आयुष्यात काही घटना या अलौकिक असतात. निमित्त मात्रं भव हीच भावना ती घटना घडून गेली की कायम असते. असाच अनुभव मागच्या आठवड्यात आला. अयोध्येतील रामजन्मभूमी वरील राष्ट्र मंदिरात जाण्याचा योग आला. साधारणपणे जानेवारीपासून सतत मनात येत होते एकदा तरी या जन्मस्थानावरील मंदिरात जायचे आणि त्या ६ वर्षीय रामलला यांना याची देही याची डोळा बघायचे. सर्वबाजूने योग जुळून आले अर्थात त्याने बोलावले आणि मन भरून बघून आलो.
गेल्या ५ शतकांपासून हिंदूंच्या २५ हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, सहस्रावधी हिंदूंनी प्रभु श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलीदान केले, कोट्यवधी हिंदूंनी आपले आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी भावपूर्ण प्रार्थना केल्या, उपासना केली, जीवनभर व्रतस्थ राहिले, तो ऐतिहासिक क्षण काळाचे द्वार ठोठावत असतांना तो भावविभोर करणारा सुवर्णक्षण अखेर दृष्टीस पडला आणि मन आनंदून गेले.
भगवान राम हा कोटी हिंदूं धर्मियांच्या आस्थेचा विषय आहे. रामावर त्यांची अगाध श्रद्धा आहे. रामायण हा भारताचा मानबिंदू आहे. सामान्य माणसाला आणि विशेषतः तरुणांना श्रीरामांच्या जीवनातून खूप काही घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण मानव म्हणून श्रीराम चरित्र आहे. श्रीरामाचे जीवन सर्वच बाबतीत आदर्श आहे. श्रीराम जन्मभूमीवरील अत्यंत देखणा परिसर आणि त्यात युद्ध पातळीवर सुरू असलेले मंदिर निर्माण कार्य बघूनच नतमस्तक होतो.
राम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राम हे समीकरणच आहे. ज्यादिवशी दर्शनाला गेलो त्यादिवशी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही येणार होते त्यामुळे मंदिर आणि परिसरातील स्वच्छता अधिक नीटनेटकी आणि उत्साह वाढवणारी होती. मंदिर परिसरात असतांना श्रीरामलला आरती अर्थात श्रीराम ज्योत प्रज्वलित होताना बघण्याचे भाग्य लाभले आणि मनात आले की मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करणारी ही श्रीराम ज्योत म्हणजे संघर्ष खुणा ओळखून निर्धाराने पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. आता ही ‘श्रीराम ज्योत’ प्रज्वलित झालेली असताना हा राष्ट्रदीप नव्याने उजळवू या... जय श्रीराम🙌🚩
सर्वेश फडणवीस