Sunday, January 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श पुत्र


या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद तो आनंदसिंधु म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. गोस्वामी तुलसीदास म्हणतात-
जो आनंद सिंधु सुखरासी ।
सीकर ते त्रैलोक सुपासी ।।

त्या आनंदसिंधूच्या एका बिंदूवर हे सगळे जग वेडे झाले आहे. मग त्या आनंदसिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी आणि सगळ्या शास्त्रांनी श्रीरामांबद्दल जर कुठला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला असेल तर तो 'आनंद' आहे. राजा दशरथ अर्थात आपल्या पित्यासाठी रामचंद्रांनी पुत्रत्वाचा कोणता दिव्य आदर्श उत्पन्न केला हें रामकथेच्या वाचकाला सांगायला नको. ते स्वतःच एके ठिकाणी या संबंधाने कृतार्थचे उद्गार काढताना म्हणतात :--

न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः ।। 
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १८
माझ्यासारखा पुत्र मागे झाला नाही व पुढे होणार नाही.भावनेच्या पाण्याने पुत्रकर्तव्याचा रामचंद्रांच्या अंतःकरणातील बंध शिथिल करण्यासाठी भरत चित्रकूटावर आपल्या नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहवीत असताना रामांनी दिलेलें अखेरचें उत्तर त्यांच्या जीवनपटातील या विशिष्ट बाजूवर संपूर्ण प्रकाश टाकणारे आहे. 

लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ११२

अर्थात लक्ष्मी चंद्राला सोडून जाईल अथवा हिमालय आपली शीतलता सोडील. समुद्र मर्यादेचें उल्लंघन करील, पण मी माझ्या पित्याची प्रतिज्ञा कधीही भंग पावू देणार नाही. कर्तव्यमार्गाचा भरताला उपदेश करीत असताना राम उलटे भरतालाच असें म्हणतात :--

सोऽहं वनमिदं प्राप्तो निर्जनं लक्ष्मणान्वितः ।
सीतया चाप्रतिद्वन्द्वः सत्यवादे स्थितः पितुः ॥ 
भवानपि तथेत्येव पितरं सत्यवादिनम् ।
कर्तुमर्हसि राजेन्द्र क्षिप्रमेवाभिषेचनात् ॥ 
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः ।। 
एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः ।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ।। 
एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनन्दन ।
तस्मात्त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात्प्रभो ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०७

केवळ पित्याची आज्ञा पाळण्यासाठीच लक्ष्मण आणि सीता यांच्यासह मी निर्जन वनात आलो आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळणें हें तुझेंही कर्तव्यच नाही काय ? पिता सत्यवादी व्हावा यासाठी माझ्याकडे सोपविलेल्या त्यांच्या एका आज्ञेचें मी जसें परिपालन केलें तसेंच तूही त्याच्या दुसऱ्या आज्ञेचें परिपालन केलें पाहिजे. सत्यवादी पित्याने तुला राज्याभिषेक करून घेण्याची आज्ञा दिलेली आहे. पिता सत्यवादी ठरावा म्हणून ताबडतोब राजसिंहासनाचा अंगीकार करणें हेंच तुझें कर्तव्य आहे. नरकापासून जो पित्याला वाचवितो आणि सर्व प्रकारे अधःपतनापासून त्याचें संरक्षण करतो त्यालाच पुत्र असें म्हणतात. पुष्कळ गुणवान् पुत्र उत्पन्न करावेत म्हणजे निदान त्यांतला एक तरी गयेला जाऊन पित्याला सद्गति देईल व आपलें पुत्रकर्तव्य बजावील असें सर्व राजर्षि म्हणतात. इतर कोणाकरिता नाही तरी निदान माझ्याकरिता तू आपल्या पित्याला अधःपतनापासून वाचव व त्यासाठी तरी राज्याचा स्वीकार कर. भरताने त्यांना मी वनवास करतो व आपण राज्य करा म्हणजे विनिमयाने पित्याच्या आज्ञेचें परिपालन होईल असें सुचविल्यावर रामचंद्रांनी जें धीरोदात्त उत्तर दिलें आहे तें त्यांच्या पितृआज्ञा परिपालनाच्या कल्पना किती नाजूक व उदात्त होत्या हें दर्शवितें. ते म्हणतात :-

उपाधिर्न मया कार्यों वनवासे जुगुप्सितः । 

अर्थात राम- विनिमयाची कल्पनाच त्यांच्या अभिजात चारित्र्याला अत्यंत अपमानास्पद वाटते. ज्याला जी आज्ञा दिलेली आहे त्याच आज्ञेचें त्याने परिपालन केलें पाहिजे असें त्यांचे स्पष्ट मत आहे. श्रीरामांच्या हृदयातल्या पित्याविषयीच्या त्यांच्या खऱ्या उत्कट भावना वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकाण्डाच्या अठराव्या सर्गात उचंबळून आलेल्या आहेत. कारण तेथे त्यांच्या भावनांना मोकळे करण्यात आले आहे.

राम वनवासात निघतांना कैकेयीला राजा दशरथ म्हणतात, 
नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम् ।
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्यैव वक्ष्यति ।। 
यदि मे राघवः कुर्याद्वनं गच्छेति चोदितः ।
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १२

अर्थात माझ्या शब्दांवर राम एक अक्षर देखील बोलणार नाही अशी माझी खात्री आहे. मी वनात जा असे म्हटल्याबरोबर 'होय' असेंच तो म्हणेल. मी वनात जावयास सांगितल्यावर राम जर माझें न ऐकता प्रतिकूल वर्तन करील तर माझें अत्यंत प्रिय होईल. पण तो तसें करणार नाही (हीच अत्यंत दुःखाची गोष्ट आहे). राजाचा हा विश्वास किती यथार्थ होता ! सर्व विश्वाच्या नियमनाची प्रचंड शक्ति असूनही एखाद्या गवताप्रमाणे राज्यलक्ष्मीला लाथाडून रामांनी वनवासाचा मार्ग पत्करला. पित्यासाठी पुत्राने आपल्या महान् जीवनाचा नंदादीप स्वयंप्रेरणेने जाळला आणि केवढा हा पुत्रधर्माचा उदात्त आदर्श आहे. म्हणूनच आदर्श पुत्र श्रीराम या न्यायाने वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे आहे. समर्थ लिहितात, 

बहु चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जीवा मानवा हेची कैवल्य साचे ।।

जय श्रीराम…

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment