न पाठवलेलं पत्र हे पुस्तक वाचून झालं. अध्यात्मिक गुरू असलेले महात्रया रा यांनी लिहिलेले Unposted Letter या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. या आधी याची समरी ऐकली होती. बुकलेट अँपच्या माध्यमातून मिशन मेक इंडिया रीड याचा ध्यास घेतलेला मित्र अमृत देशमुख याने आजवर जवळपास २१०० हुन अधिक पुस्तक वाचली आहेत. त्याच्या बऱ्याच मुलाखतीत प्रश्न असतो की तुझ्या आवडीचे पुस्तक कुठले त्यात त्याने अनेकवेळा Unposted Letter By Mahatria Ra या पुस्तकाचा उल्लेख केला आहे.
उत्सुकता होती म्हणून मग ऍमेझॉनवरून मागवले आणि हे पुस्तक आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी एक चांगले असे पुस्तक आहे असं म्हणता येईल. छोट्या कथांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या आशयाच्या गोष्टी,विचार अत्यंत साध्या शब्दांत या पुस्तकात मांडल्या आहेत. एकेक पान म्हणजे एकेक तत्त्व आहे. प्रत्येक पान कुणाशीही संवाद साधतं. तुम्ही दुःखात असा की सुखात, यशस्वी असा की अयशस्वी - जेव्हा जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो, तेव्हा तेव्हा आपल्याला छानच वाटतं आणि अरेच्या हे आपल्या बाबतीत पण घडून गेलं इतकं सहज संवाद या पुस्तकातून महात्रया रा यांनी मांडला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. यातील काही विचार आणि ती वाक्य प्रचंड आवडली ती मार्क करून ठेवली होती त्यातील काही देतोय.
प्रेम म्हणजे लाड करणारं प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे परिवर्तन घडवून आणणारं प्रेम. लाड तुम्हाला क्षीण बनवतात. प्रेम तुम्हाला निर्माण करतं. कोणीच परिपूर्ण नसतं. सुधारणेसाठी अपरंपार वाव असतो. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याखेरीज कोणालाच तुमच्यात सुधारणा होत आहे की नाही ह्याच्याशी काही कर्तव्य नसतं.
प्रत्येकापाशी स्पष्टीकरण असतं आणि प्रत्येकाला शेवटचा शब्द आपला असावा असं वाटतं. मी स्वतः प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटचा शब्द आपलाच ठेवण्याकरिता धडपडत असतो, ही जाणीव मला संकोचकारक वाटते. मी स्वतःला सांगत आलो आहे की आयुष्यातल्या सगळ्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींबाबत मी समोरच्याला शेवटचा शब्द ठेवू देईन आणि त्याद्वारे खूप वेळ, शक्ती, परिश्रम आणि अवकाश यांची बचत करीन. स्पष्टीकरण देण्याच्या सहजप्रवृत्तीवर निर्बंध घालणं आणि दुसऱ्यांचा शब्द 'शेवटचा' ठरू देणं (अर्थात बिनमहत्त्वाच्या गोष्टींबाबतच फक्त) ह्यामधे प्रचंड स्वातंत्र्य सामावलेलं आहे. सुदैवानं सर्व प्रश्नांपैकी ९०% प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचे असतात.
घाई, जलदी हे सगळ्यात मोठं व्यसन आहे. जे निर्णय आपण एरवी सहसा घेणार नाही ते घाई आपल्यावर लादते. आपण ज्या प्रकारे वागू इच्छित नाही त्या प्रकारे वागण्याची सक्ती घाई आपल्यावर करते. ती आपल्याला असं भासवून गुंगवते की दोष आपला नसून परिस्थितीचा आहे. '१० मिनिटं लवकर' हा नियम सुरुवातीला चक्रमपणाचा वाटेल, पण आजकालच्या तणाव ग्रस्ततेसाठी तो चांगला प्रतिबंधक उपाय आहे. '१० मिनिटं लवकर' हे आज माणसाला तोंड द्यावं लागणाऱ्या बहुतांश तणावसंबंधी समस्यांवरचं रामबाण औषध आहे.
ज्या नात्यांमध्ये लोक एकमेकांकडे अगदी थोड्याच अवधीत आकृष्ट होतात ती नाती तुटायला एखादा गैरसमज, एखादी क्षुल्लक घटना, एखादा छोटासा वाद पुरेसा ठरतो. जी नाती दृढ होण्यासाठी. परस्परविश्वास वाढण्यासाठी, पारदर्शकता आणि जवळीक निर्माण होण्यासाठी थोडासा काळ घेतात, त्यांच्यामधेच काळाच्या कसोटीवर उतरण्याइतकी स्थिरता निर्माण होते.
तुमच्यापाशी सर्व उत्तरं नसली तर बिघडत नाही. महत्त्व आहे ते तुमच्यापाशी योग्य प्रश्न आहेत का, ह्या गोष्टीला. तुमची प्रज्ञा प्रतीक्षा करीत आहे... विचारा, म्हणजे तुम्हाला मिळेल.
परिवर्तनावर देखरेख ठेवली आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवलं तर त्याचं संस्कृतीत परिवर्तन होतं. परिवर्तन हे आव्हान नसतं, तर त्या परिवर्तनाचं संस्कृतीत रूपांतर होणं हे आव्हान असतं.
पाप कृतीमध्ये नसून ते कृतीमागच्या हेतूमधे असते ह्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पहात असलो तरी आपण ही जाणीव नेहेमीच बाळगली पाहिजे की जग मात्र आपल्या कृतींवरूनच आपलं मूल्यमापन करणार आपले हेतू काहीही असले तरी.
आपल्याला आपल्या बाहेरचं कोणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी हवं असतं. गुरू हा जणू आपला आरसाच असतो, ज्यात आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. तो आपल्याला आपली शक्तिस्थानं दाखवतो, ज्यांच्या जोरावर आपण आपल्या कमजोरींशी लढू शकतो. आपली कौशल्यं अधिक परजण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आपल्या ज्ञानाचा अधिक विस्तार करण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते.
यश मोठ्या गोष्टींत असतं.
समाधान छोट्या गोष्टींत असतं.
ध्यान शून्यात असतं.
ईश्वर सर्व गोष्टींत असतो.
सर्वेश फडणवीस