लखिमी बरुआ ह्यांच्या आईचे त्यांच्या जन्माच्यावेळी निधन झाले. वडिलांनी सांभाळ केला पण पुढे तारुण्यात असतांना वडील सोडून गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांनीच महिलांसाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आठ वर्षे संघर्ष करत आज सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
लखिमी बरुआ ह्यांना जाण होती की, अत्यंत गरीब स्त्रियांना पैशांच्या अभावामुळे किंवा विविध महिला गटांमध्ये गुंतवणूकीत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना कुठल्या समस्या येवू शकतात आणि त्या जाणिवेतून त्यांनी बँक सुरू केली. बहुतेक महिलांना तर बँक कशी चालते ह्याबद्दल ही माहिती नव्हती. पण परिस्थितीत बदल होत गेला. लखिमी बरुआ ह्यांनी १९९० साली भारतीय रिझर्व्ह बँकेला महिलांसाठी सहकारी बँक स्थापन करण्यासाठी अर्ज केला. १९९८ मध्ये मंजुरी मिळाली आणि दोन वर्षांनंतर जोरहाटमध्ये ८.५० लाख आणि १५०० महिला सदस्यांच्या आरंभिक गुंतवणूकीसह पहिली सहकारी बँक स्थापन झाली.
बँकेत केवळ महिलाच काम करतात आणि आता 'कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेच्या चार शाखा आहेत. २१ नियमित कर्मचारी आणि ३४,००० खातेदार आहेत आणि बऱ्यापैकी खातेदार ह्या महिला आहेत. २१ महिला कर्मचारी सरकारी योजनांचा लाभ ह्या निरक्षर महिलांना सांगतात आणि महिला शून्य शिल्लक किंवा २० रुपये इतक्या कमी किमतीने आपली खाती उघडुन आत्तापर्यंत त्यांनी ८,००० हून अधिक महिलांना आणि सुमारे १२०० महिला बचत गटाला कर्ज दिले आहे. गेल्या वर्षातील त्यांची उलाढाल जवळपास १५ कोटीहुन अधिक होती आणि ३० लाख नफा होता. अत्यंत गरीब महिलांच्या ठेवी ह्या बँकेमार्फत चालतात. खासदार किंवा आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी संबंधित सरकारी योजना किंवा त्या संबंधित कामे त्यांच्या बँकेमार्फत केल्या जातात. अधिकाधिक महिलांना मदत मिळावी हाच त्यांचा उद्देश आहे. आसाम मधील ३३ जिल्ह्यात कमीतकमी १ शाखा उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आसाम सारख्या दुर्गम आणि सुदूर भागात सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर करणाऱ्या लखिमी बरुआ ह्यांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#पद्म_गौरव #padmashri #lakshmima #prideofsocialwork #prideofassam #PeoplesPadma
No comments:
Post a Comment