भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक केवळ इतर राजांच्या राज्याभिषेकासारखाच नाही तर हा एक असाधारण अद्वितीय प्रसंग आहे. इतिहासाच्या ओघात असंख्य राजे सिंहासनावर बसले आणि त्यातील कितीतरी कालप्रवाहात विस्मरणाच्या गर्तेतही गेलेत. अनेक पुण्यश्लोक राजांचे इतिहासाला आजही आदराने स्मरण आहे. पण राजा राम वेगळेच. यांनी लोकहृदयाचा अद्भुत वेध घेतला. सर्वांना वेडच लावले. अतिप्राचीन काळापासून आजतागायत तपस्वी ऋषि-मुनि, वीतराग संत-महंत, प्रतिभासंपन्न साहित्यिक, श्रेष्ठ महाकवि, थोर लोकनेते आणि आबालवृद्ध सामान्यजन या सर्वांना जणू संमोहित करून स्व-स्मरणामध्ये गुंगवून ठेवणारे एकच राजा जगाने पाहिले- ते आदर्श राजा अर्थात राजा राम.
महाकाव्ये, लघुकाव्ये, नाटके, गद्य-पद्य स्फुटे, लेख, देवालये, तीर्थे, कथा-कीर्तन- प्रवचने, उत्सव आणि रामलीला अशा अनेक सर्व उपलब्ध साधनांनी रामराजा भारताच्या सर्व प्रदेशातून व भाषांतून आजही उत्कटपणे नित्यस्मरणात आहे व नि:संशय तो तसाच नित्य राहणार आहे. ही खरंतर असंख्य सदगुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामांच्या विभूतिमत्वाची जादू आहे. त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय, बोलल्याशिवाय, ऐकल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय भल्याभल्यांनाही राहवतच नाही, हे गुणप्रकर्ष अद्भुत आहे. ते इतके अद्भुत आहे की, काही बिचाऱ्यांना राम काल्पनिकही वाटू लागले. तत्त्वदर्शी महात्म्यांना तर तेच परम-सत्य-स्वरूप आहे. लोकमनातील राम असे अढळ आहे. याचे कारण प्रत्येकाला रामामध्ये आपल्याला अपेक्षित व स्वतःमध्ये असाध्य चांगुलपणाच्या पूर्णत्वाचे सहज दर्शन होते. जे जे उत्तम, मंगल, उदात्त, सुंदर, महन्मधुर ते ते सर्व श्रीरामांमध्ये आढळल्याने त्यांच्या चिंतनात आपल्या मनाला विश्रांति मिळते.
खरंतर प्रजा ही श्रीरामचंद्रांचें काय नव्हती ? सीतेच्या परित्यागानंतर हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्या प्रसंगाने राम इतके विव्हळ झाले होते की, चार दिवस अश्रुमोचन करीत त्यांनी घालविले. या चार दिवसांत त्यांच्या हातून राज्यव्यवहार व लोकांची दु:खे समजावून घेण्याचें काम झालें नाही याचें त्यांना इतकें वाईट वाटत होतें की, लक्ष्मणाजवळ त्यांनी आपल्या अंतरीचे भाव व्यक्त करताना म्हटलें आहे :-
यच्च मे हृदये किंचिद्वर्तते शुभलक्षण ।
तन्निशामय च श्रुत्वा कुरुष्व वचनं मम ।।
चत्वारो दिवसाः सोम्य कार्यं पौरजनस्य च ।
अकुर्वाणस्य सौमित्रे तन्मे मर्माणि कृन्तति ॥
आहूयन्तां प्रकृतयः पुरोधा मन्त्रिणस्तथा ।
कार्यार्थिनश्च पुरुषाः स्त्रियो वा पुरुषर्षभ ।।
पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ।।
- वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग ५३
लक्ष्मणा, माझ्या हृदयाला जी एक गोष्ट दुःख देत आहे ती ऐकून घे व त्याप्रमाणे कर. या दुःखद घटनेने माझें हृदय इतके भारावलेलें होतें की, गेले चार दिवस मी पौरजनांचे कोणतेही काम करू शकलो नाही, याची जाणीव झाली की मला मर्मांतिक वेदना होतात. पुरोहित, मंत्री, प्रजेतील कार्यार्थी असे सर्व स्त्री-पुरुष यांना तू राजसभा त्वरित मोकळी कर. जो राजा प्रजेचीं कामें करीत नाही तो घोर नरकात जातो यांत काही शंका नाही. केवढे हें प्रजावात्सल्य व त्या बाबतीतल्या स्वकर्तव्याची तरी केवढी ही प्रखर जाणीव. प्रजेनेच जेथे त्यांना विश्रामाची आवश्यकता प्रतिपादावी त्या आयुष्यातील अत्याधिक दु:खद प्रसंगी देखील आपण प्रजेच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्याइतके भावनावश झालो ही जाणीवच त्यांच्या हृदयाला अधिक कष्टी करीत आहे. अशा या राजावर प्रजेचें किती विलक्षण प्रेम असेल.
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासवः ।।
न च धर्मगुणैर्हीनः कौसल्यानन्दवर्धनः ।
न च तीक्ष्णो हि भूतानां सर्वभूतहिते रतः ।।
वाल्मीकि रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ३७
प्रत्यक्ष शत्रूने रामाच्या रूपाने धर्म पृथ्वीवर अवतरल्याची कबुली द्यावी यापेक्षा त्यांच्या चारित्र्याच्या उदात्ततेचा आणखी कोणता पुरावा देणें अवश्य आहे? सर्व गुणांचे राम हें इतकें श्रेष्ठ परिमाण आहे की, मित्र तर काय पण शत्रूदेखील रामासारखा असावा अशीच अभिलाषा उत्पन्न व्हावी. 'रामो विग्रहवान् धर्मः' श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे, महर्षि वाल्मीकि म्हणतात :-
न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३७
जेथे राम राजा नाही तें राष्ट्रच नाही. तें वनच राष्ट्र होईल की जेथे राम राहतील. केवढी ही विलक्षण लोकप्रियता. जगातील राज्यसंस्थेच्या इतिहासात प्रजा आणि राज्यसंस्था यांचें सूर्य व त्याच्या प्रभेसारखें इतकें ऐक्य आजवर कधी झालें नाही व पुढे कधी होणार नाही. सर्व उदात्त जीवनमूल्यांचे एकत्रित उत्कट दर्शन ज्या व्यक्तिमत्वात होते त्याचे नाव 'श्रीराम' होय. श्रीरामांचा राज्याभिषेक म्हणजे या जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना आणि उद्या याच जीवनमूल्यांची पुर्नप्रतिष्ठापना होणार आहे. रामलला यांचा विग्रह उद्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहे. राम राज्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आपण होणार आहोंत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत हे राष्ट्र सुजलाम, सुफलाम बनवूया. ही चार भागात झालेली लेखन सेवा श्रीरामांच्या चरणी रुजू करतो. पुन्हा भेटूच.. जय श्रीराम
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment