Thursday, October 6, 2022

अयाचित मंदिर


जुन्याकाळी सर्वात पुढारलेले मंदिर म्हणजे अयाचितांचे मंदिर होते. महालातील अयाचित मंदिर मुळात हे श्री बालाजीचे मंदिर, 
अयाचितानी श्री बालाजीची वालुका मूर्ति स्थापन करून छोटेसे मंदिर बांधले. कालांतराने पुष्कळ मंदिरांची भर पडली. अयाचित महाराजांनी ते बांधले म्हणून अयाचित मंदिर म्हणून आजही ओळखले जाते. कीर्तन, प्रवचन, यज्ञ-याग याने हा परिसर त्या काळात गजबजलेला होता. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथयात्रेस लोक जमत आणि आजही ती परंपरा टिकून आहे. नागपूरचे हे वेगळेपण होते आणि आजही का होईना ते जपून ठेवले आहे.  

वेदशास्त्र संपन्न सदाशिव भट्ट महाराज यांनी महालातील हे अयाचित मंदिर त्यावेळच्या शहराच्या बाहेर बांधले होते. सदाशिव भट्ट महाराज मूळ चंद्रपूरचे. अध्यात्माचा ओढा असलेल्या सदाशिव भट्ट यांनी वयाच्या बाराव्या वर्षी चंद्रपूर सोडले आणि तीर्थयात्रा करण्यास निघाले. सर्वप्रथम तिरुपतीला जाऊन त्यांनी भगवान बालाजींचे दर्शन घेतले. तेव्हापासूनच असेच बालाजीचे मंदिर बांधावे, असा ध्यास त्यांनी घेतला होता. तीर्थयात्रा करताना कुणी आपणहून खाण्यासाठी दिले तरच ते खायचे अन्यथा तसेच राहायचे. मात्र, खाण्यासाठी त्यांनी याचना केली नाही. या अयाचित वृत्तीमुळेच लोक त्यांना अयाचित महाराज म्हणू लागले. तिरुपती यात्रेनंतर त्यांनी काशी यात्रा केली. त्यानंतर १७८५ साली ते नागपुरात आले. नागपूर शहराला परकोट होता. आजच्या अयाचित मंदिराचा परिसर गावाच्या बाहेर होता. या परकोटाची भिंत व दरवाजे इंग्रजांनी रस्ते करण्यासाठी पाडले. भंडार दरवाजाकडून अयाचित मंदिराकडे जाण्यासाठी लाकडी फळ्या व बांबूंचा पूल होता. तो लाकडी पूल म्हणून ओळखला जायचा. आता हा पूल नसला तरी आजही तो परिसर लाकडी पूल परिसर म्हणून ओळखला जातो. सदाशिव भट्टांचा कल आध्यात्मिक वृत्तीकडे अधिक असल्याने बालाजींची स्थापना करावी व बालाजींच्या भक्तीत जीवन व्यतीत करावे, असा विचार त्यांनी केला. नाग नदी त्या काळात स्वच्छ होती. नदीचे पाणी लोक पिण्यासाठी वापरत. लोक नदीवर येऊन स्नान करीत, कपडे धूत. नदीच्या काठावरील शुद्ध रेती त्यांनी घेतली व त्यात चिंचेचा पाला, इतर वनस्पती रस, जवस तेल व इतर आवश्यक पदार्थ घालून ती मूर्ती तयार केली. येथील सभामंडपची लांबी ३० फूट असून, रुंदी १२ फूट आहे. १६ लाकडी खांब असून, त्यावर कोरीव काम आहे. तिरुपतीला जशी बालाजीची दैनिक पूजा, नवरात्रोत्सव, ब्रह्मोत्सव, पुराणवाचन, आरती, रथयात्रा होते त्याचप्रमाणे आपल्या या मंदिरात व्हावे, अशी त्यांची इच्छा होती व तीच परंपरा त्यांनी नागपुरात सुरू केली.

तेथील रथाचीही कथा सर्वश्रुत आहे. देवासमोर आलेल्या पैशातून अयाचित गुरुजी यांनी लाकडे व साहित्य खरेदी करून तिरुपती येथील रथासारखाचा रथ तयार केला. रथोत्सवाच्यावेळी भाविक रथासह मंदिराला प्रदक्षिणा घालतात. येथील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे फावडे भात-(रूढशब्द-पावडे भात) कारण तो इतका होत असे कीं, त्याचा ढीग उकरावयाचा म्हणजे फावड्याचाच उपयोग करावा लागत असे. त्या दिवशीं सोवळे ओवळे जेमतेमच असत. येईल त्याला प्रसाद मिळत असतो. हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या नंतरच्या रविवारी साजरा होतो. शहराचे वेगळेपण हे असेच टिकून राहते. परंपरेचे पाईक होण्यात ही वेगळा आनंद असतो. पिढी दर पिढी तो आनंद संक्रमित करून शहराचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करुया. एकदा तरी आवर्जून दर्शनासाठी जावे असे अयाचित मंदिर. 

✍️ सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment