Sunday, October 2, 2022

⚜️ आधारवेल : तेजतपस्विनी वं.मावशी केळकर

 

वं मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका. साधं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्त्व उभं राहतं. खरंतर अंतःकरणातून सात्विक भाव दर्शविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. मावशी केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या कार्यविस्ताराच्या आधारवेलीवर आजही त्यांची शिकवण अनमोल अशीच आहे. त्याकाळी रामायण प्रवचनांच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कारित करण्याचं घेतलेले व्रत आजन्म शेवटपर्यंत निष्ठेनं पाळलेल्या वं मावशींचे जीवन म्हणजे तीव्र लढा होता. ऐन तारुण्यात वं मावशींना वार्धक्य आले. घरातल्या कर्त्या पुरुषाचे आकस्मिक निधन झाल्यावर सर्व मुलं अज्ञान आणि प्रपंचाचा व्याप तर मोठा पण वं. मावशींनी मोठ्या धैर्याने आणि संयमाने आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड दिले.

साधारण १९३६ तो काळ. ज्या काळात साधनांची उपयुक्तता नव्हती. स्त्रियांना घराबाहेर वावरणेही कठीण होते. अशा सर्व कठीण परिस्थितीवर मात करत वर्धेसारख्या छोट्या गावातून लक्ष्मीबाई केळकर या अखिल विश्वात असणाऱ्या सेविकांची वं. मावशी झाल्या आणि हे सगळं स्वप्नवत असल्यासारखे वाटतं. ज्या काळात ‘अबला’ हे स्त्री समाजाला केले गेलेले दुर्बलत्व विशेषण पुसून टाकण्यासाठी आणि स्त्री शक्तीचा साक्षात्कार होऊन स्त्री जीवनाचे शास्त्र कोणते हे जाणण्याची त्यांना प्रेरणा झाली आणि या प्रेरणेचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे १९३६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय स्त्री संघटनेचे त्यांनी केलेले बीजारोपण होते. 

१९३६ साली पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून नागपूरात परत जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार यांनी वर्धेस मुक्काम केला. त्यावेळी संघ शाखेत डॉ. हेडगेवार यांचा बौद्धिक वर्ग ठेवण्यात आला. त्यासाठी स्वयंसेवकांच्या पालकांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले होते. याच वेळी ज्या पालकांची डॉ. ना भेटण्याची इच्छा होती त्यांना दुसऱ्या दिवशी भेटीसाठी निमंत्रित करण्यात आले. तेव्हा डॉ. हेडगेवार आणि वं मावशी यांची पहिली भेट झाली. ती भेट अल्पवेळाची होती पण वं. मावशींनी डॉ. ना भेटल्यावर संघाप्रमाणे स्त्री संघटन असावे अशी मनातील इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात होते की स्त्री समाजाचा विचार करायचा असेल तर स्वतः स्त्रियांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न हाताळायायला हवा आणि काही काळाने परत आप्पाजी जोशी यांच्याकडे डॉक्टरांचे येणे झाले आणि त्यानंतर पुन्हा डॉ.हेडगेवार, आप्पाजी आणि वं.मावशी यांची भेट झाली. ही भेट अतिशय महत्त्वाची होती कारण डॉ. हेडगेवार यांनी तेव्हाच वं मावशींना सांगितले होते की संघ आणि समिती या दोहोत वैचारिक आणि कार्यक्रम विषयक साम्यता आणि यथायोग्य सहकार्य चालू राहिले तरी समिती संघाची स्त्री शाखा म्हणून कधीच गणली जाणार नाही. त्यांनी आगगाडीच्या रुळांचा दृष्टांत देऊन स्पष्ट केले. ते म्हणाले,‘ गाडीच्या रुळांप्रमाणे या दोन्ही संघटना समांतर असतील पण कधी एकत्र न येणाऱ्या राहतील. वं.मावशींची समिती कार्याबद्दलची कळकळ आणि कार्यधुरा संभाळण्यासंबंधीची कुवत याबाबत डॉ. हेडगेवार यांना अधिक विश्वास वाटला आणि त्यांनी तेव्हा स्त्री संघटनेचा विचार वर्धेपूरता न ठेवण्यासंबंधी वं मावशींना सुचवले.

आज समितीचे कार्य विश्वव्यापी आहे ती दृष्टी वं. मावशींच्या चरित्रातून जाणवते. आसेतुहिमाचल या एका ईश्वरी कार्यासाठी त्या सतत भ्रमण करत राहिल्या. वं.मावशींचा विश्वास होता की राष्ट्राची उभारणी,त्याचा गौरव,त्याची प्रतिष्ठा ही स्त्रीवरच अवलंबून आहे. कारण राष्ट्रधर्माची ती धारक, रक्षक आणि वाहक आहे. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी तिला याचे भान असायला हवे. वं.मावशींची स्त्रीविषयक संवेदनशीलता आणि सहृदयता यांचे प्रत्यंतर त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात जाणवते. एका ध्येयासाठी त्यांनी घेतलेले कष्ट,परिश्रम यांची पराकाष्ठा म्हणजे आजचे राष्ट्र सेविका समितीचे विश्वव्यापी स्वरूप असे म्हणता येईल.

वं. मावशींच्या स्वभावात धर्म, संस्कृती, शील आणि सचोटी हे गुण जन्मतःच होते. त्यामुळे हे सर्व सद्गुण समितीच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये निर्माण करण्याचे त्यांनी त्यावेळी ठरवले. कोणाही व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करण्याचे काम फार खडतर असते. वं.मावशींनी आपले जीवन तसे घडवले. वं.मावशींच्या जीवनात तत्व आणि शिस्त या दोन गोष्टींबाबत त्या अत्यंत कठोर आणि स्वयंसेविकेच्या बाबतीत अत्यंत हळुवार आहेत असे वाटते. भारतीय परंपरेने घालून दिलेल्या आदर्शानुसार हिंदू स्त्री सदैव सशक्त, नीतिमान आणि कार्यप्रवण राहावी या साठी तिला संघटनेच्या सूत्रात बद्ध करणे हे समितीचे कार्य आहे. राष्ट्राचे उत्थान व्हायचे असेल तर स्त्री शक्तीला एकत्रित आवाहन करण्याची आवश्यकता आहे. 

स्त्री ही राष्ट्राची जननी आहे. प्रेम आणि संस्कार करण्याचे गुण तिच्या अंगी असतात आणि पर्यायाने समाज घडविणे हे तिचे आद्य कर्तव्य आहे. ती विशेष कर्तव्यदक्ष आणि  कार्यकुशल असायलाच हवी ही  वं. मावशींची शिकवण आणि समिती स्थापनेच्या वेळी बघितलेले स्वप्न आज पूर्णत्वास होताना दिसत आहे. स्त्री शक्ती जागृतीचा वं मावशींनी आरंभिलेला हा यज्ञ अगणित अशा सेविकांच्या श्रद्धायुक्त श्रम आणि अजोड त्यागाच्या आहुतींनी सदोदित प्रज्वलीत ठेवला आहे.

वं. मावशींच्या व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य पैलूंचे असाधारणत्व यात येऊ शकले नाही याची पूर्ण जाणीव आहे. वरवर शांत भासणारे परंतु अंतर्यामी असणारे त्यांचे जीवन सांगण्यापेक्षा अनुभवण्यासारखे आहे. ध्येयाबद्दल नितांत श्रद्धा, कार्यवाढीची कळकळ आणि कशाही परिस्थितीत कार्य करीत राहण्याची जिद्द ही त्यांची विशेषत्वाची त्रिसूत्री आहे. थोडक्यात त्यांचे जीवन म्हणजे साधरणत्वा कडून असाधारणत्वाकडे उंचावलेला आलेखच आहे असे म्हणता येईल. 

वं. मावशींच्या जीवन चरित्रातून कार्य करण्याची अक्षय स्फूर्ती राष्ट्र कार्य करण्याऱ्या प्रत्येकाने आत्मसात करावी. कारण हिंदू समाजाला शक्तीसंपन्न करून त्याला परम वैभवाकडे नेण्यासाठी कोणत्या तत्वज्ञानाची व कार्याची कास धरली पाहिजे याची जाणीव करून देण्याचे दायित्व आपल्यावरच आहे. वेळ फार थोडा आहे, तरीही प्रत्येकाने शर्थ करून समाजात तो बदल घडवून आणण्यासाठी व.मावशींसारख्या आधारवेलीच्या शिकवणीतून सदैव प्रेरणा देणाऱ्या, स्त्री शक्तीचा आविष्कार असलेल्या वं. मावशी केळकर यांच्या चरणी सादर नमन. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळआठवी

No comments:

Post a Comment