मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालयात चित्रकार म्हणून काम करणाऱ्या भिल्ल चित्रकार भुरीबाई बारिया हे नाव आज कला आणि सांस्कृतिक जगातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या पारंपरिक चित्रांनी मध्य प्रदेश संग्रहालयापासून सुरुवात करत सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत आपली मजल मारली आहे. ह्यावर्षी भूरीबाई ह्या पद्म पुरस्काराने अलंकृत झाल्या आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील मोरी बावडी परिसरातील पिटोल गावात राहणाऱ्या भूरी बाई यांचे वय आज ५२ वर्षे आहे. त्या भिल्ल आदिवासी समाजातील आहे. त्यांच्या गावातील बहुतेक लोक विशिष्ट प्रकारचे पिठोरा चित्रकला करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच भूरीबाईंचा संबंध चित्रकलेशी जुळत गेला. त्यानंतर मध्यंतरी त्या काही काळ परिस्थितीमुळे मोलमजुरी करू लागल्या पण भोपाळ मधील भारत भवनात मोलमजुरी करतांना प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामीनाथन ह्यांनी त्यांना जी प्रसिद्धी मिळवून दिली त्यामुळे भूरीबाई हे नाव आज जागतिक पटलावर पिठोरा चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. खरंतर भूरीबाई ह्यांचा प्रवासही अतिशय प्रेरणादायी आहे. ज्यांना साधे हिंदी बोलता येत नव्हते,त्यांचा ह्या कलेच्या माध्यमातून थेट अमेरिकेपर्यंत प्रवास झाला.
भूरीबाई २०१२ साली भोपाळ येथे आपल्या पती आणि मुलांसमवेत मोलमजुरीसाठी आल्या. भारत भवनमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात त्या वाळू मळण्याचे काम करत होत्या, त्या कामाचे त्यांना सहा रुपये रोजी मिळत होती. रिकाम्या वेळात, चुन्यात लाकूड बुडवून मुलांसाठी काही विचित्र चित्रे त्या बनवत होत्या. एकदा या चित्रांवर एका व्यक्तीची नजर गेली त्यांनी चित्रांबद्दल भूरीबाई ह्यांना विचारले त्यावेळी भूरीबाई ह्यांना हिंदी सुद्धा समजत नव्हते. भूरीबाई सांगतात," त्या व्यक्तीस मी ओळखत नव्हते आणि आजवर कॅनव्हास देखील पाहिला नव्हता. प्रयत्न करून चित्रांची मालिका केली. मग मला कळले की ते सामान्य माणूस नाही तर एक प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामिनाथन आहे." पुढे ह्या चित्रांमधूनच त्यांना आदिवासी संग्रहालयाच्या भिंती रंगवण्याची संधी मिळाली आणि पुढे या भिंतींनीच त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
भील्ल आदिवासी जमातीचे लोक पिठोरा चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराच्या भिंती पिठोरा चित्रांनी रंगवलेल्या असतात. बडोद्यापासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या तेजगड गावात (मध्य गुजरात) राहणार्या राठवा,भील्ल आणि नायक आदिवासींनी ही चित्रे भिंतींवर बनविली आहे. असे मानले जाते की ते शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या चित्रांमध्ये भील्ल जमातीच्या भोज जातीचे जीवन,प्राणी,पक्षी आणि सणांची नोंद आहे. पिठोरा बाबा त्यांच्यासाठी खूप खास आणि पूजनीय आहेत. जे लोक जास्तीत जास्त पिठोरा पेंटिंग्ज घरात ठेवतात त्यांचा समाजात खूप आदर असतो. पिठोरा चित्रकाराला लखारा असे म्हणतात आणि जे या चित्रांचा लेखाजोखा ठेवतात त्यांना झोखरा असे म्हणतात. आदिवासींचा असा विश्वास आहे की केवळ पुरुषच हे चित्र बनवू शकतात.
भूरीबाईंनी आपल्या वडिलांना लहानपणी पिठोरा चित्र काढताना पाहिले होते. त्यांच्या जातीमध्ये केवळ पुरुषांनाच चित्र काढण्याचा अधिकार होता त्यामुळे भूरीबाईंनी वडील गेल्यानंतर जंगलातील झाडांच्या खोडावर ह्या चित्रांचा सराव केला. पुढे जनजाती संग्रहालयात ह्या चित्रांचे काम मिळाल्यावर समाजातील लोकांनी तीव्र विरोध दर्शवला पण स्वतःला आणि कुटुंबाला खायला मिळावे ह्यासाठी त्यांचे काम सुरू होतेच. आता भूरीबाई आणि त्यांच्या चित्रांना इतका आदर मिळाल्यावर कुणीही तक्रार करत नाही. त्या मुलाखतीत सांगतात,“आम्ही अजूनही आमच्या खेड्यात,आपल्या कुटूंबाशी फारच जुळलो आहोत. घरात लग्न असेल तर गावातूनच काम करतो. भूरीबाई आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबाने ही कला जपली आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना ही पिठोरा पेंटिंग शिकवले आहे,कारण त्यांचा विश्वास आहे की कुठली कला कधीच मरत नाही.
आज भूरीबाई गावातील तरुणांना हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ही कला रोजगाराची संधी देणारी आहे. भूरीबाईंचा विश्वास आहे जर आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर ही कला आगामी काळात आणखी जतन होईल. म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा भूरीबाई कार्यशाळा घेण्यास जातात. भुरीबाईंचा पारंपरिक भिंती रंगवण्यापासून मोठ्या कॅनव्हास रंगवण्याचा प्रवास आज पद्म पुरस्काराने अलंकृत झाला आहे. आज भिल्ल आदिवासी यांची पिठोरा चित्रकला प्रत्येकाला दिशा आणि सन्मान मिळवून देणारी ठरावी हीच सदिच्छा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#पद्म_गौरव #padmashri #Bhuribai
#prideofart #prideofmadhyapradesh #PeoplesPadma
छान ब्लॉग आहे ... अजून चित्र बघायला आवडतील
ReplyDelete