हिंदुत्वाची सेवा हेच जीवनाचे ध्येय, तीच एकमेव उपासना आणि त्या उपासनेतूनच ईश्वरप्राप्ती हा सेवाभावी मार्ग स्वीकारणाऱ्या मूळच्या इंग्लंडमधील मार्गारेट, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी २८ जानेवारी १८८८ रोजी भारतात आल्या. कलकत्ता येथे श्रीसारदादेवी यांच्या आश्रमात त्या इतर संन्यासिनींप्रमाणे राहिल्या आणि त्यांचा जीवनक्रम त्यांनी जवळून पाहिला प्रसंगी श्रीसारदादेवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या स्त्रियांच्या अडीअडचणी त्यांनी ऐकल्या, स्त्रियांवरील अनेक परंपरा आणि रूढींची त्यांना कल्पना आली. त्याचबरोबर त्यांनी हिंदू पोथी- पुराणांचे अध्ययन केले. येथील जीवनपद्धती समजून घेऊन त्या प्रवाहात त्या यशस्वीपणे सामील झाल्या. उदार मन, अपार करुणा आणि नम्र वाणी या गुणांमुळे त्यांनी लोकांना लवकरच आपलेसे करून घेतले. याच गुणांमुळे स्वामी विवेकानंद विचारांच्या आधारवेल असणाऱ्या मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता आहे.
हिंदू समाजातील लोकांनीही मार्गारेटला आपले म्हणावे, त्यांना ती आपल्यातलीच वाटावी म्हणून स्वामीजी त्यांच्याशी तासन्तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असत. मार्गारेट यांची ग्रहणशक्ती अलौकिक होती. स्वामी विवेकानंद ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी त्यांना बरोबर नेत होते. तेथे अवलोकन करून, त्यावर विचार करून, तेथील पद्धती आत्मसात करून त्यांनी या समाज प्रवाहात सामील व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कोलकात्याच्या लोकांना आपल्या या पाश्चिमात्य शिष्याची ओळख स्वामीजींनी ‘इंग्लंडकडून भारताला मिळालेली ही एक अमोल देणगी’ अशी करून दिली होती. भगिनी निवेदिता स्वयंप्रज्ञ होत्या. जरी गुरू म्हणून स्वामीजींच्या ठायी त्यांच्या सर्व निष्ठा समर्पित असल्या, तरी भारताच्या आणि भारतीयांच्या उत्कर्षासाठी काय करता येईल, याचे त्या स्वतंत्रपणे चिंतन करीत होत्या त्यामुळेच त्यांचे योगदान केवळ सेवाकार्ये आणि महिला शिक्षण यापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाने आधुनिक भारताच्या जडणघडणीत सर्वस्पर्शी योगदान दिले आणि म्हणूनच भगिनी निवेदिता आपल्याला वंदनीय आहेत.
कोलकात्यात निलाम्बर मुखर्जींच्या बागेतील रामकृष्ण आश्रमात मार्गारेट यांनी आपले सेवाभावी व्रत स्विकारल्यानंतर गुरूचरणी त्यांनी आपले सर्वस्व समर्पण केले. त्यावेळी त्यांना स्वामीजींनी नवीन नावाने हाक मारली ‘निवेदिता’! आणि मार्गारेट हिने आपल्या या नवीन ओळखीसह भारतात सेवा कार्याला सुरुवात केली. 'निवेदिता' अर्थात जिने आपल्या आयुष्याचाच नैवद्य दाखवला आहे, अशी ती निवेदिता.
