Monday, September 30, 2024

◆ 'अवधान एकले दीजे'...


माउली आणि ज्ञानेश्वरी बद्दल नितांत आदर आणि विलक्षण प्रेम आहे. माउली या शब्दांत जे माधुर्य दडलेले आहे ते ज्ञानेश्वरीच्या पानापानावर जाणवतं. मग त्याबद्दल आणि त्या अनुषंगाने जे वाचायला मिळेल ते वाचूनच अधिक समृद्ध होत आणि दरवेळी एक वेगळी दृष्टीने पुन्हा त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीकडे धाव जाते. असाच ‘अवधान एकले दीजे’ हा सौ.अपर्णा अजित बेडेकर यांनी लिहिलेला ग्रंथ सप्ताहात वाचून पूर्ण झाला. माउली या शब्दाकडे जाणाऱ्या साऱ्या अर्थवाटांना समर्पित असलेला हा ग्रंथ २५ लेख संकलित असलेला आणि या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथाच्या प्रत्येक लेखाचे शीर्षक हे गीता किंवा ज्ञानेश्वरी ओवी असलेला आहे. त्यामुळे अपर्णा काकूंचे ज्ञानेश्वरी आणि गीतेचा अभ्यास आणि त्यातील सूक्ष्म अर्थांचे बारकावे बघून थक्क होतो. 

याचे मुखपृष्ठ चित्रकार श्री वासुदेव कामत यांनी रेखाटलेले आहे. प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती असणारे माउली ज्ञानेश्वर महाराज चित्रात एका चौकटीपाशी, दरवाजाच्या उंबरठ्यापाशी ध्यानमग्न अवस्थेत बसलेत. जणू ज्ञानाच्या 'अपरिमित' आकाशाला एक चौकट आखून माउलींनी तुमच्या-माझ्या आकलनासाठी एक सोपं, 'परिमित' रूप दिलंय. गीतेचं अथांग तत्त्वज्ञान लोकभाषेच्या चौकटीत आणून ते 'सुगम' केलंय हे डॉ. अपर्णा बेडेकर यांनी लिहिलेले अर्थपूर्ण वाचूनच वाचकाला ग्रंथाचे वेगळेपण लक्षात येते. 

खरंतर गीता आणि ज्ञानेश्वरी हेतूशिवाय निर्माण झालेली नाही. अर्जुनविषादापासून परावृत्त करून अर्जुनाला युद्धसिद्ध करणं, हा गीतेचा एक सरळ सोपा हेतू आणि उपनिषदांचे सार असलेली गीता ही देववाणी संस्कृतातून लोकवाणी मराठी भाषेत सांगणे, हा ज्ञानेश्वरीचा हेतू आणि माउलींनी नऊ हजार ओव्या  घालून ज्ञानेश्वरी नित्यनूतन आणि रसमय केलेली आहे. आजही ज्ञानेश्वरीतून विविध छटा अभ्यासकांना उलगडत असतात आणि हेच याचे वेगळेपण शतकानुशतके टिकून आहे. 

ज्ञानेश्वरीबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेलं सुप्त आकर्षण, किंचितसं भय व बराचसा आळस दूर व्हावा आणि ज्ञानेश्वरी हा आपला कृतिशील परिपाठ आणि विचारशील नित्यकर्म व्हावं, यासाठी हवं ते 'अवधान' आणि वाचणाऱ्या प्रत्येकाचं ज्ञानदेवांच्या शब्दांशी प्रवरेच्या तरंगांप्रमाणे प्रवाही आणि नित्यनूतन असं 'मैत्र' जोडलं जावं, असं वाटत असेल, तर त्यासाठी हवं ते 'अवधान'. हे मैत्र निर्माण होऊन 'ईश्वरनिष्ठांची मांदियाळी' या वाचनसाधनेतून एकत्र यावी याच ध्यासातून झालेलं लेखन म्हणजे, 'अवधान एकले दीजे..' असा हा ग्रंथ मनाला अत्यंत भावणारा आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ वाचनीय आहे आणि संग्रही असावा असा आहे. आता लवकरच याची दुसरी आवृत्ती उपलब्ध होणार आहे तो पर्यंत वाट बघणे हेच इष्ट आहे. 

ज्ञानेश्वरी हा हृदयसंवाद आहे आणि तिथे कृष्ण आणि अर्जुनाच्या मनोव्यापारातली ही गंमत मोठी रम्य आहे. साक्षात ज्ञानमूर्ती असा हा कृष्ण.. मीही साच.. मी ही असंच मानायचो असं म्हणून आधी अर्जुनाला स्वीकारतोय. त्याचा निषेध करून त्याचा प्रश्न खोडून टाकत नाहीय. ज्ञानेश्वरीतल्या कृष्णाची ही पद्धती मोठी मनोज्ञ आहे. अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या शंकांना चूक की बरोबर ठरवण्यापूर्वी कृष्ण आधी त्याला स्वीकारतोय, त्याला आश्वस्त करतोय आणि मग अर्जुनाला अपेक्षित दिशेकडे वळवतोय कुरुक्षेत्रावर अगदीं मध्यभागी संगीतलेली गीता हेच तर शिकवणारी आहे. 

समोरच्याचं म्हणणं ऐकून त्याचा स्वीकार करणं हे कृष्णाकडून शिकावं. चूक जाणवून देतानाही राखलेला समतोल राखणं हे कृष्णाकडून शिकावं. शंकानिरसन करून योग्य मार्गाकडे नेतांना साधलेली सहजता... तर कृष्णाकडूनच शिकावी. एकूणच... युद्धभूमीवरच्या रणकर्कश वातावरणातील संवादाला महन्मंगल सुसंवादाचं रूप कसं द्यावं, हे कृष्णार्जुनांकडून शिकावं हे एका लेखात वाचल्यावर अपर्णा बेडेकर यांची संत साहित्याचा अभ्यास लक्षात येतो आणि यासाठी हा ग्रंथ वाचायला हवा.

अपर्णा काकू शेवटाकडे येताना छान लिहितात, ‘ज्ञानेश्वरी समजून घेण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकाने हे 'अवधान' द्यावं, वाचावं आणि अनुभवावं. सोप्या; पण प्रभावी भाषेतल्या या मुक्तचिंतनाने वाचक- साधकाला सगुणपणे निर्गुणाची शोभा दाखवावी आणि ज्ञानाची 'जीवी शीवी' प्रभा निर्माण करण्यास प्रवृत्त करावं, आश्वस्त ठरावं, 'तथास्तु' म्हणावं हीच त्या ज्ञानरूप आणि निवृत्तीस्वरूप अशा योगेश्वराकडे प्रार्थना. ‘अवधान एकले दीजे' या ग्रंथाद्वारे घडवलेला भावार्थदीपिकेचा रम्य प्रवास वाचकांना आनंददायी आणि प्रेरणादायी ठरणारा आहे. सहज सोपा अर्थ आणि तितकाच अर्थपूर्ण गूढार्थ सोप्या शब्दांत सांगितल्या गेला आहे आणि हेच या ग्रंथाचे वेगळेपण आहे. संग्रही असावे असचे अवधान..म्हणजे ‘अवधान एकले दीजे'...

सर्वेश फडणवीस