Monday, October 12, 2020

आदिवासींचे आशास्थान डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे. ह्यांच्या कार्याला जवळून बघण्याचे भाग्य लाभले आहे. आतापर्यंत ३ वेळा हेमलकसा येथे जाणे झाले. दिवाळीत सुद्धा एक दिवस तिकडे जाऊन आलो आहे त्यामुळे आता ऋणानुबंध आणि जवळीक निर्माण झाली आहे. हेमलकसाचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. 'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्‍या बाबा आमटे ह्यांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं, कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं आहे. विकास आणि प्रकाश या त्यांच्या कर्तृत्ववान मुलांनी बाबा आमटे ह्यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे. डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत आणि आज डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे ह्यांच्या रूपाने पुढची पिढी ही कार्यमग्न आहे. 

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात १९७२ साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. २३ डिसेंबर १९७३ साली हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. आरोग्यासोबतच शिक्षण,आदिवासींची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली चार दशके त्यांचे काम सुरू आहे. माडिया गोंड आदिवासी भूक,रोगराई,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे,शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर,वकील होत आहेत. वैद्यकीय उपचार अभावी होणार्‍या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे.

हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग पर्यटन म्हणून बघणार्‍यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी,अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी अशा परिस्थितीत राहणं हे काही दिवसांसाठी ठीक होतं पण ज्या हेतूने ते  इथे आले होते त्या आरोग्यसेवेला सुरुवात झाली.आरोग्यसेवेबरोबर हेमलकसाच्या आदिवासींमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर महत्त्वाचे होते ते म्हणजे शिक्षण. आदिवासीना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच मूळ उद्देश होता. हा उद्देश घेऊन प्रथम १९७६ साली निवासी आश्रमशाळा सुरू झाली. आज ह्या शाळेत ६५० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजूबाजूच्या दुर्गम भागात ही अनेक ठिकाणी नवीन शाळा सुरू झाल्या आहेत. ह्यांच्या प्रयत्नाने आज दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे. 

सुरुवातीला ज्यांच्यासाठी त्या जंगलात हे दाम्पत्य आले होते ते आदिवासी वार्‍यालाही उभे राहत नव्हते. एका अर्थानं त्यांचंही बरोबरच होतं. कारण त्यांना ही मंडळी परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार कारण त्यांची भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची म्हणजे त्यांच्याशी काहीतरी संपर्क व्हायला हवा होता; पण नेमका तोच होत नव्हता. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही. पण बर्‍याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात. तसंच काहीसं या बाबतीत झालं होतं. पण त्यावरही यशस्वी मात करत माडिया भाषा शिकून आज आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. 

डॉ. प्रकाश आमटेंनी जंगली प्राण्यांच्या नात्याला आज वेगळा नवा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका, असा शासकीय अधिनियम असताना गेली चार दशकं प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉ. प्रकाश आमटे आहेत. देश,काल,परिस्थितीनुसार आजही ते प्रसंगी शासनस्तरावर आपली बाजू भक्कमपणे मांडत असतात कारण हे सारे प्राणी हेमलकसाचे खरे आधारवड आहेत. 
प्राण्यांच्या या अनाथालयाला आज 'आमटेज् अनिमल आर्क' असं नाव देण्यात आलं. 'झू आऊटरिच ऑर्गनायझेशन'च्या संस्थापक सॅली वॉकर यांनी येथील प्राणी पाहून हे नाव सुचवलं आणि आज बिबट्या, कुत्रे, सिंह, हरीण, अस्वल असे अनेक प्राणी एकत्र सुखाने नांदताना दिसत आहेत. एरव्ही जंगलात हे सगळे प्राणी परस्परांचे शत्रू असतात. पण इथे सगळे गुण्यागोविंदाने एकत्र आहेत. हा प्रकल्प बघण्यासारखा आहे. प्रकाशवाट ह्या आत्मचरित्रात डॉ. प्रकाश आमटे लिहितात, आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन प्रत्येक परिस्थितीत वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आता सगळे खूप जवळ आलो आहे. पुढे सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं..जे अजूनही एकत्र आहे. 

बंड,अदम्य साहस आणि करूणा हेच तीन गुण जग बदलायला आवश्यक असतात आणि हे तिन्ही गुण एकत्र असणारी माणसं दुर्मिळ असतात. पण हीच माणसं आपलं जग बदलतात. आज हेमलकसा जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्या कार्याची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते आहे. अनेक पुरस्कारांचा वर्षाव त्यांच्या कार्यावर झालेला आहे. आज त्यांनी आपल्या कार्यातून नंदनवन फुलवले आहे आणि म्हणूनच ते सर्वार्थाने प्रत्येकाचे आशास्थान झालेले आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे #लोकबिरादरी #हेमलकसा #prakashamte

1 comment: