Saturday, January 13, 2024

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम


पुनर्जागरणाचा पर्वकाळ आलेला आहे. उद्या मकरसंक्रात अर्थात मकरसंक्रमण. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे मार्गक्रमण. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे वाटचाल. श्रीरामजन्मभूमी वरील राष्ट्रीय संक्रमणामध्ये आपण सहभागी होत असताना सहज मनात विचार आला की, श्रीरामचंद्रांचें मर्यादापुरुषोत्तमत्व जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतून व्यक्त झालेले आहे आणि याच मकरसंक्रात दिवसाचे औचित्य साधत "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" ही लेखमाला लिहायला घेतोय. श्रीरामांचें जीवन म्हणजे भावना व कर्तव्य यांचा एक विलक्षण संगम असून जीवनाच्या अखेरच्या प्रवासापर्यंत चाललेल्या या संगमात भावनेवर कर्तव्याचा नेहमीच विजय झालेला आहे. भरत, लक्ष्मण, सीता, मारुती अशी अनेक दैवी व्यक्तिचित्रणें रामायणात आहेत व तीं आपल्या अनुपम गोडीने आणि विलक्षण भव्यतेने कोणालाही सहज आकर्षित करतात; पण, तरीही राम हे ह्या सर्वांपेक्षा किती तरी वर आहेत हेंच मनाला पटतें. 

भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराच्या लोकार्पणाचा उत्सव अनुभवण्याची वेळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येणाऱ्या काही तासांत भव्य श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. खरंतर ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू असलेला संघर्ष आता पूर्णत्वास जातो आहे. पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या बलिदानाची ही यात्रा आहे. त्या सगळ्यांची श्रद्धा आणि निष्ठा रामनामात होती. या भव्य मंदिराच्या संकल्पनेला संघर्षाची किनार आहे आणि आता अयोध्येत भव्य मंदिर निर्माण होत आहे. 

मला कायम वाटतं संकल्प दृढ असेल तर संघर्ष पूर्णत्वास जातो आणि संकल्पाला कुठलीही कल्पना असेल तर ते कार्य सिद्धीस जाते.  'याची देही याची डोळा' या मंदिराचे लोकार्पण संपूर्ण जग अनुभवणार आहे. कारण श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. सात्विक संकल्पाच्या पूर्ततेचा क्षण अवघ्या काही तासांत अर्थात २२ जानेवारीला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पूर्णत्वास जाणार आहे. मनसा- वाचा- कर्मणा या न्यायाने मंदिर आता पूर्णाहुतीच्या दिशेने जनमानसात आनंदोत्सव प्रदान करणार आहे. 

महर्षि वाल्मीकींनी "तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः " असे म्हंटले आहे अर्थात ध्वज जसा प्रासादाहून उंच असतो, त्याप्रमाणे राम हे ह्या सर्वांहून अधिकच उच्च श्रेणीवर विराजमान झाले होते असें जें म्हटलें आहे तें अगदी यथार्थ आहे. कारण या प्रत्येकात कर्तव्यापेक्षा भावनेचें प्राबल्य अधिक दृष्टीस येतें. रामचंद्रांच्याही नेत्रांना भावनेच्या भराने पाणावण्याची सवय आहे; पण तरीही त्यांचें जीवनयंत्र अखेरीस कर्तव्याच्याच अधीन होतें, भावनेच्या नाही. कोणत्याही प्रसंगात भावनेचें त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित झालेले नाही. म्हणूनच भरत, लक्ष्मण असे महान् लोक हे व्यक्तिमत्त्वाच्या विकसनाचे उत्तुंग प्रासाद असतील; पण, राम हे त्या सर्वांहूनही उंच असे ध्वज आहेत. म्हणून ते 'मर्यादापुरुषोत्तम' आहेत. इतर कोणी या विशेषणाला पात्र ठरू शकत नाहीत आणि म्हणूनच आपण उद्यापासून चार भागात एकेका अवस्थेबद्दल या निमित्ताने जाणून घेणार आहोंत. 

जय श्रीराम 

#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला 

सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment