Saturday, February 6, 2021

पारंपरिक मणिपूरी विवाह पोशाख बनवणाऱ्या राधे देवी !!

मणिपूर! ईशान्य भारतातील एक अलौकिक रत्न! भारत व आग्नेय आशिया यांच्यातील सांस्कृतिक दुवा. भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न प्रदेश. ह्याच प्रदेशातील ८८ वर्षीय हंजाबम राधे देवी ह्यांना पद्म पुरस्काराने ह्यावर्षी अलंकृत करण्यात आले आहे. अगदी प्राचीन काळापासून वस्त्र व वस्त्रोद्योग हे भारतातील समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग बनले आहे.

हंजाबम राधे देवी ह्यांचा प्रवासही शून्यातून सुरू झाला. मणिपूर नववधूचे पारंपरिक वस्त्र तयार करण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. गेली ५८ वर्षे त्या सातत्याने ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मणिपूर भागात नववधू जे पारंपरिक वस्त्र परिधान करते त्याला पोटलोई सेपी अर्थात स्कर्ट म्हणतात. पोटलोईमध्ये ताठ दंडगोलाकार स्कर्ट, ब्लाउज, कंबरभोवती विणलेला पट्टा आणि एक नाजूक मलमल शाल यांचा समावेश असतो. आतापर्यंत राधे देवी ह्यांनी एक हजाराहून अधिक पोटलोई अर्थात ब्राइडल वेअर तयार केले आहेत.

राधे देवी ह्यांना प्रेमाने लोक अबोब राधे म्हणतात, मणिपूरी भाषेत अबोब म्हणजे आजी. राधे देवी ह्यांचे १५ व्या वर्षी लग्न झाले. हंजाबम वर्मा हे त्यांचे यजमान ज्योतिषी होते आणि जवळच्या मंदिरात काही कामही करत असे. त्यांना सात अपत्य होती आणि त्या गृहिणी होत्या. कुटूंबाला हातभार लागावा आणि आर्थिक अडचण दूर व्हावी ह्या हेतूने त्यांनी पोटलोई बनवणे सुरू केले. वयाच्या २५ वर्षी त्या पोटलोई बनवणे शिकल्या. शेजारी असणाऱ्या बाईंना मदत करता यावी म्हणून त्यांनी त्यांच्याकडून पोटलोई बनवण्याचे शिक्षण घेतले आणि पुढे ५ वर्ष सातत्याने त्यांच्याकडे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आपल्या व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करणे हाच त्यांचा उद्देश होता. सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीचा पोशाख बनवला. फक्त ५ दिवसांत संपूर्ण पोशाख बनवल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

पोटलोई अर्थात स्कर्टला कडक आकार देण्यासाठी राधे देवी ह्यांना सुशोभित स्कर्टच्या आतील बाजुला कापडाचे नऊ थर टाकावे लागत असत. हे बनवणे तसे सोपे नव्हते. सुरुवातीला तांदळाच्या स्टार्चने धुवून उन्हात वाळवावे लागल्यावर ते तयार होत असे. त्यामुळे एक पोटलोई बनवायला पंधरा दिवस लागत असत परंतु आता स्कर्टला कडक आकार येण्यासाठी एक पातळ रबर शीट वापरली जाते. त्यामुळे आता त्यांना एक पोटलोई बनवायला ५-७ दिवस लागतात. सुरुवातीला प्रति पोषाख ५०० रुपये कमाई होत असे. आज जवळपास १०,००० ते १५,००० च्या दरम्यान प्रति पोटलोई विकल्या जाते. प्रत्येक पोटलोई हस्तकलेच्या गुंतागुंतीवर अवलंबून असते आणि त्यानुसार त्याची किंमत ठरते. स्वतः राधे देवी आजही काळजीपूर्वक बाजारपेठेतून दागिने निवडतात आणि पोटलोईच्या डिझाईन्सशी जुळवतात ज्यामुळे भारी किंमतीत त्यांचे पोटलोई सहज विकल्या जातात. आज त्याला अधिक मागणी आहे.

खरं तर, जर आपण पोटलोईचा इतिहास पाहिला तर आपल्याला महाभारतात आणि कृष्णकथेत जावे लागेल ज्यावेळी कृष्णकथेत रासलीलेचे वर्णन येते त्या रास लीला नृत्यात गोपींनी घातलेला पोटलोई हा पोशाख होता आणि नंतर ईशान्य भारतात नववधूंच्या लग्नाचा पोशाख म्हणून अधिक लोकप्रिय झाला. लग्नसराई संपली की, राधे देवी निष्क्रिय राहात नाही. त्या वेगवेगळ्या आकारात लहान पोटलोईच्या पोशाखांमध्ये बाहुल्या बनवतात आणि मणिपूर मधील हस्तकला,शिल्पकला प्रदर्शन आणि छोट्या-मोठ्या दुकानात विक्रीस ठेवतात. २० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्यांच्या बाहुल्या विकल्या जातात.

समाजाचे आपण देणे लागतो ह्या भावनेतून त्यांचे सामाजिक कार्य  सुरू आहे. राधे देवी ह्यांचे योगदान केवळ सर्जनशील कार्यापुरते मर्यादित नाही. त्यांना महिला सक्षमीकरणाबद्दल खूप उत्कट इच्छा आहे आणि त्या मणिपूर मधील स्थानिक संस्थांशी संबधित आहे. राधे देवी यांनी अंमली पदार्थांचे व्यसन आणि राज्यातील महिलांच्या रोजगारासारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण केली आहे. आज त्यांनी ह्या उद्योगामध्ये रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता महिलांना उपलब्ध करून दिली आहे. सातत्य आणि चिकाटी ह्यामुळे राधे देवी ह्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आणि आत्मनिर्भर करणारा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पद्म_गौरव #padmashri_Radhedevi
#prideofart #prideofmanipur #PeoplesPadma

No comments:

Post a Comment