Friday, November 10, 2023

वाद्यमेळ : जलतरंग

जलतरंग या नावातच एक गूढ आणि आत्मिक अशी अनुभूती येते. तसंच हे वाद्य आहे. हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. जलतरंग या वाद्यामध्ये कुठलाही ताण नाही. त्यामुळे हे वाद्य ऐकून ऐकणाऱ्याचा ताण नाहीसा होतो. नादातली नजाकत आणि प्रसन्नता हे जलतरंग या वाद्याचं वैशिष्ट्य आहे. अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमी अधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते आणि असंच हे दुर्मिळ जलतरंग वाद्य आहे. 

जलतरंग हे अस्सल भारतीय वाद्य आहे. पूर्वी धातूच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाजवलं जाणारं हे वाद्य आता चिनी मातीचे बाउल वापरून वाजवलं जातं. दिसायला जरी सहज - सोपं असलं तरीही वाजवायला तितकंच अवघड आहे. जलतरंग वाजवायला अवघड आहे कारण त्यात महत्त्वाचे आहे ट्यूनिंग. जलतरंग ट्यून कसं करतात ? बाऊलचा आकार आणि त्यात असलेलं पाण्याचं प्रमाण यावर त्यातून येणारा स्वर अवलंबून असतो. मुळात बाऊलला स्वतःचा एक स्वर असतो. पाणी नसताना बाऊलमधून जो स्वर येतो त्यापेक्षा त्या बाऊलमध्ये पाणी घालून ३ ते ४ स्वर अधिक मिळवता येतात. बाऊलचा आकार जितका मोठा तितका त्यातून येणारा स्वर खालच्या सप्तकातला. बाऊलमध्ये जितकं पाणी कमी तितका त्याचा स्वर वरचा लागतो. त्यामुळे इतर वाद्यांसारखं ट्यूनिंग करताना स्वर चढवणं हे जलतरंगाच्या बाबतीत शक्य नसतं. म्हणूनच जलतरंग हे स्वर उतरवून ट्यून केलं जातं. 

या वाद्यातील ट्यूनिंगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा तापमानाचा आहे. जलतरंगासाठी वापरलं जाणारं पाणी एकदम थंड असेल तर जलतरंग वाजत नाही. गरम पाणी वापरलं तर एरवीपेक्षा कमी पाण्यात जलतरंग ट्यून करता येतं पण वाजवता वाजवता पाणी पुन्हा नेहमीच्या तापमानावर येतं तेव्हा ट्यूनिंग बिघडतं. पाण्यापेक्षा घनतेने हलक्या द्रवपदार्थानेही ते ट्यून करता येऊ शकते पण बऱ्याचदा अशा द्रव पदार्थांचं बाष्पीभवन लगेच होत असल्याने ते वापरणे व्यावहारिक नाही. जलतरंग हे वाद्य शास्त्रीय राग वाजवण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नाही असा एक विचारप्रवाह आज आहे. 

जलतरंगाचा सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथात पाहायला मिळतो. पाण्याने भरलेल्या विविध पेल्यांत संगीताचे जल-तरंग निर्माण करून सूरनिर्मिती केली जात असे. तसेच याचा उल्लेख मध्ययुगीन "संगीत पारिजात" या ग्रंथामध्येही करण्यात आला होता, ज्यामध्ये या वाद्याला घन-वाद्य असे म्हंटले आहे. जल - तरंगला मध्ययुगीन काळात जल - यंत्र, जल तंत्री वीणा देखील म्हटले जात असे चित्रपट संगीतामधे देखील या वाद्याचा भरपूर वापर केला गेलेला आहे. पंख होते तो उड आती रे.. मधु बन मे राधिका नाचे रे… . अशी अनेक गाण्यांचे उदाहरणे देता येतील. तसेच कृष्णावर कविता लिहिणाऱ्या कवींनीदेखील या साधनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. ऐकतांना लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते.

भारतात आज जलतरंगवादनाचे पूर्णवेळ कार्यक्रम करणारे खूपच मोजके लोक आहेत. त्यात पुण्यातील  पं.मिलिंद तुळाणकर हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. G20 च्या वेळी जे वाद्य वादक होते त्यात जलतरंग साठी पं. मिलिंद तुळाणकर यांचा समावेश होता. असे हे जलतरंग वाद्य तरंगाच्या नादातून आनंद देणारे आहे. कायम वाटतं की खरोखरच संगीतामध्ये ही जादू आहे की आपण सर्व जग विसरून जातो. असंच हे जलतरंग वाद्य आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day2

No comments:

Post a Comment