Wednesday, November 27, 2024

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ !!

कार्तिक वद्य त्रयोदशी. ज्ञानदेवांच्या संकल्पपूर्तीचा दिवस. आज त्यांच्या आयुष्यभराची साधना कृत्यकृत्य होणार होती. अवघी वणवण आणि धडपड आज निमूटपणे शांत होणार होती. सोन्याच्या पिंपळाने अर्पण केलेल्या आयुष्यातील शेवटचा सोनेरी क्षण आज उगवणार होता. आरंभ त्याच्याच आशीर्वादाने झाला होता, आता अखेरही त्याच्याच अध्यक्षतेखाली व्हायची होती.

पंचपंच उष:काली ज्ञानेश्वर झोपेतून उठले. प्रातः कर्मे आटोपून त्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान केले आणि आन्हिक उरकून ते सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाले. त्यांनी स्वत:च्या हातांनी
षोडषोपचारे श्रीसिद्धेश्वराची पूजा केली, आरतीनंतर सिद्धेश्वराला प्रदक्षिणा घातली, त्याचे आशीर्वाद घेतले. सुवर्णपिंपळाचा प्रणामपूर्वक निरोप घेतला.

-आणि ज्ञानेश्वरांची महाप्रस्थान यात्रा सुरू झाली. संतमंडळी जागोजाग शुचिर्भूत होऊन उभी होती, वातावरणात निशब्द शांतता होती, आवाज फक्त सर्वांच्या अबोल उच्छ्वासांचा नि ज्ञानदेवांचा वत्सल पावलांचा तेवढा होता. प्रत्येक संताजवळ ज्ञानेश्वर जात. त्यांच्या पाया पडत, त्यांना आलिंगन देत. तेही ज्ञानदेवांच्या पाया पडत नि मान फिरवून हुंदका आवरत. हात जोडून ज्ञानदेव पुढे जात. नारा, विठा, गोंदा, महादा ही नामदेवांची मुले एवढेसे चेहरे करून वाटेवर उभी होती. ज्ञानदेवांनी त्यांना गोंजारले, पोटाशी घेतले. विसोबा खेचर, चांगा वटेश्वर, गोरोबा कुंभार, सावता माळी, ज्ञानदेव त्यांच्याजवळ पोहोचताक्षणीच त्यांच्या पायांवर कोसळले. त्यांची प्रेमभेट घेऊन ज्ञानदेव पुढे निघाले. सर्वांनी आपले श्वास रोखून धरले होते. डोळे प्रयत्नपूर्वक कोरडेठक्क ठेवले होते, ओठ गच्च मिटले होते. शक्यतो एकमेकांकडे पाहणेही टाळण्याची खटपट चालली होती. सर्वांची दृष्टी चालत्या ज्ञानदेवांवर खिळून राहिली होती.

आणि ज्ञानदेव मात्र अंतर्बाह्य शांत होते. त्यांनी आपले पाश केव्हाच आवरले होते. ऐहिकापलीकडे जाण्याचे वेधही त्यांना फारसे लागले नव्हते. त्यांच्या लेखी आता आरंभ आणि अंत, जगणे आणि लोपणे, ऐहिक आणि पारलौकिक, अंधार आणि प्रकाश यांतील अंतर फारसे उरले नव्हते. आरंभालाच या जगात अंताची स्वप्ने पडतात, आणि अंतालाच आरंभाच्या पारंब्या फुटतात, याचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रकाशाला अंधार एरवीच अनोळखी असतो. पण ज्ञानदेवांना आता अंधारच प्रकाशरूप वाटत होता. या जगाबद्दल त्यांना राग-लोभ काहीच नव्हता. म्हणूनच ते शांतपणे पावले टाकत चालले होते. आता एकच भेट उरली होती, तिच्याकडेच आता सर्व उपस्थितांचे डोळे लागले होते. तेवढ्यासाठीच अंत:करणात उफाळणारा सर्व कोलाहल प्रयासाने कोंडून धरण्यात आला होता. काही अघटित अथवा अप्रिय होऊ नये, अशी मनोमन प्रार्थना करीतच, काय होणार, याबद्दलच्या उत्सुकतेने सर्वांनी आपली नजर तिकडे वळविली. ज्ञानेश्वरांची तिन्ही भावंडे तेथे उभी होती. निवृत्तिनाथांनी सोपान, मुक्ताबाईला आपल्या दोन्ही बाजूंना ठेवले होते. संथपणे चालत ज्ञानदेव तेथे आले.

म्लान वदनें निवृत्ती सद्गुरू सागर ।
येवूनि ज्ञानेश्वर चरणी लागे ॥
ज्ञानदेवांनी आल्या आल्या वाकून निवृत्तिनाथांच्या पायांवर डोके टेकले. निवृत्तिनाथ हे त्यांचे मोठे बंधू, त्यांचे गुरू, पितृ निधनानंतरचे त्यांचे वडील. आदिनाथापासून चालत आलेले अद्वयानंदवैभव असे गीतागुह्य 'कलीकलित' जगाचा उद्धार करण्यासाठी देशी भाषेत लोकांच्या कानी पोहोचविण्याच्या यांच्याच आदेशावरून ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवर देशीकार लेणे चढविले होते. ज्ञानदेवांनी पायाची मिठी सोडली, आणि निवृत्तिनाथांसमोर ते हात जोडून उभे राहिले.

म्हणाले-
पाळिले, पोषिले चालविला लळा ।
बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥

"आईवडील गेल्यानंतर तू आमची आई झालास, तूच आमचा वडील झालास. त्या नात्याने स्वरूपाकार होऊ शकलो, त्याच नात्याने आता मला निरोप दे. तोच आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. तूच आमचे लळे पुरविलेस, तुझ्या कृपाप्रसादामुळे आम्ही मायानदी ओलांडू शकलो आणि स्वरूपाकार होऊ शकलो त्याच नात्याने मला निरोप दे तोच आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. ज्ञानदेवाचे हे शब्द ऐकताच निवृत्तीनाथांना एकदम भडभडून आले. कालांतराने सकल संतांच्या समोर ज्ञानेश्वर उभे टाकले . सगळ्या संतांची हीच भावना होती आणि पुढे ज्ञानेश्वर आसनावर जाऊन बसले. त्यांनी पद्मासन घातले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. एकशे आठ ओव्यांनी शेवटचे नमन केले.

आतां मोक्षाचियां वाटां
पाहिला षट्चक्र चोहटा ॥
आज्ञा द्यावी वैकुंठां
ज्ञानदेवो म्हणें ॥
न लगे कलियुगीचा वारा
जे जे बोलिलो जगदुद्धारा ॥
मागितला थारा । पायीं तुझ्या ॥

ज्ञानदेवांच्या तोंडून बाहेर पडलेले ते अखेरचे शब्द. त्यानंतर त्यांनी डोळे मिटले.

ज्ञानदेव म्हणें सुखी केलें देवा
पादपद्मीं ठेवा, निरंतर ॥
तीन वेळा तेव्हां जोडिले करकमळ
झाकियेलें डोळे ज्ञानदेवे ॥
भीममुद्रा डोळां निरंजन मैदान
झालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥

ज्ञानेश्वरांनी समाधीकडे जाताना जगाकडे स्वाभाविकच पाठ फिरविली असेल; पण जग सम्मुख होऊन त्यांच्याकडेच पाहात होते. ज्ञानेश्वर आसनावर स्थानापन्न झाले आणि बाहेरच्या
जगात एकच कल्लोळ उडाला.  कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा, गुरुवार दुपारचा हा प्रसंग. ज्ञानेश्वरांची 'संजीवन समाधी' हा एक युगान्तच होता. 

प्राचार्य राम शेवाळकरांनी केलेले हे पूर्ण निरूपण ऐकतांना आजही डोळे पाणावतात आणि वाटतं हे सगळं अलौकिक आणि शब्दांच्या पलीकडचे आहे. अमृताचा घनू ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवले असेल ती माणसं कित्ती भाग्यवान असतील..

आज कार्तिकी वद्य त्रयोदशी, सकल संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. प्रत्यक्ष माउली म्हणतात, 

अवघाचि संसार सुखाचा करीन । 
आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥ 

आजही माउलींचे स्मरण आणि ज्ञानेश्वरी व हरिपाठाच्या ओव्यांच्या माध्यमातून मानवी मनाला आनंद देणाऱ्या या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावरील आळंदी येथे जायला हवेच. आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीच.
 
- सर्वेश फडणवीस