लता मंगेशकर !! या नावासोबत मुलायम आवाजातील सुंदर गीतांचं अस्तित्व आणि जनतेच्या मनातील त्यांच्याप्रती असलेला नितांत आदरभाव सामावला आहे. या नावाचे मोठेपणच उत्तुंग आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो वृद्ध असो वा बालक, गरीब असो वा श्रीमंत, शहरी भागातील असो वा ग्रामीण, सर्वांना हे नाव परिचित आहे. नुसते परिचितच नाही, तर त्या नावाबद्दल विलक्षण आपलेपणा, प्रचंड जिव्हाळा, अतिशय प्रेमसुद्धा आहे. एक महान गायिका म्हणून त्यांच्या विषयीचा आदर प्रत्येक भारतीयाच्या मनात ओतप्रोत भरला असेल याची मला खात्री आहे. मा. दीनानाथांच्या आधारवेलीवर लता मंगेशकर हे नाव बहरलेच नाही तर त्याचा वेलू गगनावरी गेला आहे.
२८ सप्टेंबर, १९२९ शनिवारी रात्री साडे दहा वाजता इंदूरमधील शीख मोहल्ला आनंदून गेला. मा. दीनानाथ आणि माईंच्या ज्येष्ठ कन्येचा अर्थात लता दिदींचा जन्म झाला. जणू श्रीकृष्णाची मधुर बासरी पृथ्वीतलावर अवतरली. एका असामान्य प्रतिभेच्या सुरेल आवाजाचा, स्वर्गीय कंठाचा चमत्कार, लाखो लोकांना सुरांत भिजून आनंद देण्यासाठी भूतलावर प्रकट झाला. गीत-संगीताची अभिजात परंपरा असलेल्या घराण्यात लता दीदी हळूहळू मोठया होऊ लागल्या. मा.दीनानाथांसारख्या तेजस्वी सूर्यापासून निर्माण झालेल्या दीदींसह त्यांची पाच अपत्येही सूर्यासारखीच तेजस्वी निघाली. घराण्यामध्ये संगीताची जी अभिजात परंपरा आहे, ती मंगेशकर घराण्यातील प्रत्येकाने जोपासली. या घराण्याला दिव्यध्वनीचे दैवी वरदान तर लाभलेलेच आहे; पण परिश्रम, रियाज,सातत्य, संगीतकलेवरील निष्ठा या गुणांची जोड देऊन मंगेशकर कुटुंबीयांनी ते वरदान अधिक खुलवले आहे.
पित्याचे प्रेमळ छत्र अकाली हरविल्यानंतर भावंडे आणि माईला
सांभाळण्याची जबाबदारी दीदींनी स्वतः उचलली. त्यांचे वय खेळायचे पण लहान वयातच त्यांना परिस्थितीची व जबाबदारीची जाण आली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांनी व्यवस्था केली. संगीतापलीकडचं लता दिदींचे आयुष्य चाळलं तरी हे लक्षात येतें की सुरांच्या साम्राज्यात, स्वरांच्याच विश्वात, गीतांच्या नादात आणि संगीताच्याच क्षेत्रातील लता दीदी संगीताशिवाय रिक्त राहतील.
कंठातील देवदत्त गंधाराचं मंगल लेणं ल्येवून जन्माला आलेल्या ल-ता- मं-गे-श-क-र ह्या सप्तरंगी सुरांनी संगीतकलेला अतिशय ऐश्वर्यसंपन्न करून सर्वोच्च उंची प्रदान केली. जन्माने बहरलेली इंदोर नगरी, बाललीलांनी सुखावलेली करवीर नगरी, कर्मभूमीची शान बाळगणारी मुंबई महानगरी, कर्तृत्वाचा अभिमान मिरविणारी पुणे नगरी असली तरी त्यांच्या सुरेल दैवी स्वरांनी अवघ्या धरतीवर स्वर्गसुख अवतरले होते.
मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट आणि अर्थपूर्ण शब्दोच्चार यांमुळे लता दिदींचे गाणे ऐकतांना आपले देहभान हरपून जाते. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले दिव्य स्वर कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पोहोचविले. प्रचंड पुरस्कार, मानसन्मान, गौरव, लोकप्रियता त्यांच्या वाट्याला येऊन सुद्धा त्या निगर्वी होत्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हे तत्त्व त्यांनी संपूर्णतः अंगिकारले होते.
'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' या उक्तीप्रमाणे, दीदींचा
नवोदित गायिका ते सूरसम्राज्ञी हा प्रवास अत्यंत खडतर मार्गाने झाला. वाटेतल्या काट्यांनी त्यांना जखमा केल्या. पण दीदी घाबरल्या नाहीत. अतिशय कठीण मार्गातून वाटचाल करीत त्या देदीप्यमान यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आणि त्यामागे प्रचंड मेहनत,चिकाटी आणि जिद्द होती. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी रात्रीचा दिवस करून स्थळ, काळ, वेळ, भूक, तहान, यांची तमा न बाळगता त्यांनी रेकॉर्डिंग केले. खरंतर साठविता न येण्याइतके जनतेचे प्रेम दीदींना मिळाले. पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच हे प्रेम मिळाले, असे त्या कायम म्हणायच्या, कोणतेही काम उत्कृष्ट रितीनेच करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. दीदींनी प्रत्येक गाणे समरसून गायले आहे आणि त्यांची बहुसंख्य गाणी लोकप्रियही झाली आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र कहाणी आणि स्वतंत्र इतिहासही आहे.
भारताच्या ह्या महान गायिकेचा कार्यक्रम परदेशात असला तर मातृभूमीच्या अभिमानाने, दीदींसारख्या श्रेष्ठ कलासाधकावरील प्रेमाने दूरदूरच्या ठिकाणांवरून तेथील भारतीय कार्यक्रमासाठी धावून येत. पाश्चात्य जनताही दीदींचा स्वर ऐकण्यास उत्सुक होतीच. दीदींचा सुरेल सूर ऐकून रसिक तृप्त होत आणि हा स्वर हृदयात जतन करून ठेवत. खुद्द स्वरसम्राज्ञीला प्रत्यक्ष समोर बसून ऐकताना प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने उचंबळून आले नाही तर नवलच तरीपण, मायदेशातील जनतेने जसे अमाप प्रेम या श्रेष्ठ कलावंतावर केले, तद्वत्च परदेशातील जनताही दीदींवर प्रेम करण्यात कुठेही कमी पडली नाही. ज्यांनी एक जरी कार्यक्रम ऐकला-पाहिला, त्यांनी आयुष्यातील अविस्मरणीय आनंद अनुभवला असे मी म्हणेन. कारण ह्या आनंदाची ज्योत स्मृतिरूपाने त्यांच्या मनात सतत तेवत राहणार हे निश्चित आहे.
मला कायम वाटतं, घरातील असह्य वाटणारा एकटेपणा सुसह्य होतो तो दीदींच्या गाण्यांमुळे. कंटाळवाणा प्रवास सुखकर होतो तो दीदींच्या गाण्यामुळे. आनंदमय प्रवास अधिक आनंदी होतो तो दीदींच्या गाण्यामुळेच आणि प्रातःकाळी चहाच्या कपासोबत कानांना आणि मनाला सुखावून जाणारा दीदींचा भक्तिरसाने ओथंबलेला अमृतस्वर सोबत असला, तर ते रसायन दिवसभर पुरेल एवढी शक्ती आणि स्फूर्ती देऊन जाते.
लता दीनानाथ मंगेशकर म्हणजे पृथ्वीवरचा अलौकिक चमत्कार होता. चमत्कार प्राचीन काळातच होत होते असे नाही, तर दीदींच्या रूपातील चमत्काराचे दर्शन ६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत 'याची देही याची डोळा' आपण प्रत्यक्षात अनुभवत होतो. लता दिदींचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतील एक अद्भुत घटना आहे. ' सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण आणि मुरलीची साद ही सर्व एकवटून विधात्याने लता दिदींचा कंठ घडविला असला पाहिजे,' असे वर्णन करून आचार्य अत्रे यांनी दिदींच्या कंठाची महती गायली आहे. भारतीय संगीताचा उगम सामवेदांतून झाला हे जर खरे मानले, तर लता मंगेशकर या त्या संगीताची गायत्री आहे. लता दीदी म्हणजे, भारतीय गायनकलेच्या नंदनवनातील 'स्वरलता' आहे. भारताचे वातावरण आपल्या मंजूळ स्वरांनी भारून टाकणाऱ्या लता दिदींना "स्वरमाउली" ही उपाधी करवीर पीठस्थ शंकराचार्य यांनी प्रदान केली. अखिल जगतामध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांनी प्रस्थापित केलेल्या सूरसम्राज्याला कृतज्ञतापूर्वक नमन आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळनववी
No comments:
Post a Comment