शारदीय महिना येताच बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्साह बघायला मिळतो. नवीन कपडे, नवे दागिने घालून उत्साहात दुर्गापूजा साजरी केली जाते. चार दिवसांचा हा उत्सव संपताच सर्वजण दुःखी होतात. पण नंतर काही दिवसांनी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी प्रत्येक घरात पुन्हा तोच उत्साह बघायला मिळतो आणि त्यानंतर काही दिवसांनी दिवाळी येते. याच दिवाळीच्या नंतर जगद्धात्री पूजेचे वेध लागतात. कलकत्ता शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदननगर नावाच्या छोट्याशा गावात जगद्धात्री पूजेची सुरुवात झाली.
जगद्धात्री पूजा दुर्गापूजेच्या ठीक एक महिन्यानंतर साजरी केली जाते, असे म्हणतात की इंद्रनारायण त्या काळातील मोठे व्यापारी असलेले चौधरी यांनी रणनगरच्या राजाची रिनचंद्राची जगद्धात्री पूजा पाहिली. त्यानंतर त्यांनी ही पूजा चंदननगर मध्ये सुरू केली. इंद्रनारायण चौधरी हे त्या काळातील मोठे व्यक्तिमत्व होते. १७५० मध्ये त्यांनी घरोघरी जगद्धात्री पूजन सुरू केले. कालांतराने प्रत्येक गावात आणि शहरात ही पूजा सुरू झाली आणि आज कार्तिक महिन्यात देवी जगद्धात्रीची पूजा आनंदाने साजरी केली जाते.
आता या पूजेला मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले आहे देवी जगद्धात्री यांच्या हातात अनेक शस्त्रे आहेत. पौराणिक कथेनुसार, महिषासुरावर विजय मिळवल्यानंतर देवांना अहंकार आला होता आहे. त्यांना वाटले की दुर्गेने त्यांना दिलेल्या शस्त्रांमुळे महिषासुराचा वध झाला. तेव्हा यक्षाने त्यांना धडा शिकवला आणि त्यांना जाणीव करून दिली की एक महान शक्ती आहे किंबहुना प्रत्येक विजयाच्या मागे त्या शक्तीचा हात आहे. त्या शक्तीला जगद्धात्री म्हणतात आणि ती देवीच्या रूपात होती आणि त्यांनी त्या रूपाची पूजा केली. जगद्धात्री (जगत् + धात्री, जगाची रक्षक अशी ती जगद्धात्री) हे दुर्गेचे एक रूप आहे. ही जगद्धात्री सिंहवाहिनी हिंदू धर्मातील दुर्गेच्या रूपात चतुर्भुजा, त्रिनेत्र आणि रक्तवर्णा आहे. या पूजेचा उगम अज्ञात आहे
जगद्धात्री उपासनेचा उल्लेख शक्तीसंगमतंत्र, उत्तर कामाख्यातंत्र, भविष्य पुराण स्मृतीसंग्रह आणि दुर्गा कल्प या ग्रंथांमध्ये आढळतो. केनोपनिषदात हेमवतीचे वर्णन जगद्धात्री असे केले आहे. त्यामुळे त्यांना अभिन्न मानले जाते, कार्तिक शुक्ल पक्ष नवमीला या जगद्धात्री देवीची पूजा करण्याची पद्धत आहे. अष्टमीला आवाहन करत नवमीला तिचे पूजन केल्या जाते. ही पूजा विशेषतः पश्चिम बंगाल आणि बिहार (मधुबनी) मध्ये केली जाते, तिथेही चंदननगर आणि आसपासच्या भागात जगधात्री पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते.
वेद, पुराण आणि धर्मग्रंथानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी ते नवमी तिथीपर्यंत जगद्धात्री पूजा साजरी केली जाते. जगद्धात्री देवीचे रूप वर्णन म्हणजे देवी जगद्धात्रीचा रंग पहाटेच्या सूर्याच्या लालसरपणासारखा आहे. देवीला तीन डोळे आणि चार हात आहेत. ज्यामध्ये देवी जगद्धात्री हिने शंख, बाण, धनुष्य आणि चक्र धारण केले आहे, देवीने लाल वस्त्र परिधान केले आहे, श्रृंगार केल्यावर देवीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. देवी सिंहावर स्वार होते. देवीचे हे रूप खूप मोहक आणि सौंदर्याने परिपूर्ण आहे.
श्री माँ शारदादेवी यांची जगद्धात्री पूजनावर विलक्षण भक्ती होती. त्यांची आई श्यामसुंदरी याही अतिशय धार्मिक आणि भक्त होत्या. लहानपणापासूनच जयरामवाटीत दरवर्षी जगद्धात्रीची पूजा केली जात होती. कालांतराने रामकृष्ण मिशन मधील अनेक केंद्रात ही जगधात्री पूजा आवर्जून होते. जोपर्यंत माँ शारदा शरीररूपाने होत्या, तोपर्यंत त्या स्वतः दरवर्षी जयरामवाटीमध्ये या पूजेसाठी उपस्थित राहत असत. आज या पूजेचे काही फोटो रामकृष्ण मठाच्या पेजवर बघितले आणि त्यावर स्वामीजींकडून अधिक जाणून घेतल्यावर हे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#jagadhatripuja2022
No comments:
Post a Comment