Tuesday, January 16, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श बंधु

लक्ष्मण व शत्रुघ्न हे बंधुत्वाचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. पण भरताचा त्याग गोस्वामी तुलसीदासांच्या प्रतिभेला तर श्रीरामापेक्षाही अधिक पूजार्ह वाटला आहे. तरीही रामचंद्रांच्या चरित्राचा जो जो विचार करू लागावें तो तो याही बाबतीत,

तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः

हा महर्षि वाल्मीकींचा अभिप्रायच मनावर ठसू लागतो. “ तुझ्या- ऐवजी भरताला हें राज्य द्यावें असें राजाच्या मनात आहे,” असें कैकेयीने म्हणताच रामचंद्र म्हणतात :-

अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान्धनानि च ।
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १९

भरताला हें राज्य देण्यासाठी स्वतः महाराजांनी मला आज्ञा करण्याचे काहीच कारण नाही. भरताला माझ्या अधिकार- क्षेत्रातली जी वस्तु हवी असेल ती मी त्याच्या ताब्यात देईन. मला नुसतें कळण्याचाच अवकाश आहे. राज्य, सीता, फार तर काय पण माझे प्राणही मी भरताच्या सहज स्वाधीन करीन. राज्यासाठी भरताला ठार मारण्याची इच्छा बोलून दाखविणाऱ्या लक्ष्मणाला रामचंद्रांनी जें उत्तर दिले आहे त्यात त्यांच्या बंधु- वात्सल्याचे संपूर्ण प्रतिबिंब उमटलें आहे. ते म्हणतात :-

यद् द्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥
धर्ममर्थं च कामं च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
इच्छामि भवतामर्थे एतत्प्रतिशृणोमि ते ।।
भातॄणां संग्रहार्थं च सुखार्थं चापि लक्ष्मण ।
राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे ।।
कथं न पुत्राः पितरं हन्युः कस्यांचिदापदि ।
भ्राता वा भ्रातरं हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ९७

मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ति मिळणार असेल ती मी कधीच घेणार नाही. विषमिश्रित अन्नाप्रमाणे ती सर्वस्वी त्याज्य आहे. लक्ष्मणा ! धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वी देखील मला केवळ तुमच्याचसाठी हवी आहे हें मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. मी शस्त्रावर हात ठेवून तुला सत्य सांगतो की, बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावें एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करीन, आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावें किंवा आपत्ति आली म्हणून आपल्या प्राणांसारख्या प्रिय बंधूंवर कोणी प्राणघातक वार करावा काय. वनवासातून परत येताना भरद्वाजाच्या आश्रमातून हनुमंताला अयोध्येला जावयास सांगताना ते म्हणतात :-

भरतस्तु त्वया वाच्यः कुशलं वचनान्मम ।
सिद्धार्थं शंस मां तस्मै सभार्यं सहलक्ष्मणम् ॥
एतच्छ्रुत्वा यमाकारं भरतो भजते ततः ।
स च ते वेदितव्यः स्यात् सर्वं यच्चापि मां प्रति ।।
ज्ञेयाश्च सर्वे वृत्तान्ता भरतस्येङ्गितानि च ।
तत्त्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभाषितेन च ।।
सर्वकामसमृद्धं हि हस्त्यश्वरथसंकुलम् ।
पितृपैतामहं राज्यं कस्य नावर्तयेन्मनः ।।
संगत्या भरतः श्रीमान् राज्येनार्थी स्वयं भवेत् ।
प्रशास्तु वसुधां सर्वामखिलां रघुनन्दनः ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५

भरताला माझें कुशल सांगून सीता आणि लक्ष्मणासहित मी प्रतिज्ञा पार पाडत परत आल्याचे सांग. ही वार्ता कानावर पडताच भरताच्या चेहऱ्यावर काय सूक्ष्म छटा उमटतात त्या तू नीट पाहिल्या पाहिजेस. त्याच्या हालचालींवरून, मुखवर्णावरून, दृष्टीत पडणाऱ्या फरकांवरून व उद्गारांवरून त्याच्या अंतरंगातील खरे भाव तुला ओळखता आले पाहिजेत. सर्व इच्छा पुरविण्या इतकें समर्थ, हत्ती, अश्व, रथ इत्यादिकांनी गजबजलेलें पितृपितामहांचें राज्य कुणाचें मन विचलित करणार नाही. राज्य चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे भरताला जर इतके दिवस स्वतः राज्यपद घेण्याची इच्छा झाली असेल तर त्याने सर्व पृथ्वीचें राज्य करावे अशीच माझी इच्छा आहे. केवळ भरताने प्राण त्यागाची सिद्धता केल्यामुळेच रामांनी राज्यपदाचा स्वीकार केला. त्यांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटल्याप्रमाणे केवळ बंधुसाठीच त्यांनी राज्य स्वीकारले. स्वतःचा हक्क म्हणून ते त्यांना नको होते.

भरतांचे रामावरील प्रेमही तितकेच अलोट आहे. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचे प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. श्रीभरतांचा स्वभाव प्रभु रामचंद्रांसारखा आहे. ते भगवान रामचंद्रांवर प्रेम करतात याचे कारण त्यांना आपल्या बालपणापासून एक गोष्ट जाणवलेली आहे की, आपला वंश हा अत्यंत श्रेष्ठ लोकांचा वंश आहे. स्वतःच्या वंशाचा गौरव जीवनात असावा. ज्यांच्या अंत:करणामध्ये स्वत:च्या वंशाचा गौरव नांदतो त्यांचेकडून जीवनात मोठमोठी कामे होतात आणि मोठमोठ्या चुका त्यांचेकडून घडत नाहीत. वंशाचा गौरव त्यांच्या चुकांच्या आड येतो. मी कोणाच्या घराण्यात जन्माला आलो ही गोष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नेहमी असते. भगवान श्रीरामचंद्रांना आणि भरतांना आपल्या वंशाचा अत्यंत मोठा गौरव आहे. दोघांना ठाऊक आहे की, आपल्या पूर्वजांमध्ये, आपल्या वंशात जन्माला आलेल्या प्रत्येक राजामध्ये कोणत्या ना कोणत्या दोन-चार गुणांचा प्रकर्षाने आविष्कार होता. राजा हरिश्चंद्रामध्ये सत्यनिष्ठा आहे, राजा दिलीपांच्यामध्ये गुरुभक्ती आणि गोभक्ती आहे, राजा रघूंच्यामध्ये पराक्रम आणि दानशीलता आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि भरतांना हेदेखील ठाऊक आहे की, माझ्या श्रीरामांमध्ये केवळ एकदोनच नव्हे, तर माझ्या पूर्वजांचे सगळे सद्गुण आणि त्याच्याव्यतिरिक्त अनेक सद्गुण पूर्णतेला पोहोचलेले आहेत. म्हणून श्रीरामचंद्रांना 'रघुवंशाची कीर्तिपताका' असे संबोधिले आहे. आणि म्हणून भरत श्रीरामचंद्रांच्या चरणी समर्पित आहेत. बंधू प्रेमाचे हे सर्वोत्तम आदर्श आहेत.

जय श्रीराम 🚩🚩

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment