"अलगद" खरंतर या नावातच नाजूकपणा, हळुवारपणा जाणवतो. असंच अलगद या नावाचे धनश्री लेले यांचे ललित लेखांचे पुस्तक नकळतपणे कसे हातावेगळे होते हे वाचकालाही जाणवतच नाही. रोजच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न धनश्री ताई यांनी समर्थपणे केला आहे. हे पुस्तक रोजच्या... म्हटलं तर अतिशय साध्या विषयावरचे हे लेख. पण मानसिक, वैचारिक, अध्यात्मिक अंगाने खुलत, फुलत जातात आणि आपल्याला अंतर्मुख करतात. सहज एका बैठकीत वाचून संपेल असेच विषय आणि विचार यात पानोपानी जाणवतात. वाणीची श्रीमंती प्रदान करणाऱ्या धनश्री ताई आहेतच पण या पुस्तकाच्या निमित्ताने ललित लेखांचे हे विचार प्रत्येक पानावर आपल्याला अनुभवता येतात. त्याच सहज संवाद करत आहेत इतके आपण वाचतांना तल्लीन होऊन जातो. त्या एके ठिकाणी लिहितात, घरी एकटे असतांना, वाहनात प्रवास करतांना, किंवा चालत फेऱ्या मारत असतांना असंख्य विचार आणि विषय आपल्याला सुचत जातात. म्हणजे सुरुवात आपल्या अनुभवातून होते आणि विचार करता करता आपण एकदम वैश्विक विचार कधी करायला लागतो हे आपल्याला ही उमगत नाहीच.
या पुस्तकाच्या मनोगतात धनश्री ताई म्हणतात, " एखादा छोटासाच विचार पण त्या विचाराची ठिणगी उडते आणि मन एकदम उजळून निघतं. मग तो विचार आणखी पुढे न्यावासा वाटतो. 'पुढे न्यावासा वाटतो' असं म्हणण्यापेक्षा त्याचं बोट धरून आपणच पुढे पुढे जाऊ लागतो. म्हणजे जपाच्या माळेतला मणी कसा ... जपाची सुरवात आपण करावी लागते पण नंतर मात्र तो माळेतला मणी कसा आपसूक पुढे जाऊ लागतो... अगदी तसंच ह्या विचारांचं होतं. मनातल्या मनात विचारांचे मणी अलगद पुढे पुढे जाऊ लागतात. काही वाचलेलं, काही साचलेलं, काही टाचलेलं, काही डाचलेलं असं सगळं आठवत जातं... आणि बघता बघता एखाद्या ललितलेखाचा आराखडाच तयार होऊन जातो...."
याच पुस्तकातील अलगद लेखात त्या खूप छान सांगून जातात . स्वस्थ... किती सुंदर शब्द! स्व स्थ... स्व मध्ये राहणं म्हणजे
स्वस्थ ... स्वत:त रमणं म्हणजे स्वस्थ... ही स्वस्थता यायला हवी..भावना व्यक्त व्हायला हवी... पण समोरच्याला ती कळलीच पाहिजे असा अट्टाहास उरणार नाही... कदाचित त्या स्वस्थतेतून आपली भावना अगदी अलगद व्यक्त करण्याची शैलीही सापडेल.
आणि असं सहज सुचत गेलले हे विचार-तरंग म्हणजे "अलगद" आहे. सृजन - संवाद या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे अत्यंत देखणे पुस्तक वाचून झालं. उत्तम छपाई, आकर्षक मुखपृष्ठ आणि उत्तम विषय ही या प्रकाशन संस्थेची आणि अर्थातच या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
... एका शायरचा एक शेर आहे, भावना किती अलगद आणि किती नजाकतीनं व्यक्त करता येते याची सुंदर मिसाल आहे तो शेर… 'उसने रात के अंधेरे मे मेरी हथेलीपर अपनी नाजूक
उंगलीयोसे लिखा था मुझे प्यार है तुमसे,
जाने कैसी स्याही थी वो कि लफ्ज़ मिटे भी नहीं
और आज तक दिखे भी नहीं'
समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचणारी भावना प्रगल्भपणे पण अलगद व्यक्त करणं सोपं नाही... लफ्ज़ मिटे भी नहीं और दिखे भी नही! हा शब्दांचा ललित लेखांचा सर्वोत्तम संग्रहित प्रवास म्हणजे "अलगद" वाचनीय आणि संग्रही असावा असाच आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment