Friday, May 3, 2024

सहवासाच्या चांदण्यात 🌠

चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.

काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.

अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.

पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.

मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात  येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.

वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.

सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment