आवाज कोणाचा? म्हणजे फटाक्यांचा असतोच पण त्या गलक्यात जरा या वाद्यांचा आवाज ही ऐकुया. सप्टेंबर महिन्यात जी20 बैठकी निमित्ताने आलेल्या सगळ्या राष्ट्र प्रमुखांसमोर तब्बल ७८ विविध भारतीय वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यातूनच ही संकल्पना सुचली आणि त्यातील पाच वाद्य यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोंत.
एके ठिकाणी छान वाचनात आले की, हिंदु तत्त्वज्ञानाने सर्व ध्वनिद्रव्याचा आरंभ एका शब्दातून केला आहे. त्या एका शब्दाला नादब्रह्म, ॐ किंवा प्रणव म्हणतात. ॐ हाच ध्वनीचा आदिस्फोट. म्हणूनच वेणू (कृष्ण), वीणा (सरस्वती) व डमरू (शिव) या वाद्यांना दैवी संकेत प्राप्त झाले आहेत. ही संगीताची गर्भावस्था आदिम वाद्यांत दिसून येते. संगीतमय म्हणता येईल असा निश्चित नाद या वाद्यांतून निघत नाही.
कमरेला बांधलेली वाळलेल्या फळांची माळ, ही प्राथमिक अवस्थेतील संगीताची साधने होती. नंतरच्या अवस्थेत काठ्या चिरलेली लाकडे, तबकड्या, दांड्या, ढोल, वीणा व वेणू यांचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. पण आदिम वाद्यांचा उपयोग केवळ संगीतासाठीच होत होता असे म्हणता येत नाही. शंख जसा
रणवाद्य होता तसाच अभिषेकपात्रही होता. त्यात तीर्थ ठेवले जात होते. नगारा व धुम्सा ही सुद्धा रणवाद्ये होती. चर्मजडित वाद्ये खुणांच्या बोलीसाठी वापरली जात होती.
खरंतर संगीत वाद्य म्हणजे संगीतोपयोगी नाद निर्माण करण्यासाठी वापरलेले कोणतेही साधन. या अर्थी, मानवी देह, विशेषतः मानवी आवाज, हेच सर्वांत प्राचीन संगीत वाद्य म्हणता येईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यालाच ‘गात्रवीणा' म्हटले आहे. टाळ्या वाजवणे, मांड्या व कुल्ले थोपटणे. जमिनीवर पाय
आपटणे, ह्या क्रिया आदिम वाद्यक्रियाच होत्या. वेदमंत्र गाताना, हातावर आवाज न करता बोटांनी विशिष्ट पद्धतीने जी लयगणना केली जात असे तिला हस्तवीणा म्हणत असत. अशा दैहिक क्रियांचेच रूपांतर हळूहळू स्वतंत्र वाद्ये घडवण्यात झाले. हातोडी किंवा पेचकससारखी अवजारे जशी उद्योगी हाताची कार्यक्षमता वाढवणारी यांत्रिक क्लृप्ती म्हणून निर्माण झाली तशीच टिपरी व कोलाट्टम् कट्टेसारख्या काठ्या किंवा करताल व चिपळ्यांसारखी टाळ्या देणारी वाद्ये मानवी हाताने आपली क्षमता वाढवण्यासाठी तयार केली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ वाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता. मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा, सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या या वाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आज अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.
आता वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. वाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके तयार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात. फरीदसाहेब यांच्यानंतर वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे नेली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात खूप गाजली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील वाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. वाद्यनिर्मितीची ही कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये वाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. अशा वाद्यांच्या पाठीमागील काही कथा, त्या वाद्यांच्या इतिहासाचा मागोवा या निमित्ताने दिवाळीच्या पांच दिवस " वाद्यमेळा " शीर्षकांतर्गत वाद्यांची कहाणी, परंपरा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा उद्यापासून वाद्यमेळात भेटूच..
सर्वेश फडणवीस
#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023
No comments:
Post a Comment