Monday, April 15, 2024

युगांतर

कथांच्या ओघात प्रवास कसा संपला हे कळलेच नाही. विश्वामित्र
रामलक्ष्मणांसह मिथिलेला पोचले. शिवधनुष्य पाहण्यासाठी दोघेही उत्सुक होते कारण त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे अत्यंत कठीण आहे असे विश्वामित्रांनी सांगितले होते. जनक' हे विशेषनाम नाही. ते मिथिलेच्या अधिपतीचे पद आहे. त्या वेळी सीरध्वज नामक जनक राजपदी आरूढ होते. त्यांच्याकडे वंशपरंपरेने शिवधनुष्याची पूजा होत असे. 'त्या अलौकिक धनुष्याला प्रत्यंचा लावणाऱ्यालाच माझी कन्या सीता देईन' अशी प्रतिज्ञा जनकाने केली होती. विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता कळताच जनकराजा आपल्या शतानंद नामक राजपुरोहिताला पुढे करून स्वतः सामोरा गेला. त्यांच्यासोबत
असणाऱ्या राजपुत्रांना पाहून जनकाने कुतूहलाने त्यांचा परिचय विचारला. विश्वामित्राने कौतुकाने त्यांचे सिद्धाश्रमातले वास्तव्य, राक्षसांचा त्यांनी केलेला वध, अहल्योद्धार हे सर्व सांगून 'महाधनुषि जिज्ञासां कर्तुमागमनं तथा ।' असे नमूद केले. त्यांचा पराक्रम ऐकून प्रभावित झालेल्या जनकाने लगेच धनुष्य तेथे आणविले. ते विशाल धनुष्य एका आठ चाकी गाडीवरून स्वयंवरस्थानी आणले गेले. जनकाने धनुष्याचा महिमा आणि स्वयंवराची अट सांगितली.

स्वयंवरासाठी अनेक राजे- राजपुत्र मिथिलेला आले. प्रत्येकाने शिवधनुष्य उभे करण्याचा प्रयत्न केला पण पराभूत झाले. त्या सर्वांचा पराभव होत असतानाच उद्वेगाने जनकाच्या तोंडून 'निर्वीरमुर्वीतलम्' अर्थात पृथ्वीतलावर एकही वीर उरला नाही असे शब्द निघाले. हे सर्व ऐकून विश्वामित्रांनी रामाला उठण्याची खूण केली आणि 'वत्स राम धनुः पश्य' अशी आज्ञा केली. विश्वामित्रही किती धोरणी होते पहा. श्रीरामाला आधीच पाठवले असते, त्याने प्रत्यंचा चढवला असता तर इतर राजपुत्र म्हणाले असते की ' हे तर आम्हीही करू शकत होतो, पण आम्हाला संधीच मिळाली नाही. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला प्रणाम केला, मग शांतपणे प्रदक्षिणा घातली आणि पटकन ते उभे केले. आता प्रत्यंचा  लावणार तोच कर्णभेदी आवाज झाला.आणि ते धनुष्य भंगले.

ह्या संदर्भात स्वामी गोविन्ददेव गिरि ह्यांच्या प्रवचनातून छान कथा ऐकायला मिळाली. ते म्हणतात की इतर राजेही बलवान होते, महाप्रतापी होते. त्यांना जे जमले नाही ते किशोरवयीन श्रीरामाला साधले ह्याचे मर्मही त्यांच्या विश्वामित्रांसोबतच्या प्रवासात दडलेले आहे. त्यांनी रामाला चौपन्न दिव्यास्त्रांचे ज्ञान दिले होते. ही अस्त्रे त्यांना साक्षात् महादेवाकडून प्राप्त झाली होती. हे धनुष्यही महादेवाचेच. श्रीरामाने प्रथम प्रणाम केला. शिवाचा अनुग्रह जागवला. मग दिव्यास्त्रांचे स्मरण केले. प्रदक्षिणा घालतेवेळी चारही बाजूंनी त्या धनुष्याचे जवळून निरीक्षण केले आणि ओळखीची कळ नजरेस पडताच तिच्या साह्याने धनुष्य सर्रकन उभे केले. इतर राजांकडे ताकद होती, पण हे ज्ञान नव्हते. एकपाठी रामाने सर्व दिव्यास्त्रांचे मनोभावे ग्रहण केले होते म्हणूनच हे अघटित घडू शकले.

धनुर्भंगानंतर श्रीराम जानकीचा विवाह झाला आणि रामाच्या तिघाभावांचा सीतेच्या तिघी बहिणींशी विवाह झाला हे सर्वश्रुतच आहे. पण त्या वेळची एक बाब उल्लेखनीय आहे. जनकाचा कुलपुरोहित शतानंद हा अहल्येचा पुत्र. विश्वामित्रांशी भेट होताक्षणीच तो विचारतो, "माझ्या मातेचा उद्धार झाला ना? पिताश्रींनी तिचा स्वीकार केला ना?" त्यावर विश्वामित्र शांतपणे उत्तरतात, "हो. जसे ठरले होते तसेच सर्व घडले." गौतमही बोलले होते की, "रामा, मिथिलेत तुला शतानंद भेटेल." ह्याचाच अर्थ असा की श्रीरामाच्या बाबतीत सर्व ऋषींची पूर्वयोजना आणि परस्परप्रेरणा (telepathy) जबरदस्त होती.

श्रीरामाच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे बारीक लक्ष होते, कारण रामाच्या रूपातच त्यांना उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत होता. विवाहविधी आटोपल्यावर विश्वामित्र दशरथाला म्हणाले, "राजन्, तुमचा राम तुम्हाला सोपवला. माझे काम झाले. आता मी निघतो,' ह्या शब्दांचा फार खोल अर्थ आहे. अयोध्येहून निघतानाचा अनुभवी राम आणि आता अयोध्येला परतणारा पुरुषार्थी राम ह्यात कमालीचे अंतर आहे. हे कर्तृत्व विश्वामित्राचे. हे काम पूर्ण करून विश्वामित्र तपस्येसाठी निघून गेले आणि ते रामाला परत कधी भेटलेही नाहीत. ते निघताना राम प्रणाम करतो आणि गुरुदक्षिणेबद्दल विचारतो, तेव्हा ते उद्गारतात, "मी सांगितलेल्या ध्येयानुसार आचरण हीच माझी गुरुदक्षिणा मला हवी" कर्तव्यपूर्ततेत कसूर करायची नाही पण कुठे ममत्वभावाने अडकायचेही नाही असा 'पद्मपत्रमिवाम्भसा' वृत्तीचा वस्तुपाठ ब्रहार्षि विश्वामित्रांच्या ठायी येथे प्रत्यक्ष दिसतो. 'राम' घडतो तो अशाच संस्कारांमुळे आणि हेच पुढच्या योजनेचे युगांतर होते.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day7 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

No comments:

Post a Comment