Thursday, October 8, 2020

चिखलगावच्या लोकसाधनेचे कल्पवृक्ष -डॉ राजा आणि रेणू दांडेकर

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.राजा आणि रेणू दांडेकर. आज दापोलीच्या चिखलगावामधील लोकसाधनेचे हे कल्पवृक्ष चिखलगाव ला सावली देणारे ठरले आहे. १९८२ साली एक दांपत्य पुण्याहून दापोलीजवळच्या चिखलगाव इथे वास्तव्यास आले आणि तेथूनच परिवर्तनाची नांदी सुरू झाली. खरंतर हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे आणि आज लोकसाधनेचे कार्य चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमधून सुरू आहे.

लोकमान्य टिळकांचे जन्मगाव असलेल्या चिखलगावात सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न डॉ. राजा आणि रेणू दांडेकर ह्यांनी केला आहे. कल्पक,निर्मितिक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम सुरू आहे. याला आज लोकमान्यता मिळत आहे आणि काम अधिक दृढ होत आहे. 

डॉ. राजा दांडेकर ह्यांनी बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली. परंतु समाजाचं ऋण फेडण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य या विषयांत कार्य करण्यासाठी ते पुन्हा गावाकडे आले आणि १९८२ पासून आजतागायत लोकसाधना ज्यांनी नित्यनूतन,जागृत,शाश्वत आणि वर्धिष्णू  ठेवलेलं आहे ते म्हणजे डॉ.राजा दांडेकर आणि त्यांना साथ देणाऱ्या रेणू दांडेकर आहे. रेणू दांडेकर साहित्य क्षेत्रातील एक अग्रणी नाव आहे. शिक्षण क्षेत्रात नवे क्रांतिकारी बदल घडवत, लेखन, मूल्याधिष्ठीत शिक्षण आणि संस्कार अशा अनेक विषयांवरील लेखनात त्यांचे विशेष योगदान आहे. अनेक दैनिकात लेखमाला आणि त्यांची  बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 

लोकसाधना, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने चिखलगाव इथे शिक्षण आणि ग्रामविकासाचा एक वटवृक्ष दिमाखात उभा आहे. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने तो वसवलेला आहे, त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर रुजवलेला आहे. संघटनात्मक काम न करता केवळ रचनात्मक काम करायचं, हे मनाशी पक्कं ठरवून हे दोघे चिखलगावी आले आणि १ ऑगस्ट १९८२ रोजी एका गोठ्यात त्यांची पहिली शाळा भरली. ही सुरुवात म्हणावी तितकी सोपी नव्हती. खरंतर गावकर्‍यांना शाळेचं महत्त्व पटवण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. जेम्स लेनची पाच सूत्रं ते आवर्जून नमूद करतात जी त्यांनी स्वतः आचरणात आणली - १. लोकांच्यात जा. २. लोकांसारखं राहा ३. लोकांपासून शिका. ४. तुम्हाला काय येतं हे विसरा. ५. लोकांच्या गरजांसाठी काम करा. ही सूत्रं घेऊन त्यांनी काम सुरू केलं आणि आज लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही इतर कुठल्याही शाळेसारखी नसलेली शाळा असण्याचं कारण म्हणजे वेगळा विचार करायची राजा आणि रेणू दांडेकर ह्यांची आग्रही भूमिका हेच एकमेव कारण आहे. गोठ्यात सुरू झालेली शाळा आज शासनाची दाद मिळवतेय. तिच्या वेगळेपणामुळे युनायटेड नेशन्सने तिला प्रमाणित केलेलं आहे. हसत खेळत,वेगवेगळ्या पद्धती आणि नवनवीन बदल घडवत इथे आज शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे . शाळा म्हणून खूप अशी शिस्त नसतेच,सहजपणे प्रत्येकजण प्रत्येकाचे नेमून दिलेले कार्य करत असतात. विद्यार्थी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी मात्र असते. शिक्षक म्हणूनही शाळेबद्दल आपलेपणाची भावना जपणारे इथले सगळे लोक आहेत. म्हणून आज शाळेचा आलेख वर्धिष्णू होतो आहे. 

शासन स्तरावर आणि प्रचलित शिक्षणपद्धतीत ज्या प्रकारे शाळा चालतात, त्या प्रकारे राजा आणि रेणू दांडेकर ह्यांना ही शाळा चालवायचीच नव्हती. त्यांनी वर्गात जाऊन कधीच शिकवलं नाही. 
शिक्षण हे प्रयोगशील आणि उत्पादक कसं होईल हा त्यांचा विचार होता. शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे,असे त्यांना कायम वाटत राहिले आणि त्यातूनच त्यांनी वेगळेपण हे जपले आणि विद्यार्थ्यांसमोर सुद्धा रुजवले आहे. आज बाहेरच्या देशांसारखी मल्टि स्किल्ड वर्कर किंवा  हँडी मॅन प्रकारची मुलं आपण निर्माण करायला हवीत, म्हणून शाळेतच तांत्रिक शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि बदलाचे वारे वाहू लागले. आज शासनाने आणि अनेक संस्थांनी त्यांच्या 'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी या कोर्सला मान्यता दिलेली आहे. अनेकांनी यशस्वीरीत्या हे शिक्षण पूर्ण करत गावातच चांगला उद्योग सुरू करून यशस्वी झाले आहेत. 

लोकमान्य टिळक विद्यामंदिरात शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. मातृभाषेतून शिक्षण व्हावं हीच ह्यांची आग्रही भूमिका आहे. या शाळेत पाचवीपासूनच मुलांना कौशल्याभिमुख किंवा स्किल बेस्ड शिक्षण दिलं जातं. व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीचं महत्त्व आज हळूहळू वाढतंय, पण लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ते गेली ३८  वर्षांपासून सुरू आहे. इथे होम सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट, मेकॅनिकल इत्यादी विषयक वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. इथे आठवी ते दहावीच्या मुलांना आय.बी.टी. म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा पर्याय मिळतो. हा एसएससी बोर्डाने मान्य केलेला व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. आठवड्यातला एक दिवस ही मुलं विविध तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यात घालवतात. त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी हा अधिक प्रगत अभ्यासक्रम आहे, ज्यात शेतीपासून ते बांधकामापर्यंत सर्व तंत्रांचं शिक्षण त्यांना मिळतं आहे. आज ह्यांचे कार्य यशोशिखरावर आहे. इथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही तितक्याच प्रेरक आणि प्रेरणादायी आहेत. 'अशी घडली माणसं' या डॉ.राजा दांडेकरांनीच लिहिलेल्या पुस्तकात त्या संकलित केलेल्या आहेत. वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

आज डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांचा प्रवास दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. ज्यावेळी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची होती त्यावेळी भारतरत्न नानाजी देशमुखांनी डॉ. राजा दांडेकर ह्यांना जो मंत्र दिला त्याने कार्याचा विस्तार उत्तरोत्तर बहरणारा आहे. श्रद्धेय बाबा आमटे ह्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांच्या लोकसाधनेचे कार्य उत्तुंग आणि प्रेरणादायी आहे. आज त्यांचा मुलगा कैवल्य दांडेकर ही गावातच स्थायिक झाला आहे आणि लोकसाधनेच्या कार्याचा रथ ओढतो आहे आणि मुलगी मैत्रेयी सुद्धा भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन या पदावर देशसेवेत आहे आणि स्नुषा धनश्री कैवल्य दांडेकर  सध्या चिखलगवच्या शाळेत अनेक शैक्षणिक प्रयोग करत आहे. अशी जगावेगळी माणसं आहेत म्हणून भारताचे वेगळेपण टिकून आहे. आपल्या कार्याला मनापासून शुभकामना आहेतच. संत तुकाराम महाराजांचे वचनच ह्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरेल,

बोले तैसा चाले । त्यांची वंदावी पाउले ॥

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे https://loksadhana.org

#loksadhana #chikhalgaon

No comments:

Post a Comment