Sunday, April 14, 2024

संस्कारयात्रा

एका त्राटिकेचा वध करून श्रीरामाने कितीतरी गोष्टी साधल्या. एक ओसाड प्रदेश वसतीयोग्य बनला, कारण त्राटिकरूपी दहशत दूर झाली. मुख्य म्हणजे रावणी साम्राज्याला एक हादरा बसला आणि धर्मनिष्ठांना मानसिक बळ मिळाले. त्राटिकावधानंतरच्या प्रवासात विश्वामित्रांनी रामालाच दिव्यास्त्रे दिली असा निर्देश रामायणात आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कथांच्या माध्यमातून त्यांनी रामाला दिलेले संस्कारधन. ते अधिक मूल्यवान आहे. 

अयोध्येहून विश्वामित्र रामलक्ष्मणासमवेत षष्ठीला निघाले ते नवमीला सिद्धाश्रमात पोचले. नंतर सहा दिवस यज्ञ चालला तेव्हा विश्वामित्रांनी मौनव्रत धारण केले होते असे वाल्मीकी सांगतात. ह्या यज्ञात मारीच आणि सुबाहू ह्या राक्षसांच्या टोळीने विघ्ने आणायचा प्रयत्नही केला होता. पण श्रीरामाने सुबाहूचा आणि त्याच्या साथीदारांचा वध केला आणि मारीचाला बाणाने कैक योजने दूर फेकून दिले. यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्या आश्रमाचे' सिद्धाश्रम' हे नाव यज्ञ सिद्धीस गेल्यामुळे सार्थ ठरले. 

यज्ञाच्या सांगतेनंतर पंचमीला विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन मिथिलेला निघाले, ते अष्टमीला पोचले असा उल्लेख रामायणात आहे. ह्या दोन्ही प्रवासात (अयोध्या ते सिद्धाश्रम आणि सिद्धाश्रम -मिथिला) अनेक कथा मुनींनी दोघा रघुकुमारांना सांगितल्या आहेत. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून ह्या कथा सांगितल्या असाव्यात असे वरवर विचार करणाऱ्याला वाटेल, पण अन्तःस्थ हेतू आहे श्रीरामलक्ष्मणांच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याचा . ती एक संस्कारयात्रा आहे.

त्राटिकावधानंतर सिद्धाश्रमाला जाताना विश्वामित्रांनीस मुद्रमंथनाची कथा सांगितली आहे. देव-दानवांच्या एकजुटीमुळेच समुद्रमंथनासारखे प्रचंड आणि अवघड कार्य सिद्धीस जाऊ शकते, पण फलप्राप्तीच्या वेळी मात्र श्रेयाचा धनी कोण असा अन्तःकलह माजला तर तो एकाला संपवूनच शांत होतो हे दोन संदेश श्रीरामाला ह्या कथेतून मिळाले आहेत.

दुसऱ्या दिवशी गंगाकिनारी पोचल्यावर रामाच्या मनात ध्येयवाद जागविण्यासाठी विश्वामित्रांनी गंगावतरणाची कथा सांगितली आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सागर-सगरपौत्र अंशुमान-दिलीप-भगीरथ अशा तब्बल चार पिढ्या खपल्या आहेत. महत्कार्य साकारावयाचे असेल तर सातत्याने अथक प्रयत्न करावेच लागतात आणि त्यात दोन-तीन पिढ्या गारद झाल्या तरी खचायचे नसते हा संदेश ह्या कथेद्वारे दिला गेला आहे.

पुढे वनवासाच्या चौदा वर्षात कितीतरी आपत्ती श्रीरामावरको सळल्या. तरीही त्याच्या प्रयत्नात कधी खंड पडला नाही. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत त्याने रामराज्याची स्थापना केली, ती ह्या संस्कारांमुळेच. 'यत्न तो देव जाणावा' असे शब्द फक्त 'राम'दासाच्याच मुखातून येऊ शकतात. विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथांपैकी सर्वात महत्त्वाची दूरगामी परिणाम करणारी कथा आहे बळीराजाची. राक्षसांच्या वरवरच्या आचरणाला भुलू नये आणि जिंकलेल्या प्रदेशांबद्दल लोभ बाळगू नये हे दोन महत्त्वाचे संदेश विश्वामित्रांनी रामाला ह्या कथेद्वारे दिले आहेत आणि सुज्ञ रामाने विश्वामित्रांच्या संदेशांचे पुढे तंतोतंत पालन केले आहे. 

वालीचे निर्दालन करून किष्किंधा सुग्रीवाला सोपवली आहे आणि रावणाचा बीमोड करून बिभीषणाला राज्याभिषेक केला आहे. अशाच तऱ्हेच्या इतर अनेक कथा या संस्कारयात्रेत श्रीरामाने ऐकल्या. मदनदहनाच्या कथेतून कामविकारावर नियंत्रण ठेवण्याचा, कार्तिकेयाच्या कथेतून सेनानेतृत्वाची लक्षणे जोपासण्याचा तर गौतमाने इन्द्राला दिलेल्या शापाच्या माध्यमातून 'व्यभिचाराला क्षमा नाही', ह्या तत्त्वाचा संस्कार श्रीरामाने ग्रहण केला. मूळच्या लखलखत्या हिऱ्याला आता अनेक तेजस्वी पैलू पडत होते. संस्कारयात्रा सफल होत होती.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day6 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏



No comments:

Post a Comment