आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत सारंग गोसावी.आपण अनेकदा म्हणतो, 'मराठी पाऊल पडते पुढे !' पण खऱ्या अर्थाने आपल्या कार्यातून प्रत्यक्षात मराठी पाऊल जे आज सीमेवर आणि बहुचर्चित असलेल्या जम्मू काश्मीरमधील अनेक दुर्गम भागात प्रसंगी प्रत्यक्ष सीमा भागात आदराने नाव घेतले जाते आणि आजही प्रसिद्धीच्या झोतात न येता शांतपणे काम करणारे सारंग गोसावी आणि "असीम फाऊंडेशन" च्या माध्यमातून काम करणारी त्यांची संपूर्ण टीम आहे.
शतकांपासून काश्मीर चे भारताशी सांस्कृतिक,शैक्षणिक, धार्मिक , ऐतिहासिक संबंध आहेत. भारताची उज्ज्वल ज्ञानाची परंपरा काश्मीर शिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रख्यात कवी, साहित्यिक, खगोलतज्ञ ,व्याकरणतज्ञ व तत्ववेत्ता आचार्य अभिनवगुप्त यांच्या अथक अभूतपूर्व प्रयत्नांमुळे कर्तृत्वामुळे काश्मीर ची ज्ञानपीठ, शारदापीठ अशी ओळख जगभरात निर्माण झाली. केरळच्या कालडी मधून आलेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू म्हणून याच भूमीतून ओळखले जाऊ लागले. अशा भव्यदिव्य ज्ञानाच्या परंपरेची गंगोत्री म्हणून काश्मीर ची ओळख आहे.
पण हल्ली काश्मीरमध्ये सतत हल्ले होत असल्यानं तिथे खूप मोठ्या प्रमाणात लष्करी यंत्रणा कार्यरत आहे. कधी अतिरेकी, दहशतवादी हल्ले करतात, तर कधी लष्कराकडून हल्ला होतो. यात बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसं भरडली जातात. विकासाची कामं होत नाहीत. दहशतवादी हल्ला करतील ही भीती इतर ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात बसलेली आहे. अशा वेळी पुण्यातील सारंग गोसावी काश्मीरला जायचं फक्त तिकीट घेऊन गेले आणि गेली २० वर्षं जातच आहे तेही तिथलं निसर्गसौंदर्य,हवापालट म्हणून नाही, तर तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना ‘मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात’ हे सांगण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी,त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी, त्यांना भारत कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू आहे.
काश्मीरमधला सगळा परिसर सारंग गोसावी फिरत राहिले. तिथल्या लष्कराची मानसिकता त्यांनी समजून घेतली, तसंच तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्नही प्रत्येक भेटीत कळत गेले. जन्माला आल्यापासून ज्या मुलाला आसपास बंदुकधारी सैनिक दिसत असतील, तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचारही करायला लागले. काश्मीरमधल्या दहशतवादाचा अभ्यासही होत गेला. आपण काय करू शकतो, आपल्यात काय क्षमता आहेत याचा विचार करून सारंग गोसावी ह्यांनी तिथल्या स्थानिक युवकांना Physics हा विषय शिकवायचं ठरवलं. ठिकठिकाणी जाऊन ते क्लासेस घ्यायला लागले. सुरुवातीला तिथल्या लोकांना हा बाहेरचा तरुण येऊन असं का करतोय का प्रश्न पडला; पण सहवासानं त्यांना त्यांचा हेतू कळला. आपल्याच घरातला हा एक मुलगा आहे हेही त्यांना वाटायला लागले. मुला-मुलींच्या संपर्कातून सारंग गोसावी प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचले आणि त्यांनी कुपवाडा इथं पहिलं केंद्र सुरू केलं. तिथली अलफैयाज नावाची शाळा शिक्षकांअभावी बंद पडली होती. सारंग गोसावी ह्यांनी ही बंद पडलेली शाळा सुरू करायचं ठरवलं. खरं तर हे सगळंच काम इतकं सोपं नव्हतं. बाहेरचा एक मुलगा येतो आणि इथं येऊन रोज काहीतरी नवीन गोष्टी सुरू करतो ही गोष्ट लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर नजर ठेवली आणि काही वेळा त्यांना त्रासही दिला. घरी फोन करून धमक्या द्यायलाही सुरुवात केली. सुरुवातीला घरी फोन जाताच त्यांची आई घाबरून रडायची,त्यांनी पुन्हा काश्मीरला जाऊ नये म्हणून विनवण्या करायची; पण सारंग गोसावी शांत होते, आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी त्या दहशतवाद्यांनाही आपण कुठल्याही अतिरेकी हेतूनं काही करायला आलो नसून,फक्त चांगलं काही तरी करू इच्छितो, जे काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी असेल, असं सांगायचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना सारंग गोसावी ह्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला आणि त्यांनी पुढे लक्ष दिले नाही. पुढे बडगाम येथे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू केले पण ज्यावर विश्वास ठेवला त्याने परस्पर कॉम्प्युटर विकले आणि हे प्रशिक्षण केंद्र बंद पडले. तरी न खचता जिद्दीने पुन्हा बिजबेरा गावी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले. पुण्यातून १७ जणांची टीम सोबत नेली. त्यांना प्रशिक्षण दिले. आज काश्मीर मधील मुले पुण्यात शिकायला येत आहेत. तेथील पालक सुद्धा विश्वासाने आपल्या मुलांना पुण्याला पाठवतात आणि सारंग गोसावी ह्या मुलांचे पालकत्व स्वीकारतात.
काश्मीर मध्ये अक्रोड आणि सफरचंदं ह्यांची प्रचंड लागवड होते. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ह्यापासून बिस्कीट करण्याची कल्पना सारंग गोसावी ह्यांना सुचली आणि ती यशस्वी झाली. आज ही बिस्किटे दिल्ली, पुणे आणि श्रीनगरमध्ये हातोहात खपायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी काश्मीरमध्ये मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या अणि त्याही खूपच यशस्वी झाल्या. खेळामुळे गावागावांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. आज काश्मीर हे सारंग गोसावी ह्यांचे किंवा ‘असीम फाउंडेशन’चं अर्थातच दुसरं घर झालं आहे. तिथल्या घराघरात सारंग गोसावी ह्यांना लोक ओळखतात. इतकंच नव्हे तर काही गोंधळाची शक्यता वाटली, तर तिथलं लष्करही सामंजस्याचं, शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सारंग गोसावी ह्यांना बोलावून घेतं.
आज सारंग गोसावी ह्यांची असीम फाउंडेशन ही पुणे येथील संस्था भारताच्या सीमावर्ती भागांत, मुख्यतः जम्मू-काश्मीरमध्ये काम करते. भारतीय समाजाला मुख्यतः तरुणांना राष्ट्रीय प्रश्नांना तोंड देण्याची उर्मी आणि जिद्द देण्याची गरज असीम फाऊंडेशनने जाणून घेतली. असीमला जाणवणार्या या राष्ट्रवादाची जागृती करण्याच्या गरजेला मूर्तिमंत रूप मिळाले. आज पुण्याजवळच्या चांदिवली येथे असीमच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय एकात्मता उद्यान साकारण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता उद्यान हा तरुणांना एकत्र येऊन राष्ट्रीय प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेला एक मंच आहे. या असीमच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळावी आणि तरुणांना असे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून समकालीन नायकांची गरज आहे हे असीमने जाणले आणि म्हणूनच असीमने भारताच्या २१ परम वीर चक्र विजेत्यांची माहिती देणारे shaurya नावाचे अँड्रॉइड अँप विकसित केले आहे. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच सारंग गोसावी ह्यांचे कार्य आहे. अशी जगावेगळी माणसं आपल्या अवतीभवती आहेत. असीम म्हणजे अमर्याद आणि ह्या फाऊंडेशन चा प्रवास उत्तरोत्तर प्रगती पथावर असावा हीच सदिच्छा आहे. ह्यांच्या कार्यास खूप शुभेच्छा आहेतच.
✍️ सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे
No comments:
Post a Comment