Thursday, May 2, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


स्वरगंधर्व सुधीर फडके. १ मे महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात घडलेले आणि मराठी गीतविश्वाला आपल्या संगीताने जागतिक पटलावर घेऊन जाणारे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा बायोपिक बघण्याचा अमृतयोग आला. सुधीर फडके उर्फ बाबूजी तमाम मराठी रसिकांना जीवापेक्षा प्रिय होते. त्यांच्याविषयी सर्व जाणून घेण्याची ओढ आजही मराठी माणसात भरभरून आहे. बाबूजींची संगीतमय कारकीर्द प्रचंड आहे आणि या प्रवासात अनेक किस्से, गोष्टी, प्रसंग असे आहेत, जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट १७० मिनिटे पण पहिला मध्यांतर होईपर्यंत वेळ कसा जातो कळतच नाही. बाबूजींचा प्रवास हा अनेकांना ऐकून माहिती आहे कुणी तो वाचला आहे पण प्रत्यक्ष पडद्यावर बघतांना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दुपटीने वाढणारा आहे. 

बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष  दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात. 

चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.

प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.

सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा. 

नुकतीच रामनवमी झाली. मराठी  रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही  अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक  पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या  प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल. 


या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने

गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे

वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!


सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment