Saturday, May 25, 2024

गाथा भारतीय विरागिनींची..


साधारणपणे तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वपासून पश्चिमेकडे भारतात अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या. मध्ययुगात सर्व भारतभर अनेक भक्तिपंथांचा उदय झाला. याच कालखंडातील भारतीय विरागिनींच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि पारमार्थिक पातळीवरील जीवनविचार हा संशोधनाचा फार मोठा विषय आहे. याच विषयाला अभ्यासपूर्ण संशोधनाची मांडणी देत डॉ.अरुणा ढेरे यांचा ‘भारतीय विरागिनी’ हा ग्रंथ मध्यंतरी वाचनात आला. किरण शेलार सरांनी नागपूर भेटीत आवर्जून ग्रंथ भेट दिला आणि आवर्जून वाच अशी सूचना वजा विनंती केली. यातल्या प्रत्येक स्त्रीचरित्राबद्दल वाचतांना सुद्धा प्रेरणा आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण ओळख होत असतानाच त्यांच्याबद्दलचा आदर पानोपानी जाणवत होता. तब्बल ४६४ पानी असलेल्या या ग्रंथात ३० हुन अधिक स्त्रीचरित्रे वाचायला मिळतात. 

संपूर्ण भारताचा पट डोळ्यांसमोर ठेवून विरागिनींचे जीवन आणि साहित्य यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न अरुणा ढेरे यांनी केला आहे. संपूर्ण ग्रंथाच्या विषयाचा विस्तार मोठा आहे. शिवाय विविध प्रादेशिक भाषांमधल्या आणि बोलींमधल्या अनेकींच्या मूळ रचनांपर्यंत पोहोचणे आणि त्या भाषेबद्दल अरुणा ताईंनी केलेला प्रयत्न हेवा आणि आदर वाटावा असाच झाला आहे. भारतीय विरागिनींचे स्त्रीत्वाशी असलेल्या संवेदना आणि भारतीय भक्तिक्षेत्राशी निर्माण झालेले नाते या ग्रंथातील प्रत्येक चरित्रातून उलगडत जाते. मानवजातीचा इतिहास पाहता प्रारंभकाळात स्त्री हीच सृष्टीशी संवादी जगत होती. निसर्गाशी तिचे नाते अधिक दृढ, सामंजस्यपूर्ण, तणावरहित, स्वाभाविक असे होते.

लौकिकातून पलीकडे पाउल टाकणाऱ्या आणि लौकिक आयुष्याने निर्माण केलेल्या सर्व बंधनांपासून मुक्त होऊन परमार्थाची वाट धरणाऱ्या स्त्रियांना आपल्याकडे विरागिनी शब्दावलीत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. काश्मीरच्या लाल देदपासून तमिळनाडूच्या ओव्वै किंवा अवैयार ते आंदाळपर्यंत आणि बंगालच्या चंद्रावतीपासून महाराष्ट्राच्या मुक्तेपर्यंत गेल्या आठ शतकांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय विरागिनींच्या जेवढ्या म्हणून आयुष्यकथा उपलब्ध आहेत, त्यांची काळाच्या एका विशाल पटावर मांडणी केली तर असे दिसून येते की, यांपैकी प्रत्येकीला संघर्ष अटळच ठरला आहे. स्थूल किंवा सूक्ष्म असो, आई-वडिलांशी असो, सासू-सासऱ्यांशी असो, पतीशी असो की स्वत:चाच स्वतःशी असो- प्रत्येकीला संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. या संघर्षाचे आणि चरित्राचे प्रतिबिंब या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळते.  

विरागिनींचा पारमार्थिक जीवनातील प्रवेश आणि त्यासाठी करावा लागणारा गृहत्याग सामाजिक स्तरावर सहज स्वीकारली जाणारी गोष्ट नव्हती. ते अवघड दिव्यच होते. यासाठी लागणाऱ्या असीम निग्रहाचा आणि धैर्याचा स्वीकार या विरागिनींनी कसा केला याबद्दल वाचून वाचक समृद्ध होतो. विरागिनींचा कौटुंबिक ते पारमार्थिक प्रवास अतिशय आत्मीयतेने अरुणा ताईंनी वर्णन केला आहे. विरागिनींनी भक्तिमार्ग स्वीकारून स्वत:ला आणि समाजाला काय दिले, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष आणि त्यातून मिळणारा परमानंद या विरागिनींनी अनुभवला आहे. या अनुभवाचे यथोचित दर्शन या ग्रंथातून होते. 

संपूर्ण भारतातील तत्कालीन भारतीय कुटुंबरचना, आध्यात्मिक वातावरण, संप्रदायाचे अधिष्ठान, मठाधिपती आणि त्याचे माहात्म्य, पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान, स्त्रीचे लग्नाचे वय, बालविवाह, विधवांची जीवनपद्धती इत्यादी अनेक घटकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या ग्रंथातून अरुणा ताईंनी समर्पक शब्दातून मांडणी केली आहे. अतिशय संशोधनपूर्ण केलेल्या या ग्रंथाच्या समारोपात अरुणा ताई लिहितात, ‘स्त्रीचे जे मिथक शेकडो वर्षांच्या हातांनी घडत गेले होते, त्या मिथकात या विरागिनींनी आत्मानुभूतीचा नवा प्राण भरला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेच्या लोटात त्या मिथकांचा जुना साचा संपूर्ण वितळून गेला.’ वाचनीय आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. 

‘भारतीय विरागिनी’ – डॉ. अरुणा ढेरे म

हाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, 

पृष्ठसंख्या ४६४, किंमत- २३२ रुपये.

सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment