत पाकिस्तान युद्धात काश्मीरला पाकिस्तानपासून वाचवणाऱ्या सैनिकांच्या यादीत आजही नायक जदुनाथ यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
- सर्वेश फडणवीस
#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day2
No comments:
Post a Comment