Wednesday, November 15, 2023

✨ वाद्यमेळ : मृदंग


मृदंग हे नाव ऐकूनच मानवी मन एका वेगळ्याच विश्वात रममाण होते. याच्या नादाने सारा आसमंत आनंदून जातो. आवडीच्या वाद्याने वाद्य मेळाचा शेवट करावा अशी इच्छा निर्माण झाली. मृदंग हा शब्द ढोल शब्दाप्रमाणेच वेगवेगळ्या आडव्या ढोलांना उद्देशून सामान्य अर्थाने वापरला जातो. दक्षिणेत मृदंग एक विशिष्ट वाद्य आहे. त्यालाच तमिळ व तेलुगू भाषांत मद्दळम् व कानडीत मद्दळे म्हणतात. उत्तरेत मात्र पखवाज, खोल व पुंग ह्या वेगळ्या वाद्यांनाही मृदंगच म्हणतात.

मृदंगाचा सर्वांत प्राचीन उल्लेख आणव व काठक गृह्यसूत्रात (इसवी पूर्व ८०० ते ४००) सापडतो. शिवाय रामायण, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध त्रिपिटक, आदी ग्रंथांत या वाद्याचे उल्लेख आहे. भरताने प्रमुख वाद्यत्रयींत मृदंगाचा समावेश केला. शाङ्गदेवाच्या काळातही मृदंगाला वाद्यांत प्रमुख स्थान होते; त्याच्या पुष्कर त्रयींत मृदंग, मर्दल व मुरज हे तीन ढोल होते. आजही देशात मृदंग एक प्रमुख तालवाद्य आहे. मृदंगाविषयी तपशीलवार विवेचन नाट्यशास्त्रात आले आहे. हरीतकी, यव व गोपुच्छ असे त्याचे तीन प्रकार सांगून ते धरण्याच्या ऊर्ध्वक, आंक्य व आलिंग्य अशा तीन पद्धती वर्णन केल्या आहेत. ज्याचे अंग मातीचे आहे तो मृदंग (मृत+अंग) अशी व्याख्याही याबद्दल प्रचलित आहे. यावरून असे दिसते की पूर्वी मृदंग मातीचे बनवलेले असत व सध्याचे लाकडी मृदंग नंतर अस्तित्वात आले. या व्याख्येबाबत काही लोकांचे मत असे आहे की मातीचे अंग म्हणजे खोड नसून पुडीला मातीचा लेप देतात या अर्थी आहे. मतमतांतरे असले तरी मृदंग हे वाद्य आजही लोकप्रिय आहे.

दक्षिणेत ज्या विशिष्ट वाद्याला मृदंग म्हणतात त्याचे खोड फणसाच्या, निंबाच्या किंवा शिसवी लाकडाचे असते. स्वराच्या उंचीनुसार खोडाची लांबी ५५ ते ६० सेंटीमीटरच्या दरम्यान कमीअधिक असते. मधल्या फुगाऱ्याचा व्यास २५ ते ३० सेंटीमीटर असतो, पण फुगारा खोडाच्या मधोमध नसून डाव्या बाजूकडे असतो. अर्थातच डावी पुडी मोठी व उजवी लहान होते. डाव्या पुडीचा व्यास १८ ते १९·५ सेंटीमीटर असतो व तिला तोप्पी म्हणतात. उजव्या पुडीचा व्यास १५·५ ते १७ सेंटीमीटर असतो व तिला वलन्तलै म्हणतात. वलन्तलैमध्ये चामड्याचे तीन पापुद्रे असतात; त्यांपैकी मधल्या थरातील चामडे सबंध पुडीभर असते आणि उरलेली दोन चामडी म्हणजे गोल पट्ट्या असतात. सर्वांत खालची पट्टी बाहेर दिसत नाही; कारण तिच्यावर आणखी दोन पापुद्रे असतात. मधल्या चांदव्याला तामीळमध्ये कोट्टू तट्टू व तेलुगूत पाट म्हणतात. बाहेरच्या गोल पट्टीला तामीळमध्ये वेट्टू तट्टू किंवा मिट्टू व तेलगूत रेप्पा म्हणतात. 

मृदंगासारखेच बनवलेले व तितकेच प्रतिष्ठित दुसरे वाद्य म्हणजे पखवाज. ध्रुपद गायकीत व वीणावादनात पखवाजाची साथ अपरिहार्य होती. पण त्यांच्याबरोबर पखवाजही आता मागे पडला आहे व ख्यालगायकीबरोबर तबला पुढे आला आहे. आजही ध्रुपदगायनात, वीणावादनात व कथ्थक नृत्यात पखवाजाची साथ घेतात, पखवाजाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. कारण पखवाजात नादाचे व वादन तंत्राचे सात्त्विक गांभीर्य इतके भरले आहे की तबल्यातून ते कधीही निर्माण होऊ शकणार नाही. पखवाजाला मृदंगही म्हणतात; पण काही ठिकाणी दोघांत भेद करतात : मृदंग मातीचा असतो तर पखवाज लाकडाचा. पखवाज शब्द पक्ष-वाद्य म्हणजे बाजूने वाजवले जाणारे वाद्य शब्दाचा अपभ्रंश असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. पखवाज
दक्षिणी मृदंगापेक्षा लांबीत थोडा अधिक असतो व त्यात फुगाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे उतार मृदंगापेक्षा अधिक विषम असतात. 

आज भारतात प्रसिद्ध मृदंग वादकांचे नाव आदराने घेतले जाते त्यात पंडित मदन मोहन, पंडित भोलानाथ पाठक , पंडित अमरनाथ मिश्र अशा काही नावांचा उल्लेख आवर्जून करता येईल. आजही हे वाद्य अनेक ठिकाणी साथीला असते. कानाला नादाचा आनंद देण्याचे काम हे वाद्य लीलया करते. आज दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज. बीजेला साक्षी ठेवत मृदंग वाद्याच्या नादाने आनंद उत्साह कायम राहावा हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day5

No comments:

Post a Comment