प्लेगच्या साथीत स्वामीजी आणि इतर शिष्यांच्या बरोबरीने त्यांनी रोगग्रस्तांची सेवा केली. स्वच्छतेचे महत्त्व स्वत: हातात झाडू घेऊन रस्ते, नाल्या साफ करून त्यांनी कृतीतून दाखवून दिले. केवळ वेदांताची चर्चा करणारी ही संन्यासिनी नाही तर कर्मयोग निष्काम बुद्धीने आचरणात आणणारी आहे, हे त्यांनी दाखवून दिले. रुग्णांना त्या देवदूताप्रमाणे भासत होत्या. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा वसा चालविणारी निवेदिता या स्वशक्ती आणि स्वसामर्थ्यावर उभ्या राहिल्या होत्या. पुढे स्वामीजींबरोबर पंजाब, काश्मीर यात्रा करून सर्वसामान्य यात्रेकरूंप्रमाणे त्या अमरनाथ यात्रेत सामील झाल्या. भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक डोळसपणे जपला जावा त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाची जाण मुलींना यायला हवी होती. त्या वेळी हिंदू समाजात बालविवाह पद्धत रूढ असल्याने बालविवाहित स्त्रियांची संख्याही मोठी होती. अशा अनाथ स्त्रियांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी, स्वावलंबी बनविणारे क्रियात्मक शिक्षण, उपयुक्त घरगुती उद्योग शिकविणे आवश्यक होते. आपल्या पती आणि मुलांशी संवाद साधण्यासाठी वाचन,लेखन, इतिहास, भूगोल हे सर्व शिकविणेही भाग होते. त्यातूनच कर्तबगार स्त्रिया तसेच उद्याची भावी पिढी सक्षम, बलशाली होईल यावर त्यांचे ठाम मत होते. या कन्या, गृहिणी, माता होतील तेव्हाच राष्ट्र, कर्तबगार, बलशाली होईल हे त्यांनी ओळखले होते आणि त्यातून त्या हळूहळू बदल घडवत होत्या.
नवरात्रात कालिपूजनाच्या दिवशी निवेदितांनी आपले ‘बालिका विद्यालय’ श्रीशारदादेवीच्या हस्ते मुलींना प्रवेश देऊन चालू केले. तरुण, प्रौढ, विधवांचा प्रश्न लक्षात घेऊन पुढे थोड्याच दिवसांत त्यांना उपयोगी पडेल अशा मातृमंदिराची स्वतंत्र स्थापनाही त्यांनी केली. घरोघरी जाऊन स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचा तो काळ होता. मूलींना शाळेत पाठवा म्हणून विनवण्या कराव्या लागत; पण निवेदितांनी अखंड परिश्रम करून शाळा नावारूपास आणली. त्यासाठी त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पुढे आयुष्यभर निवेदितांनी वेगवेगळी अनेक कामे उभी केली, शाळा आणि स्त्रीशिक्षण हा त्यांच्या सर्व कार्याचा केंद्रबिंदू होता. शाळेला आर्थिक चणचण नेहमीच भासे. पैसा जमविण्यासाठी त्यांनी लेखन, व्याख्याने, प्रवचने असा विद्याव्यासंग आयुष्यभर केला. आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल अशी मदत त्यांनी कधीही स्विकारली नाही. हेनरिटा मुल्लर या बाई ख्रिश्चन कल्पनांनुसार शिक्षण दिले तर आपली सर्व संपत्ती द्यायला तयार होत्या; पण निवेदितांनी ‘कालीमातेच्या कृपेने मला काही कमी पडत नाही’, असं सांगून पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला. ‘मी हिंदू आहे आणि या माझ्या मुली आहेत.’ ही धारणा त्यांच्यात पूर्णपणे रुजलेली होती. पुराण, इतिहासातील स्फूर्तिदायक गोष्टी त्या मुलींना कायम सांगत. त्या केवळ शाळेत नव्हे तर आसपासच्या घराघरांत, व्यावसायिकांत, दुकानदारांत, नोकरदारांत आदरणीय होत्या. ‘ही आपल्याला मदतीचा हात देईल, ही आपल्या पाठीशी आहे.’ असा विश्वास सर्व जनतेच्या मनात निर्माण झाला होता आणि हे सगळं त्यांच्यावर असलेल्या स्वामींजीच्या विचारांचा प्रभाव होता.
पुढे भगिनी निवेदिता यांनी स्वातंत्र्य चळवळीतही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी वृत्तपत्रांतून ब्रिटिशांविरुद्ध प्रखरपणे लेखन केले आणि जाहीर भाषणे दिली. वंगभंग आणि स्वदेशीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंदांच्या त्या मानसकन्या होत्या आणि स्वामीजींच्या विचारांच्या आणि कार्याच्या आधारवेल ही होत्या. ‘भगिनी निवेदिता’ या नावाने त्या विश्वविख्यात झाल्या. परंतु मार्गारेट नोबल ते स्वामीजींची शिष्या व मानसकन्या 'भगिनी निवेदिता' हा प्रवास अत्यंत खडतर होता. १३ ऑक्टोबर १९११ ला भारतातच, दार्जिलिंगमध्ये त्यांनी देह ठेवला. आज त्यांच्या विचारांनी भारताने आपले भारतीयत्व पुन्हा एकदा समजून घेण्याची नितांत गरज आहे. भगिनी निवेदिता यांना कोटी वंदन.
✍️ सर्वेश फडणवीस
#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळसातवी
No comments:
Post a Comment