व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे,भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत आणि विविध घराणी आता ह्यात ही आली आहेत आणि ह्याच धारेत कर्नाटक घराण्यातील ९५ वर्षीय ज्येष्ठ व्हायोलिन वादक अण्णावरापू रामास्वामी यांना " पद्मश्री "बहुमान ह्यावर्षी मिळाला आहे.
भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज संपूर्ण देशामध्ये कुठल्याही गायन मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. हे वाद्य जितके मधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरांत लावल्या की, मनात येईल ते संगीत साकार करता येते.
२३ मार्च १९२६ रोजी आंध्र प्रदेशच्या सोमावरपाडू गावात जन्मलेल्या श्री अण्णावरापू रामास्वामी एक शास्त्रीय कर्नाटक व्हायोलिन उस्ताद आहे. सुरुवातीला एम. जगन्नाथम चौधरी त्यानंतर पारूपल्ली रामकृष्णन् ह्यांच्या कडून कर्नाटक संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले. परूपल्ली रामकृष्णन्य पंतुलु, एम बालामुरलीकृष्ण, अर्याकुडी रामानुज अय्यंगार, चेंबई वैद्यनाथ भागवतार यासारख्या कर्नाटक संगीतकारांसमवेत त्यांनी साथ दिली. वंदना रागम, श्री दुर्गा रागम, तिनेटराडी तळा आणि वेदादी तळा अशा नवीन रागांची रचना अण्णावरापू रामास्वामी ह्यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या ख्यातनाम व्हायोलिन वादक अण्णावरापू रामास्वामी सात दशकांपासून विनामूल्य व्हायोलिन प्रशिक्षण देत आहेत. सात दशकांपर्यंत गाण्यात समर्पित यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी नित्य साधनेच्या बैठकीला कधीही दुर्लक्षित केले नाही. कर्नाटक संगीताच्या अतुलनीय प्रतिभेस त्यांच्या रचना इतकेच ते सच्चे ‘उपासक’ आहेत. आज अनेक पुरस्करांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी असतांना आजही सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणतात,प्राचीन सांस्कृतिक कलांचे संरक्षण आणि त्याबद्दल प्रोत्साहन आपण दिलें पाहिजे आणि आता तो त्यांचा ध्यास झाला आहे. सर्व प्राथमिक शाळांमध्ये संगीत सुरू केले जावे आणि या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगीत महाविद्यालय सुरू केले जावे हीच त्यांची इच्छा आहे.
वयाच्या ह्या टप्प्यावर असतांना आजही त्यांचा सांगीतिक मार्गावरील प्रवास सुरु आहेच. सर्वात ज्येष्ठ व्हायोलिन वादक म्हणून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी शेकडो पुरस्कार मिळाले आहेत आणि व्हायोलिन वादनासाठी जगभर त्यांचा प्रवास झाला आहे. अण्णावरापू रामास्वामी ह्यांना निरामय आरोग्य परमेश्वराने प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#पद्म_गौरव #padmashri #annavarapuramaswamy
#prideofart #prideofandhrapradesh
#PeoplesPadma
No comments:
Post a Comment